कर्णधार सुनील छेत्रीनी नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर बेंगळुरू एफसीने आघाडीवरील एफसी गोवा संघाला २-१ नमवित हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) शुक्रवारी सहाव्या मोसमातील महत्त्वपूर्ण विजय मिळविला. कर्णधार सुनील छेत्री याने खाते उघडल्यानंतर निर्णायक गोलही केला. ह्युगो बुमूस याने दोन मिनिटांत बरोबरी साधून दिल्यानंतर आक्रमक शैलीच्या गोव्याला आणखी गोल करता आले नाहीत.
श्री कांतीरवा स्टेडियमवर मध्यंतरास गोलशून्य बरोबरीची कोंडी होती. पुर्वार्धात गोव्याने सरस चाली रचल्या होत्या, पण दुसर्या सत्रात बेंगळुरूने पारडे फिरविले. बेंगळुरूने ११ सामन्यांत पाचवा विजय मिळविला असून चार बरोबरी आणि दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे १९ गुण झाले. त्यांनी एटीके एफसीला (१० सामन्यांतून १८) मागे टाकून एक क्रमांक प्रगती करीत दुसरे स्थान गाठले. गोव्याची आघाडी कायम राहिली. ११ सामन्यांत हा त्यांचा दुसराच पराभव असून सहा विजय आणि ३ बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे २१ गुण आहेत.
खाते उघडण्याची शर्यत बेंगळुरूने जिंकली. डावीकडे मिळालेला कॉर्नर डिमास डेल्गाडो याने घेतला. त्यावेळी छेत्रीने १८ यार्ड बॉक्सच्या बाहेरून धावत येत अचूक टायमिंगसह शानदार हेडिंग केले. चेंडू गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याच्या हाताला लागून डाव्या बाजूने नेटमध्ये गेला.
गोव्याने दोन मिनिटांत बरोबरी साधली. मंदार राव देसाई याने बॉक्सलगत पास देताच फेरॅन कोरोमीनास याने बुमूस याच्या दिशेने चेंडू मारला. बुमूसने शारिरीक संतुलन व्यवस्थित साधत अफलातून फिनीशिंग केले. त्याने बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याला कोणतीही संधी दिली नाही.
सहा मिनिटे बाकी असताना डिमासने चेंडूवर ताबा मिळवित आशिक कुरुनीयन याला पास दिला. त्यातून संधी मिळताच छेत्रीने अफलातून फिनीशिंग केले. हाच गोल निर्णायक ठरला.
सामन्याच्या सुरवातीलाचा चकमक झडली. पाचव्या मिनिटाला बेंगळुरूच्या अल्बर्ट सेरॅन याने गोव्याच्या फेरॅन कोरोमीनास याला फाऊल केले. आठव्या मिनिटाला गोव्याच्या मंदार राव देसाई याने डावीकडून आगेकूच केली, पण बेंगळुरूच्या राहुल भेके याने त्याला रोखले.
दहाव्या मिनिटाला गोव्याने आणखी एक चाल रचली. डावीकडून ब्रँडन फर्नांडीसने मुसंडी मारली, पण त्याला जुआनन याने रोखले. त्यातून गोव्याच्या जॅकीचंद सिंग याच्याकडे चेंडू गेला, पण त्याचा फटका बेंगळुरूच्या निशू कुमार याने अडविला. पुढच्याच मिनिटाला भेकेने उजवीकडून रचलेली चाल गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याने रोखली.
पूर्वार्धात गोव्याला २९व्या मिनिटाला सर्वोत्तम संधी मिळाली होती. ह्युगो बुमूस याने पास दिल्यानंतर जॅकीचंद याने अकारण जादा ताकद लावून फटका मारला. त्यातच बेंगळुरूच्या डिमास डेल्गाडो याने दडपण आणल्यामुळे ही चाल वाया गेली.