छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात दोन जवान शहीद

0
8

छत्तीसगडच्या सुकमा आणि विजापूर सीमेवर नक्षलवाद्यांनी काल रविवारी पोलीस दलाचा ट्रक आयईडी स्फोटाने उडवून दिला. या स्फोटात दोन जवान शहीद झाले. जगरगुंडा भागात असलेल्या सिल्जर कॅम्पमधून 201 कोब्रा कॉर्प्सच्या सैनिकांची मूव्हमेंट आरओपी (रोड ओपनिंग ड्यूटी) दरम्यान ट्रक आणि बाइकने टेकलगुडेमकडे निघाली होती. नक्षलवाद्यांनी तिथे वाटेत आईडी ब्लास्ट करण्याची योजना आखली होती. सैनिकांनी भरलेला ट्रक दुपारी 3 च्या सुमारास तेथून निघाला, तेव्हा हा आयईडी स्फोट घडवून आणला. या स्फोटात ट्रकचालक जवान विष्णू आर आणि सहचालक जवान शैलेंद्र हे शहीद झाले. उर्वरित सैनिक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत वाहनाच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. हे जवान शिधा घेऊन कॅम्पमध्ये जात होते. टेकलगुडम आणि त्यापलीकडील पूर्वेकडील भाग हा नक्षलवादी कमांडर हिडमा आणि देवा यांचा बालेकिल्ला आहे.

सहा महिन्यांत 141 नक्षलवाद्यांचा खात्मा

यावर्षी जानेवारी ते 23 जूनपर्यंत बस्तर विभागात जवानांनी 141 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. तर अनेक नक्षलवादी जखमी झाले आहेत. या काळात 7 जवानही शहीद झाले. याशिवाय नक्षलवाद्यांनी अनेकवेळा सैनिक आणि त्यांच्या तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

गप्प बसणार नाही ः मुख्यमंत्री

या घटनेबद्दल मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात 2 कोब्रा सैनिकांचा मृत्यू झाला आहे. शहीद जवानांच्या आत्म्याला शांती मिळो. जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही, नक्षलवाद संपेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा यावेळी मुख्यमंत्री साय यांनी दिला.

दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील उरी भागात दोन दहशतवाद्यांनी भारताच्या नियंत्रणरेषेजवळ येऊन घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय सुरक्षा दलांना या दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दहशतवाद्यांचा एक गट जम्मू-काश्मीरमधील उरी येथील गोहल्लान भागात घुसण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा दलांच्या निदर्शनास आले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा दलाने याला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि नियंत्रणरेषा ओलांडण्याचा प्रयत्न उधळून लावला. दरम्यान सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले.