छत्तीसगडमध्ये 31 नक्षलवाद्यांचा खात्मा

0
3

>> 1000 जवानांचा कारवाईत सहभाग

>> चकमकीत दोन जवान शहीद, दोन जखमी

छत्तीसगडमधील बिजापूर येथे महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर काल रविवारी झालेल्या चकमकीत 1000 हून अधिक जवानांनी 31 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. मृत्युमुखी पडलेल्या सर्व 31 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बिजापूरच्या इंद्रावती नॅशनल पार्क परिसरात ही चकमक झाली. या ठिकाणी काल उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. त्याचबरोबर मृत नक्षलवाद्यांचीही ओळख पटवली जात आहे. या चकमकीत डीआरजी आणि एसटीएफचा प्रत्येकी एक असे एकूण दोन जवान शहीद झाले तर दोन जवान जखमी झाले आहेत. त्यांना एअरलिफ्ट करून रायपूरला नेण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान,यावेळी घटनास्थळावरून जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे व दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

आतापर्यंत 81 नक्षलवादी ठार
या वर्षी आतापर्यंत छत्तीसगडमध्ये 81 नक्षलवादी मारले गेले आहेत. त्यापैकी 65 फक्त बस्तर विभागात ठार झाले आहेत. त्यात बिजापूरसह 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये वेगवेगळ्या चकमकीत जवानांनी 217 नक्षलवाद्यांना ठार केले होते.
2 फेब्रुवारी रोजी बिजापूर जिल्ह्यातील गांगलूर पोलीस स्टेशन परिसरात सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत 8 नक्षलवादी ठार झाले होते.
मारले गेलेले सर्व माओवादी हे पुरुष नक्षलवादी होते. सुमारे 800-1000 सुरक्षा दलाच्या जवानांनी पीएलजीए कंपनी क्रमांक 2 च्या नक्षलवाद्यांना घेरले होते. त्यात मोठे नेते होते.

गृहमंत्री शहा यांचा इशारा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, कारवाईवर बोलताना 31 मार्च 2026 पूर्वी आपण देशातून नक्षलवादाचा समूळ नायनाट करू असे म्हटले आहे. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो, असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे. अमित शाह यांनी ट्विटमध्ये नक्षलमुक्त भारत करण्याच्या दिशेने छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत 31 नक्षलवाद्यांना ठार मारण्यासोबतच मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटक साहित्यही जप्त करण्यात आले आहे. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करत असल्याचे म्हटले आहे.

20 दिवसांपूर्वी 16 नक्षली ठार

वीस दिवसांपूर्वी 20-21 जानेवारी रोजी गरीबीबंद जिल्ह्यातील जंगलातही चकमक झाली. सुमारे 80 तास चाललेल्या या कारवाईत 16 नक्षलवादी ठार झाले. त्यापैकी 12 नक्षलवाद्यांवर एकूण 3 कोटी 16 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये नक्षल केंद्रीय समितीचे सदस्य चालपती यांचाही समावेश आहे. एकट्या चालपाठीवर 90 लाखांचे बक्षीस होते. नुआपाडा-गारियाबंद-धमतरी विभाग समितीचे प्रमुख सत्यम गावडे हेही चकमकीत मारले गेले.