छत्तीसगढमध्ये नक्षलींचा उच्छाद; तरीही 71.11 टक्के मतदानाची नोंद

0
13

>> मिझोरम राज्यात 77.61 टक्के मतदान

छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 20 जागांसाठी, तर मिझोरममधील एकूण 40 जागांसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. छत्तीसगढमध्ये पहिल्या टप्प्यात 71.11 टक्के मतदान झाले, तर मिझोरममध्ये 77.61 टक्के मतदानाची नोंद झाली. छत्तीसगढमध्ये मतदानादरम्यान नक्षलवाद्यांनी दहशत निर्माण केली. कांकेर, नारायणपूर, विजापूर, दंतेवाडा आणि सुकमा येथे नक्षलवादी व सुरक्षा दल यांच्यात चकमक झाली. सुकमा येथे दोन वेगवेगळ्या आयईडी स्फोटात दोन जवान जखमी झाले. याशिवाय कांकेर येथील चकमकीत गोळी लागल्याने एक शेतकरी जखमी झाला. विजापूरमध्ये अनेक नक्षलवादी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर नारायणपूरमधील चकमकीनंतर नक्षलवादी फरार झाले.
छत्तीसगढमधील पहिल्या टप्प्यातील 20 जागांपैकी 10 जागा नक्षल प्रभावित क्षेत्रातील होत्या. या ठिकाणी सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत मतदान झाले. उर्वरित ठिकाणी सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली.

छत्तीसगढमधील 20 जागांसाठी 233 उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये 198 पुरुष आणि 25 महिला उमेदवारांचा समावेश होता.
छत्तीसगडमध्ये मतदान प्रक्रिया सुरू असताना सुकमा येथे तोंडामार्का भागात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफ कोब्रा बटालियनचे दोन जवान जखमी झाले.
मिझोरममध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. सकाळनंतर हळूहळू मतदानाच्या टक्केवारीत वाढ होत गेली. मिझोराममध्ये मुख्य लढत सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट आणि झोरम पीपल्स मूव्हमेंट आणि काँग्रेस यांच्यात आहे. यावेळी एकूण 174 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.

मुख्यमंत्र्यांना सकाळी मतदानाशिवाय परतावे लागले
मिझोरमचे मुख्यमंत्री जोरमथांगा हे सकाळी मतदान करण्यासाठी वेंगलाई-आय वायएमए हॉलमधील मतदान केंद्रावर पोहोचले; परंतु ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. त्यामुळे त्यांना मतदानाशिवाय परतावे लागले. यंत्रातील बिघाड दुरुस्त झाल्यानंतर सायंकाळच्या सत्रात त्यांनी मतदान केले.