छत्तीसगढमध्ये काल माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) १३ जवान शहीद झाले. शहीद झालेल्यांमध्ये दोन अधिकार्यांचा समावेश आहे. छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यातील कासलपारा गावात ही घटना घडली. चालू वर्षातील ही सर्वात मोठी घटना ठरली आहे. गावकर्यांना पुढे करून माओवाद्यांनी जवानांवर हल्ला चढवल्याचे सांगण्यात आले.
गेल्या २१ नोव्हेंबर रोजी कासलपारा गावातच माओवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांनी १५ नक्षलवाद्यांना ठार केले होते. माओवाद्यांनी याच गावात त्याचा बदला घेतला आहे. त्यानंतर नक्षलवाद्यांनी गेल्या महिन्यातच हवाई दलाच्या हेलिकॉप्टरवर हल्ला केला होता. सीआरपीएफचे सहा जवान व हवाई दलाच्या एका कमांडोच्या बचावासाठी सदर हेलीकॉप्टर पाठविण्यात आले होते.सुकमा जिल्हा रायपूरपासून ४५० कि. मी. अंतरावर असून निबीड जंगलांमुळे नक्षलवाद्यांविरोधातील मोहिमांवेळी सुरक्षा दलांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. सीआरपीएफच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे एक हजार जवानांना सोमवारी माओवाद्यांविरुध्दच्या मोहिमेवर तैनात करण्यात आले होते. वरील घटनेनंतरही सोमवारी संध्याकाळी ६ वा.पर्यंत माओवादी व जवानांदरम्यान गोळीबार चालू होता. मात्र घटना घडलेल्या भागात सुरक्षा दलांची कुमक वाढविण्यात आली नव्हती. गेल्या चार दिवसांपासून सुरक्षा दले व माओवादी यांच्यात चकमकी सुरू होत्या.