‘छोटा परिवार, सुखी परिवार’

0
204
  •  प्रा. नागेश सु. सरदेसाई

आजच्या जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी एकजूट होऊन या विषयाचा गांभीर्याने विचार करायला हवा. एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एक छोटा परिवार ठेवला तर आपण आपल्या देशाला फार मदत करू शकतो. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा!

११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. जनमानसामध्ये जागृती घडवून आणणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. लोकसंख्येचा विषय जेव्हा समोर येतो तेव्हा काही महत्त्वाचे पैलू डोळ्यासमोर येतात, जसे कुटुंब नियोजन, लिंग समानता, गरिबी, मातेचे आरोग्य आणि मानवाधिकार. ११ जुलै रोजी लोकसंख्या दिवस योग्य रीतीने साजरा व्हावा म्हणून डॉ. के. सी. झाकारिया या ज्येष्ठ अभ्यासकाने आव्हान केले होते. डॉ. झाकारिया हे विश्‍व (जागतिक) बँकेचे लोकसंख्याशास्त्रज्ञ म्हणून काम पाहत होते. या अनुषंगाने १९८९ साली या दिवसाला संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) या संस्थेने मान्यता दिली. परंतु याविषयीचे लोकहित ११ जुलै १९८७ साली स्वीकृत झाले. हा दिवस म्हणजे जगाच्या लोकसंख्येने पाच अब्ज (बिलियन) हा आकडा पार केला. जगाची लोकसंख्या दर वर्षी १०० दशलक्ष (मिलियन) या प्रमाणाने वाढताना आपल्याला दिसून येते. २०१९ साली जगाच्या लोकसंख्येने सात अब्जाचा आकडा पार करून आठ अब्जाच्या आकड्याकडे भरारी मारताना आपल्याला दिसते आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक लोकसंख्या फंड या संस्थेच्या मदतीने केनिया आणि डेन्मार्क या देशांच्या संयुक्त विद्यमाने नैरोबी या केनियाच्या राजधानीत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. जागतिक लोकसंख्या नियंत्रणात आणण्याचे उद्दिष्ट ठेवून या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.

२१व्या शतकात जगाची वाढती लोकसंख्या हे एक चिंतेचे कारण बनून राहिले आहे. आपला देश हा १३५ कोटी लोकसंख्या असलेला देश असून तो जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. चीनच्या नंतर भारत आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा दुसरा तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो.
आरोग्याच्या क्षेत्रात प्रगती झाल्यामुळे व मनुष्याच्या राहणीमानात आमूलाग्र बदल झाल्यामुळे माणसाच्या सरासरी आयुर्मानात वाढ झालेली आहे.

२००० साली जागतिक पातळीवर माणसाची आयुर्मर्यादा ६७ वर्षे होती. २०१५ साली ती ७१ वर्षे झाली. २०५० साली ही मर्यादा ७७ वर्षे इतकी होऊ शकते.
दुसर्‍या बाजूला लोकसंख्येत भरघोस पद्धतीने वाढ होत आहे. दर वर्षाला सुमारे ८३ मिलियन लोकांची भर या लोकसंख्येच्या आकड्यात पडते. जन्मदर (फर्टिलिटी रेट) १९६० सालानंतर कमी झालेला आहे.

लोकसंख्या नियंत्रण ही काळाची गरज आहे. हा लोकसंख्येचा भस्मासुर विविध प्रकारे समस्या निर्माण करताना आपण पाहतो. जसे बाल मजूर आणि मानव तस्करी हे प्रकार प्रामुख्याने बघायला मिळतात. तसेच सामाजिक स्तरावर सामाजिक माध्यमांचा वापर बेसुमार वाढलेला आपण पाहतो. लोकसंख्यावाढीचे दुष्परिणाम आपल्याला अनेक स्तरांवर पाहायला मिळतात. म्हणूनच लोकहिताच्या कल्याणाकडे लक्ष देताना हा दिवस प्रत्येक मानवाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. लोकसंख्या वाढली म्हणजे सर्वप्रथम साधन-सुविधा व गरजेच्या वस्तूंची कमतरता आपल्याला जाणवते.
भारतातील परिस्थिती फार बिकट आहे. उत्तर प्रदेशात २४ करोड जनता आहे. जर हा प्रदेश एक स्वतंत्र देश असता तर तो प्रथम दहा देशांमध्ये लोकसंख्येच्या परिमाणात गणला गेला असता. जर आपल्याला आपले भविष्य चांगल्या पद्धतीने घडवायचे असेल तर आणि त्यासाठी जर तुम्ही उत्सुक असाल तर लोकसंख्या नियंत्रणात आणणे अत्यंत आवश्यक आहे. आज जर आपल्या देशाची लोकसंख्या फक्त ३०-३५ करोड राहिली असती तर आपला देश जगातली आर्थिक महासत्ता असलेला देश राहिला असता. शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे जी लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत आपल्याला मदत करू शकते. जर आपण आजच्या पिढीला गुणात्मक आणि दर्जेदार नीतिमूल्यांचे शिक्षण देऊ शकलो तर आजची मुले भावी आयुष्यात आपले कुटुंब नियोजित ठेवून देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलू शकतील. योग्य प्रकारे लोकसंख्या नियोजनाचे शिक्षण देऊन ‘छोटा परिवार, सुखी परिवार’ हे ब्रीदवाक्य घेऊन पुढची वाटचाल करू शकतील.

आरोग्य कल्याण विभाग, त्याचप्रमाणे बिगर सरकारी संस्था यात महत्त्वाचा वाटा उचलू शकतात. तसेच अंगणवाडी शिक्षिका, आशा सेविकासुद्धा मदत करू शकतात.
असे म्हटले आहे की जर एका स्त्रीला शिक्षित केले तर अख्खं कुटुंब शिक्षित होतं. ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यांसारखे राष्ट्रीय स्तरावर राबवलेले कार्यक्रम आयोजित करून आपण वाढत्या लोकसंख्येला नियंत्रणात ठेवू शकतो.
आजच्या कोविड महामारीच्या काळात जगभरात लोक मरताना आपण पाहत आहोत. आरोग्य व्यवस्थेत सुधारणा घडवून आणून प्रत्येक नागरिकाला योग्य मदत मिळावी अशी व्यवस्था आपल्या देशात तयार करणे अत्यावश्यक आहे. कोणताही देश विकासाच्या मार्गावर तेव्हाच पुढे येऊ शकतो जेव्हा ‘प्राथमिक शिक्षण’ आणि ‘आरोग्य सुव्यवस्था’ या दोन गोष्टींमध्ये तो संपन्न असतो. त्यामुळे या दोन्ही स्तरांवर योग्य निर्णय घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. आर्थिक अहवालामध्ये वाढीव निधी उपलब्ध करून देणे यासाठीच गरजेचे आहे.

आपला देश जर २१व्या शतकात महासत्ता बनायचा असेल तर प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य सुव्यवस्था यामध्ये सुधारणा घडवून आपण निश्‍चितच पुढचा प्रवास साकारू शकतो. त्याचप्रकारे चांगल्या पद्धतीने लोकसंख्या नियंत्रणात आणू शकतो. आजच्या जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी एकजूट होऊन या विषयाचा गांभीर्याने विचार करायला हवा. एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एक छोटा परिवार ठेवला तर आपण आपल्या देशाला फार मदत करू शकतो. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा!