>> डिसेंबरपर्यंत सेवेत होणार दाखल; पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची माहिती
रस्त्यावर अपघातात जखमी झालेल्या, संकटात सापडलेल्या किंवा आजारी असलेल्या गुरांवर ती ज्या ठिकाणी आहेत, तेथे जाऊन त्यांच्यावर तात्काळ प्रथमोपचार करता यावेत आणि नंतर त्यांना गुरांच्या इस्पितळात हलवता यावे, यासाठी पशुसंवर्धन खात्याने तीन रुग्णवाहिका आणि 4 दुचाकींची सोय करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी निविदा काढून एका कंपनीची निवड केली असल्याची माहिती पशुसंवर्धन खात्याचे मंत्री ननीळकंठ हळर्णकर यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना दिली.
डिसेंबर महिन्यापर्यंत ह्या रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार आहेत. 24 तास ही सेवा चालू राहणार आहे. या सेवेसाठी खात्याला अवघे 1 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. ज्या कंपनीला ही निविदा मिळाली आहे, ती कंपनी प्रत्येकी 17 लाख रुपयांच्या तीन रुग्णवाहिका खरेदी करणार असून, 4 दुचाकी देखील विकत घेणार आहे, असे हळर्णकर यांनी सांगितले.
गुरांच्या मदतीसाठीच्या या रुग्णवाहिकेत गुरांचा 1 डॉक्टर, 2 मदतनीस आणि चालक असे चार जण असतील. दिवसाच्या वेळी कॉल आला, तर रुग्णवाहिकेतून जखमी गुराला तात्काळ गुरांच्या इस्पितळात उपचारासाठी हलवण्यात येईल, असे हळर्णकर यांनी स्पष्ट केले.
दुचाकींचा वापर हा जखमी गुराजवळ लवकरात लवकर पोचण्यासाठी व नंतर जखमी गुराची स्थिती पाहून रुग्णवाहिका बोलावण्यासाठी दुचाकीस्वार करणार असल्याचे हळर्णकर म्हणाले.
…म्हणून रुग्णवाहिकांची सोय
मंत्री या नात्याने राज्यातील विविध भागांत फिरताना आपणाला कित्येक ठिकाणी जखमी अवस्थेतील गुरे नजरेस पडली. पाय मोडलेली, शिंगे तुटलेली, जखमी झालेली गुरे पाहिल्यानंतर त्यांना उपचारासाठी इस्पितळात हलवण्यात रुग्णवाहिकांची गरज असल्याचे आपणाला जाणवले आणि त्यासाठीच या रुग्णवाहिकांची सोय करण्यासाठी योजना तयार करुन निविदा काढल्याचे नीळकंळ हळर्णकर यांनी ‘नवप्रभा’शी बोलताना सांगितले.