छुप्या प्रसाराची चिन्हे

0
142

गोव्यातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सुरवातीला गोव्याबाहेरून येणार्‍या प्रवाशांपुरती ती सीमित राहिली. नंतर मांगूरहिल प्रकरण घडले. तेथून तो गोव्याच्या इतर भागांत पोहोचला. मात्र, आता मडगाव, बेती, केपे, कुडतरी, राय, पर्वरी, चिंचिणी आदी अनेक नवनव्या ठिकाणी कोणतीही पार्श्वभूमी नसलेले नवे रुग्ण आढळून येत आहेत ही निश्‍चितच चिंतेची बाब आहे. गोवा आता कोरोनाच्या स्थानिक संक्रमणाकडून सामाजिक संक्रमणाकडे वाटचाल तर करीत नाही ना, असा प्रश्न यातून निर्माण झाला आहे.

राज्य सरकार आजवर कोरोनाचे सामाजिक संक्रमण झाल्याचे वेळोवेळी नाकारत आले. आजवरच्या प्रत्येक रुग्णाला कोणापासून कोरोना झाला हे ज्ञात असल्याने त्याला सामाजिक संक्रमण संबोधता येत नाही, ते केवळ स्थानिक संक्रमण आहे असे सांगत आले, परंतु प्रत्यक्षात राज्य सरकारला ना मांगूर हिलमधील मच्छीमाराला कोरोना कसा झाला हे सांगता आले आहे, ना राज्याच्या विविध भागांत वरील ‘आयसोलेटेड केसेस’ कुठून कशा निर्माण आल्या याचे स्पष्टीकरण सरकारजवळ आहे. राज्यात कोरोना फैलावण्यास मुख्यतः प्रशासकीय बेफिकिरीच कारणीभूत ठरली आहे, कारण मांगूरहिल कंटेनमेंट झोन घोषित केलेला असताना तेथून कोरोना इतरत्र फैलावला तो जनतेमुळे नव्हे. सरकारच्याच आरोग्य खाते, कदंब, पोलीस आदी कर्मचार्‍यांच्या माध्यमातून तो सत्तरीपासून सांगेपर्यंत पोहोचला. आता किमान तो तेथून अन्यत्र पसरू नये यासाठी सरकारकडून अधिक कसोशीने प्रयत्नांची आवश्यकता आहे.

मांगूरहिल कंटेनमेंट झोन घोषित केलेला असताना तेथून वास्कोच्या इतर भागांमध्ये कोरोनाचा फैलाव कसा होऊ शकला हे अद्याप अनुत्तरित आहे. या बेफिकिरीमुळे आज वास्कोच्या जवळजवळ प्रत्येक भागामध्ये कोरोनाबाधित सापडत आहेत. १८ जूनच्या आकडेवारीनुसार मांगूरहिलची रुग्णसंख्या तब्बल ३१३ वर जाऊन पोहोचली होती, तर मांगूरहिलशी संबंधित गोव्याच्या अन्य भागांतील रुग्णांची संख्या १८१ वर होती. यात खुद्द वास्कोच्या बायणा आणि सड्यातील रुग्णसंख्या प्रत्येकी २९ वर गेली आहे. नवे वाडेत १३ रुग्ण आहेत, परंतु सत्तरीतील मोर्लेमध्ये तत्परतेने कंटेनमेंट झोन घोषित करीत असताना वास्कोच्या काही भागांतील रुग्णसंख्या मोर्लेपेक्षा अधिक असून देखील तेथील रुग्ण विखुरलेले असल्याचा दावा करून सरकारने केवळ काही इमारतींपुरता मायक्रो कंटेनमेंट झोन ठरवला. काल पुन्हा सड्याचा एक प्रभाग मायक्रो कंटेनमेंट झोन घोषित करणे भाग पडले आहे. अशी आणखी काही निर्बंधित क्षेत्रे येणार्‍या काळात करावी लागतील असे वाढती रुग्णसंख्या पाहता दिसते आहे. चिंबलमध्ये रुग्णसंख्या २१ वर गेलेली असताना आता तेथील दाटीवाटीच्या इंदिरानगर झोपडपट्टीत आणखी २ रुग्ण सापडले आहेत. इंदिरानगरसारख्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होणे अतिशय घातक ठरू शकते. कोरोना अर्थातच आता राजधानी पणजीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे.

सध्या राज्याच्या वेगवेगळ्या भागांत जे कोरोनाबाधित सापडत आहेत, त्यांच्या संसर्गाचा स्त्रोत कोण हे अज्ञात आहे, परंतु त्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढती राहिलेली दिसते. मांगूरहिलमध्ये पहिला रुग्ण आढळला त्याला आता वीस दिवस उलटून गेले असले, तरीही तेथे नवे रुग्ण सापडत आहेत. गुरुवारपर्यंत कुडतरीतील रुग्णसंख्या १० वर तर रायमधील ७ वर पोहोचली होती. ज्या गतीने कोरोनाचा फैलाव राज्यात होतो आहे ती अर्थातच जनतेसाठी चिंतेची बाब आहे. मोघम आकड्यांची चलाखी केल्याने, जनतेने स्वयंप्रेरणेने केलेले लॉकडाऊनचे प्रयत्न हाणून पाडल्याने आणि कोरोनाला क्षुल्लक गणल्याने हा फैलाव काही रोखता येणार नाही. त्यासाठी परिस्थितीवरील प्रशासकीय पकड अधिक कडक होण्याची आवश्यकता आहे. परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवल्याखेरीज कोरोनासारख्या जटिल विषाणूचा फैलाव रोखता येऊ शकत नाही हा देशभरात मिळालेला धडा आहे आणि गोवाही अर्थातच त्याला अपवाद नाही. मांगूरहिलच्या मच्छिमाराला कोरोना कोठून झाला? मांगूरहिलमधून राज्याच्या इतर भागांत कोरोना कसा गेला? कंटेनमेंट झोन असताना तेथून तो वास्कोच्या उर्वरित भागांत कसा पोहोचला? सरकारी कर्मचारी बाधित कसे झाले? वास्कोचा कोरोनाबाधित बागलकोटला कसा पळून गेला? पणजीचा बारचालक पळून कसा गेला? कळंगुटची बाई सीमा बंद असताना गोव्यात कशी आली? पर्वरीपासून चिंचिणीपर्यंत आता आढळणारे रुग्ण बाधित कसे झाले? प्रश्नांमागून प्रश्न जनता समाजमाध्यमांवर विचारते आहे, ज्याचे उत्तर कोणापाशी नाही. राज्यातील सध्याच्या सातशेपार जाऊन पोहोचलेल्या रुग्णांपैकी केवळ ७० रुग्ण हे बाहेरून आलेले आहेत. बाकी सगळे येथेच बाधित झालेले आहेत हेही लक्षात घेण्याजोगे आहे. राज्यात सामाजिक संसर्ग झालेला नसल्याचे सांगत केवळ ‘आयसोलेटेड केसेस’ असा उल्लेख जरी सरकार या अन्य बाधितांचा करीत असले, तरी त्यांच्यापर्यंत हा संसर्ग कसा पोहोचला हेच जर ज्ञात नसेल तर अशा प्रकारच्या ‘आयसोलेटेड केसेस’ ची संख्या प्रत्यक्षात सापडली आहे त्याहून मोठी असू शकते, कारण त्या स्त्रोताच्या संपर्कात आलेले सर्व लक्षणविरहित रुग्ण मोकळेच असतील आणि कोणी सांगावे, कोरोनाचा सुप्त फैलावही करीत असतील ही भीती निराधार कशी म्हणायची? ज्यांच्यात लक्षणे आढळतील ते जेव्हा स्वतःहून कोविड चाचणीसाठी पुढे येतील तेव्हाच त्यांच्या चाचण्या होऊ शकणार असल्याने ही एक मोठी धोक्याची घंटा गोव्यावर सध्या घणघणते आहे आणि राजकीय कारणांखातर ती नाकबूल करण्यात अर्थ नाही.

आजचे जे वास्तव आहे ते कबूल करून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय काय करता येईल याचा विचार झाला तरच यापुढील परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते. आपण वास्तवच नाकारत बसलो तर त्याचा परिणाम अर्थातच आपल्या रणनीतीवर होत असतो. दिवसागणिक वेगवेगळ्या भागांत ‘आयसोलेटेड केसेस’ कशा उत्पन्न होत आहेत या प्रश्नाचे उत्तर आता शोधावेच लागेल आणि हा छुपा संसर्ग रोखण्यासाठी शिकस्तीचे प्रयत्न करावे लागतील.