>> बिहारच्या दौऱ्यावेळी ‘किसान सन्मान निधी’ योजनेचा 19वा हप्ता जारी; विकासकामांचेही उद्घाटन
जंगलराजचे हे लोक आपला वारसा आणि श्रद्धेचा द्वेष करतात.’ आपल्या देशात श्रद्धेचा एक मोठा कुंभ सुरू आहे. संपूर्ण युरोपातील लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांनी कुंभमेळ्यात स्नान केले आहे, परंतु हे जंगलराजवाले लोक महाकुंभाला अपशब्द म्हणत आहेत. राम मंदिरावर नाराज असलेले लोक महाकुंभाला कोसण्याची एकही संधी सोडत नाहीत. जनता त्यांना माफ करणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल बिहारमधील भागलपूरचा दौरा केला. यावेळी त्यांनी येथे ‘किसान सन्मान निधी’ योजनेचा 19वा हप्ता जारी करत बिहारमधील विविध विकासकामांचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना ‘लाडका मुख्यमंत्री’ म्हणूनही संबोधले. याच बरोबर त्यांनी प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यावरून लालू प्रसाद यादव आणि राष्ट्रीय जनता दल पक्षावरही निशाणा साधला.
मोदींनी आपल्या भाषणात सहा वेळा जंगलराजचा आणि तीन वेळा काँग्रेसचा उल्लेख केला. पूर्वी दलाल लहान शेतकऱ्यांचे हक्क हिरावून घ्यायचे, पण हे मोदी आहेत, हे नितीशजी आहेत, जे कोणालाही शेतकऱ्यांचे हक्क हिरावून घेऊ देणार नाहीत. जेव्हा काँग्रेस आणि जंगलराजचे लोक सत्तेत होते, तेव्हा त्यांनी शेतीसाठी एकूण किती बजेट ठेवले होते? आम्ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्यापेक्षा कितीतरी पट जास्त पैसे पाठवले आहेत. हे काम फक्त शेतकरी कल्याणासाठी समर्पित सरकारच करू शकते, असे मोदी म्हणाले. विकसित भारताचे 4 मजबूत आधारस्तंभ आहेत. ते म्हणजे गरीब, अन्नदाता शेतकरी, आपले तरुण आणि आपल्या देशातील महिला. केंद्रात असो किंवा नितीश यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार असो, शेतकरी आमचे प्राधान्य राहिले आहेत, असेही मोदींनी नमूद केले. खताची पोती जी यापूर्वी 3000 रुपयांना मिळत होती, ती आम्ही तुम्हाला 300 रुपयांना देत आहोत. आमचे सरकार शेतकऱ्यांचा विचार करते. गेल्या 10 वर्षांत खत खरेदीसाठी तुमच्या खात्यातून देण्यात येणारे सुमारे 12 लाख कोटी रुपये केंद्राने अर्थसंकल्पात दिले आहेत, असा दावाही मोदींनी केला.