छातीत कळ येते?…

0
2626

– डॉ. राजेंद्र साखरदांडे, साखळी
खरेच छातीमध्ये कळ येते का तुमच्या? मग लवकरातलवकर डॉक्टरकडे चला… असे सांगण्याअगोदरच आज प्रत्येक जण डॉक्टरकडे धावत सुटतोय. एवढेच काय पुढे ऐका ना..!
परवा मला फोन आला. प्रत्येक कॉर्पोरेट हॉस्पिटल्सच्या स्कीम निघाल्यात. एकात तुमची रुटीन चेकअप, ईसीजी, एक्स-रे. तर दुसर्‍यात थोडे पुढे… स्ट्रेस टेस्ट, स्पेशालिस्टची सोय, अल्ट्रासाउंड सगळे सगळे. तिसरे तर सगळे वर – अँडिओग्राफी पण… फक्त एक पॅक … पैसे १५ ते २० हजार फक्त! … तो सगळ्यात मोठा पॅक घ्यायला तयार! कारण तो स्वतः आता त्या हॉस्पिटलचा एजंट झालाच. मी विचारले, ‘अरे, तुला काय होतेय?’ तो म्हणाला, ‘पुढे होऊ नये म्हणून हे सगळं करतोय..! मी स्वतः केल्यावर.. तो अनुभव घेतल्यावर दुसर्‍यांना पटवणे जड जाणार नाही’. मी विचारले, ‘अरे, पण तू स्वतःला स्पेशालिस्टला दाखवले का?’ तर तो नाही म्हणाला. तर मंडळी, तुम्ही असे करू नका. पैसे आहेत म्हणून काहीही करू नका. डोके दुखत असेल तर तुम्ही डोक्याचे स्कॅनिंग करणार का? स्वतःची काळजी घ्यायला हवी तर माझे ऐका..! आपल्या फॅमिली फिजिशियनचा प्रथम सल्ला घ्या आणि मगच पुढचे ठरवा.
आज आमचा विषय ‘‘छातीत कळ’’ उठली तर काय करावे? आजकाल छातीत दुखले तर लगेचच डॉक्टरांना दाखवले पाहिजे.
छातीत कळ कोणत्या कारणांनी येते?-
१. हृदयाचे विकार
२. फुप्फुसाचे विकार.
३. पोटातले विकार
४. मज्जातंतूंचे विकार
५. बरगडीचे विकार
६. छातीच्या स्नायूंचे विकार
७. त्वचाविकार
अशा प्रकारचे नाना प्रकारचे विकार आहेत ज्यामुळे छातीत कळ येऊ शकते. डोकेदुखीवर आपण गोळी घेऊ शकतो. पण छातीत उठणारी कळ जीवघेणी असू शकते. तेव्हा सावध रहा. छातीत उठणारी कळ विशेषत्वाने खालील कारणांमुळे उठू शकते-
१) अंजायना पेक्टोरीस :
हृदयविकाराच्या ९०% रोगी या प्रकारात मोडतात. ३५ वर्षांवरील व्यक्तींना हा रोग होतो. छातीच्या मधोमध ही कळ येते. ही कळ डाव्या बाजूला वळत खांद्याकडून खाली जाते. अशी कळ हृदयविकार असला तरीही येते. ही कळ जोरदार, टोचून येते. या रोगात ही कळ १ ते ३ मिनिटेही येते. कधी कधी जास्त वेळ येऊ शकते. विश्रांती घेतल्यावर वा तोंडात या रोगावरची गोळी टाकल्यावर लगेच निघून जाते. ही येण्याचे कारण म्हणजे हृदयाला योग्यरीत्या रक्तपुरवठा होत नाही, हे आहे व त्या कारणावर योग्य ते विश्‍लेषण करणे गरजेचे आहे. हृदयविकार म्हणजेच वरील दोन्ही विकारात घाम येणे, अशक्तपणा, घेरी येणे, उलटी येणे हीच लक्षणे असतात.
२) हृदयविकार –
एकदम छातीत जोरदार कळ, घाम येणे, चक्कर येणे, गात्रे थंडगार पडणे ही लक्षणे दिसताक्षणीच रोग्यास लवकर डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे. लवकरात लवकर मोठ्या इस्पितळात घेऊन जाणे झाले तर रोग्याचे प्राण वाचवू शकता.
केव्हा केव्हा उलटी होते, पोटात जळजळ वाढते, कुणी म्हणते ऍसिडिटी झाली. मसाल्याचे जास्त प्रमाणात खाल्ल्यावर असे होते, असेही म्हणतात. जनरल प्रॅक्टिशनरकडे नेले जाते. कधी कधी हृदयविकार समजण्यात वेळ घालवला जातो व माणसाचा जीव जातो.
३) पोटाचे विकार –
यात ऍसिडिटी, अल्सरचे विकार प्रामुख्याने आढळतात. सिगारेट, विडी, तंबाखू तसेच मसालेदार, मिरचीपूड वापरल्याने, तेलकट व दारू घेतल्याने पित्ताचे विकार वाढतात. उलट्या होतात. पोटात जळजळ वाढते. ही जळजळ वाढल्याने पोटात व छातीत जोरदार कळ येते. ती कळ पाठीमागेही येऊ शकते. तेव्हा ही व्यसने न होऊ देणे वा या पित्त वाढवणारे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन न करणेच चांगले.
थोडेतरी लोकांना मसालेदार खाणे आवडते. नाना प्रकारचे मसाले मिसळून जेवण बनवणे व ते खाणे आम्हाला आवडते. हॉटेलात संध्याकाळी व सकाळी मिरची, पाव-भाजी खाणारे पुष्कळ भेटतात. याने गोव्यामध्ये पित्ताचे विकार जास्त आढळतात.
४) मज्जातंतूंचे विकार –
यात वेगवेगळे विकार लक्षात घेऊया…
अ) मानेचे विकार (सर्व्हायकल स्पॉंडिलोसिस)
ब) स्पॉंडिलायटीस
क) ऑस्टिओआर्थ्रायटीस ऑफ थोरासिक स्पाइन
यामध्ये मानेचे स्पॉंडिलायटीस हा विकार जास्तीत जास्त लोकांमध्ये आढळतो. मानेचे मणके एकमेकांबरोबर घट्ट बसतात व रोग्यास चक्कर येते, मान दुखते व ती मानेची कळ काळजाकडे येते.
५) मज्जातंतू चिरडल्यामुळे छातीत कळ उठते.
६) बरगडीचे विकार –
बरगडी झिजल्यामुळे किंवा तिला झालेल्या रोगांमुळे (वाताचे विकार) किंवा फासळ्यांना मार लागल्यामुळे छातीमध्ये कळ येऊ शकते. बरगडीचा अस्थिभंग झाल्यावर ही कळ येते.
६) फुप्फुसांचे विकार –
या सदराखाली खालील आजार होतात…
टीबी, फुप्फुसांचा कर्करोग, प्लुरसी, न्यूमोनिया या आजारातही छातीत कळ येऊ शकते. पण या सगळ्यात खोकला, ताप येणे ही लक्षणे पण प्रामुख्याने दिसून येतात.
केव्हा केव्हा छातीत कळ येणे यावर विचारपूर्वक निर्णय करणे लवकर शक्य होत नाही. त्यावर नाना प्रकारच्या चिकित्सा योग्यरीत्या कराव्या लागतात.
आता सर्व चिकित्सा करता येतात. तेव्हा आधुनिक जगात काहीही अशक्य नाही. छातीत कळ आल्यावर लवकरात लवकर रोग्याने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण साध्या स्नायुदुखीपासून हृदयविकारापर्यंत भयानक जीवघेण्या रोगापर्यंत आपण जाऊ शकतो. तेव्हा सावधान!!
शहरामध्ये मोठमोठी इस्पितळं उभारली गेली आहेत. त्यामुळे सगळ्या साधन-सुविधा उपलब्ध आहेत. मोठमोठ्या मशीन्स ज्या पूर्वीपासून भारतातील थोड्याच शहरांमध्ये होत्या, त्या आता प्रत्येकाच्या जवळपास आहेत. तेव्हा छातीत येणारी कळ, कुठल्या बाजूला जाते, विसावा घेतल्यावर जाते का नाही? भरपूर जेवल्यानंतर येते का? पित्ताचा त्रास होतो का? हे सर्व प्रश्‍न लक्षात घेतल्यावरच रोगाचे निदान होऊ शकते.
आजकाल हृदयविकाराचे प्रमाण वाढलेले आहे. वयाची पंचेचाळीस वर्षे झाल्यावर पूर्ण शरीराची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रक्ताची, लघवीची तपासणी करून घेणे. शरीरात होणारा प्रत्येक बदल बघणे, दिनचर्येत होणारे बदल… केव्हा केव्हा नैसर्गिक असतात. वयोमानाप्रमाणे शरीरात बदल होत राहतात.
प्रत्येक गोष्टींची शहानिशा होणे व करणे गरजेचे आहे. आज आम्हास कितीतरी रोगी दिसतात ज्यांना हळूच काळजात दुखते… ते त्याच्याकडे कानाडोळा करतात… काही महिन्यानंतर डॉक्टर ईसीजी काढतात… तेव्हा कळते.. रोग्याला हलकासा हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे. अशा वेळी हृदयाला जो धोका किंवा क्षय झालेला आहे त्यात बदल होणे शक्य नसते.
तेव्हा दरवर्षी डॉक्टरांना दाखवून ईसीजी काढलेला बरा. त्याचबरोबर स्टे्रस टेस्टपण करून घेतलेली बरी. हे सगळे डॉक्टरी सल्ल्यानुसार करावे.
डॉक्टरांना काही शंकाच असली तर ते मग अँजिओग्राफी करायला सांगतील – केव्हा तर वर हृदयाला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी ठीक आहे की नाही हे कळून चुकते व त्यावर उपाययोजना करता येते.
तर मंडळी, छातीत येणारी कळ साधी असू शकते… व जीवघेणी ही असू शकते. तेव्हा यावर योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यास चुकू नका. स्वतःची काळजी घ्या. स्वतःला जपा.
जपणार ना!!