छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची फलनिष्पत्ती

0
47
  • – सचिन मदगे

खरे तर आजच्या स्वतंत्र भारत देशाचा नकाशा आहे त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याची छत्रछाया आहे. हीच खरी शिवाजी महाराजांच्या कार्याची फलनिष्पती!

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती इसवीसनाप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या उत्साहात अनेक शहरात, गावात शेकडो तरुण-तरुणी दुचाकी-चारचाकी वाहनांतून मिरवणूक काढतात. तरुण- तरुणी डौलदार भगवे फेटे बांधून, पारंपरिक पोशाख करून, हातात तलवारी घेऊन ‘जय भवानी’ ‘जय शिवाजी’ घोषणा देत सहभागी होतात. याशिवाय शिवाजी महाराजांच्या प्रतिमा अनेक चारचाकी दुचाकी वाहनांवर लावलेल्या दिसतात. हे सर्व पाहून असे वाटते की शिवाजी महाराज हे आजच्या तरुणांचे फॅशनचे प्रतीक बनले की काय? कोणत्याही राजकीय पक्षाच्या राजकारण्यांना शिवाजी महाराजांचे नाव आणि घोषणा दिल्याशिवाय भाषण करताच येत नाही. धूर्त राजकारणी शिवाजी महाराजांच्या इतिहासाला वेठीस धरून आपल्या मतपेटीची सोय चाणाक्षपणे करून घेतात.

शिवजयंतीच्या मिरवणुकीत सामील होणारे फॅशनेबल तरुण असो की राजकारणी, त्यांना जर शिवाजी महाराजांचे कार्य काय.. विचारले तर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचे पोट फाडले, शाहिस्तेखानाची बोटं तोडली, सुरतेची लूट केली, औरंगजेबाच्या कैदेतून आग्य्राहून मिठाईच्या पेटार्‍यातून पसार झाले… या गोष्टी म्हणजे शिवाजी महाराजांचे कार्य असे सांगितले जाते. वरील गोष्टी शिवाजी महाराजांच्या अति उच्च धाडसाच्या, पराक्रमाच्या नक्कीच आहेत. परंतु शिवाजी महाराजांच्या कार्यामुळे आजच्या संपूर्ण भारतावर नक्की काय परिणाम झाला… याकडे मात्र बहुदा दुर्लक्षच झाले आहे. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या कार्याने आजच्या भारताची राजकीय आणि सामाजिक जडणघडण कशी झाली याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ.

छ. शिवाजी महाराजांच्या कार्यकाळ आणि सतराव्या शतकाचा भारताचा राजकीय नकाशा पाहिला तर उत्तरेत आजचा पाकिस्तान, अफगाणिस्तानपासून, दक्षिणेत महाराष्ट्रापर्यंत, पश्‍चिमेस गुजरातपासून पूर्वेस आसाम-बंगालपर्यंत एकछत्री मोगल बादशहा औरंगजेबाचे साम्राज्य. दक्षिणेत महाराष्ट्र कर्नाटकातील बहुतेक भागात विजापूरच्या आदिलशहाचे आदिलशाही राज्य, महाराष्ट्रातील विदर्भ, तेलंगण, आंध्र, तामिळनाडू हे हैदराबाद- गोवळकोंडाच्या कुतूबशहाचे राज्य. अशा प्रकारे भारताचा जवळपास नव्वद टक्के भाग हा या मुस्लीम शाहींनी व्यापला होता. भारताच्या पश्‍चिम-पूर्व किनारपट्टीवर इंग्रज- पोर्तुगीज, डच, फ्रेंच, सिद्धी या परकीयांच्या छोट्या छोट्या वसाहतींची रांगच होती. मोगल भारताबाहेरून- आजच्या उझबेकिस्तान- अफगाणिस्तानातून भारतात आले होते. मोगलांच्या दरबारात अरब, इराणी, अफगाणी, उजबेकी भरणा कायम होता. शिवाजी महाराजांवर आक्रमण करणार्‍या मोगल सरदारांमध्ये शाहिस्तेखान मूळचा इराणी होता. दिलेरखान अफगाणी पठाण होता.

गोवळकोंड्याचा कुतूबशहाचा संस्थापक जन्माने इराणी होता तर आदीलशहा जॉर्जीयन होता. कुतूबशाहीत शेवटच्या काळात मीरजुम्ला नावाचा नावारूपाला आलेला सरदार इराणमधून भारतात नशीब आजमावण्यास आलेला तरुण काही काळातच मोठा प्रभावशाली राजकीय व्यक्ती झाला. पुढे तो औरंगजेबाचा खास विश्‍वासू सरदार बनला. या तीनही भारतातील मोठ्या शाहींमध्ये विदेशी मुस्लिम लोकांना प्रथम प्राधान्य दिले जाई. नंतर स्थानिक मुस्लिम आणि त्यानंतर हिंदूंना प्राधान्य दिले जाई.

मुस्लिम शाहींमध्ये धार्मिक भेदभाव सर्रास चालत असे. मोगल बादशहाच्या अनेक न्यायालयीन निवाड्यांमध्ये गुन्हेगार जर मुस्लिमेतर असेल तर त्याने मुस्लिम धर्म स्विकारण्याची तयारी दर्शवली तर शिक्षेमध्ये मोठी सूट मिळत असे. कोणत्याही हिंदू सरदाराने वतनदाराने बंड केले की प्रथम त्यांचे श्रद्धास्थान असणार्‍या मंदिरांवर घाला घातला जाई. तर जेव्हा आदिलशाही सरदार अफझलखान चालून आला तेव्हा अफझलखानाने वाकडी वाट पकडून शिवाजी महाराजांच्या कुटुंबाचे कुलदैवत तुळजा भवानीस उपद्रव देण्यासाठी तुळजापूरला गेला. तेथून पंढरपूर, शिखर शिंगणापूर, पाली खंडोबा या महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांना उपद्रव देत तो वाईला पोचला. अफझलखान स्वतःला काफराची कत्तल करणारा व काफराच्या मूर्ती तोडणारा अशी बिरूदे गर्वाने बाळगणारा आदिलशाही सरदार होता. हिंदू तीर्थक्षेत्रांना नेहमीच उपद्रव होई. भारतातील असे एकही तीर्थक्षेत्र नाही ज्याला कधी ना कधी मुस्लिम शाहींकडून उपद्रव झाला नाही! जी गोष्ट धार्मिक भेदभावाची होती तशीच भाषिक व सांस्कृतिक भेदभावाचीही तीच परिस्थिती होती. भारतीय भाषांची गळचेपी होऊन अरबी, फारसी भाषांचे प्रस्थ वाढले. उत्तर भारतातील हिंदी भाषेवर फारसी, अरबी भाषांचे कलम होऊन नवी उर्दू भाषा जन्माला आली. सोळाव्या- सतराव्या शतकात विद्वत् जगतात आणि उच्चभ्रू मंडळींमध्ये इराणमधील फारसी भाषेला मानाचे स्थान मिळू लागले. मोगलांची राज्यकारभाराची भाषाच फारसी म्हणजे फारसी भाषेला राजाश्रय मिळाला. गावच्या साध्या कुळकर्णीपासून सुलतानाच्या दरबारातील मनसबदारापर्यंत सर्वांच्या पत्रव्यवहारात फारसी शब्दांचे प्राबल्य वाढीस लागले होते. अशा प्रकारे अकराव्या असतकापासून सतराव्या शतकापर्यंत भारताची स्वतःची राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक ओळख पुसली जाऊ लागली होती. अशा काळात शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचे कार्य सुरू झाले.
शिवाजी महाराजांनी मुख्यतः आदिलशाही आणि मोगलशाही राज्यांचा भाग जिंकून हिंदवी स्वराज्य उभे केले. महाराजांनी उभे केलेले राज्य हे स्वतःच्या राजकारणासाठी उभे केलेले नव्हते. त्यांच्या शत्रूंशी झालेल्या लढाया या काही राजकीय कारणांसाठी झालेल्या नव्हत्या. शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वतःला राज्याभिषेक करून घेऊन स्वतःला सार्वभौम राजा म्हणून घोषित केलेतेव्हा ज्या काही नवीन गोष्टींचा पाया घातला त्यामुळे भारताचा सांस्कृतिक चेहराच बदलून गेला. पत्रव्यवहारात भारतीय पंचांगाच्या तिथीने पत्रव्यवहार सुरू केला. सतराव्या शतकात भारतात बहुतेक राजकीय पत्रव्यवहार इस्लामिक हिजरी वर्षासनाप्रमाणे चालत असे. पत्रव्यवहारात आणि राज्यव्यवहारात अनेक फारसी-अरबी शब्द रूढ झालेले होते. ते काढून टाकण्यासाठी रघुनाथपंत हनुमंते यांच्याकडून ‘राज्यव्यवहार कोश’ निर्माण करून घेतला. या कोशात फारसी-अरबी शब्दांना पर्यायी मराठी- संस्कृत शब्द देण्यात आले. स्वतः शिवाजी महाराजांचा सुरुवातीच्या काळातील पत्रव्यवहाराचा सुरुवातीचा मायना ‘अजरख्तखाने दामदौलत हू’ असा असायचा तो आता ‘अखंडलक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री’ किंवा ‘स्वस्ती श्री क्षत्रिय कुलावंतस राजश्री छत्रपती शिवाजीराजे’ असा होऊ लागला.

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने हादरलेल्या मोगल बादशहा औरंगजेबाने शिवाजी महाराजांचे राज्य बुडविण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. परंतु सर्वसामान्य जनतेच्या मनात स्वराज्याच्या आणि सुराज्याच्या पेटवलेल्या मशालीने औरंगजेबाच्या शासनाला धुळीस मिळवले. शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाशी जबरदस्त टक्कर देत मोठ्या धीराने ते मृत्यूला सामोरे गेले. त्यानंतर राजाराम महाराज- ताराबाईनेही स्वराज्याची ज्योत मोठ्या हिकमतीने तेवत ठेवली. अखेर जुलमी अत्याचारी औरंगजेबाला येथे दक्षिणेत मृत्यूने गाठले. औरंगजेबाने आपल्या हयातीतील शेवटची सत्तावीस वर्षे फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांचे राज्य नष्ट करण्यात घालवली. परंतु त्याच्या पदरी निराशाच आली. औरंगजेबाच्या मृत्युनंतर छत्रपती शाहू आणि पंतप्रधान बाळाजी विस्वनाथ व त्यांचा मुलगा थोरला बाजीराव यांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्याचे रुपांतर मोठ्या साम्राज्यात झाले. या साम्राज्याने अठराव्या शतकात भारताची स्वतःची ओळख परत निर्माण करून दिली. औरंगजेबाने उध्वस्त केलेली अनेक हिंदू तीर्थक्षेत्रे पुन्हा उभी राहिलीत. अनेक तीर्थक्षेत्रांवरील बंद पडलेले उत्सव मोठ्या दिमाखाने परत सुरू झाले. सतराव्या शतकात संपूर्ण मुस्लिम राजकीय नकाशा असलेला भारत अठराव्या शतकात पुन्हा हिंदूबहुल राजकीय झाला. गोव्यातील पोर्तुगीजांना सर्वांत प्रथम राजकीय आणि धार्मिक कारणांसाठी आव्हान देणारे भारतीय राजे शिवछत्रपती होते. पुढील काळात मराठ्यांनी पोर्तुगीजांना काही तडाखे दिले. त्या तडाख्यांमुळे अठराव्या शतकाच्या शेवटी पोर्तुगीजांनी गोव्यातील नवीन जिंकलेल्या प्रदेशात हिंदूंच्या मंदिरांना आणि धर्माला हात लावणार नाही असे जाहीर आश्‍वासन दिले. गुजरात, दाभाडे, गायकवाड सरदारांनी पठाणांपासून मुक्त केला. मध्यप्रदेशातील माळव्यात शिंदे-होळकरांनी मोगल पठाण सुभेदारांना हुसकावत स्वतःचे राज्य निर्माण केले. सन १७८१मध्ये पानिपतच्या रणमैदानात स्वतःच्या प्राणांची आहुती देत हिंदवी स्वराज्याच्या पाईकांनी अफगाणी अब्दालीला कायमचे अफगाणीस्तानात पाठवले.

नंतरच्या काळात महादजी शिंदेच्या पराक्रमाने मोगल बादशहा मराठ्यांचा आश्रित बनला, ज्या मोगल दरबारात विदेशी मुसलमानांना मानाचे पान मिळत होते. तिथे बादशहा म्हणून कुणाला बसवायचे याचा निर्णय ठत्रपतींचे वारसदार घेऊ लागले. इकडे कर्नाटकात म्हैसूरमध्ये निर्माण झालेल्या हैदर आणि टिपूच्या धर्मांध धोरणास माधवराव पेशव्याने मोठ्या हिकमतीने लगाम घालून हैदर टिपूला त्यांचे धोरण बदलायला लावले.

सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याची खरी फलनिष्पत्ती अठराव्या शतकातील भारतातील बदलणार्‍या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासात आहे. परंतु स्वतंत्र भारतातील सरकारी इतिहासकारांनी सतराव्या शतकात मोगल बादशहा औरंगजेबाच्या मृत्युनंतर मोगलशाही नाममात्र उरल्यावर भारत एका अंधार युगात गेल्याचे चित्र नेहमीच उभे केले. खरे तर आजच्या स्वतंत्र भारत देशाचा नकाशा आहे त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्यांची छत्रछाया आहे. हीच खरी शिवाजी महाराजांच्या कार्याची फलनिष्पत्ती!