सुनिता वेर्लेकर प्रकरणामुळे गोव्यात महिलांच्या मानवी हक्कांचे केवढे उल्लंघन होत आहे हे स्पष्ट झाले आहे, असे ‘बायलांचो साद’ या बिगर सरकारी संघटनेने काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.
बायलांचो सादच्या निमंत्रक साबिना मार्टिन्स म्हणाल्या की ज्या महिलांचे मानसिक आरोग्य चांगले नाही असे सांगण्यात येते त्यांना त्यांच्या कुटुंबियानी कोणत्या स्थितीत ठेवले आहे याची वेळच्या वेळी पाहणी होण्याची गरज आहे. बर्याच वेळा मालमत्तेच्या हक्कापासून त्यांना वंचित ठेवण्यासाठीच त्यांची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे सांगण्यात येत असल्याचे मार्टिन्स म्हणाल्या.
अशा महिलांच्या नावावर सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांद्वारे जे पैसे मिळवले जातात ते त्यांच्यावर खर्च केले जातात की भलताच कोण तरी ते हडप करतो याची तपासणी होण्याचीही गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
सुनिता वेर्लेकर यांच्यासारख्या महिलांचा अशा प्रकारे छळ होऊ नये यासाठी अशा महिलांसाठी विशेष घरांची सरकारने सोय करावी. तसेच अशा महिलांना कायदेशीर सेवा वैद्यकीय सेवा व समुपदेशन व निवास याची सोय म्हणून एका केंद्राची सोय करण्यात यावी, अशी मागणीही मार्टिन्स यानी केली.