>> भाजप विधिमंडळ बैठकीत बिनविरोध निवड
>> सात दिवसांनंतर अखेर झाली निवड
>> शपथविधी बुधवारी
छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदी माजी केंद्रीय मंत्री विष्णूदेव साई यांची निवड झाली आहे. काल रविवारी झालेल्या विधिमंडळ बैठकीत मुख्यमंत्रिपदी श्री. साई यांची बिनविरोध निवड झाली. मुख्यमंत्रिपदासाठी निवड झालेल्या साई हे आदिवासी समाजातील आहेत. विष्णूदेव साई हे 1990 पासून राजकारणात असून त्यांना 30 वर्षांपेक्षा जास्त राजकीय अनुभव आहे. संघात चांगला प्रभाव असलेले साई हे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या जवळचे मानले जातात.
छत्तीसगडमध्ये निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर भाजपकडून आदिवासी आणि बिगर आदिवासी चेहऱ्यांचा शोध सुरू हता. माजी केंद्रीय मंत्री रेणुका सिंह, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण साओ, गोमती साई आणि माजी मंत्री लता उसेंडी यांच्या नावाची चोरदार चर्चा सुरू होती. मात्र भाजपने रविवारी राज्य आणि केंद्राच्या राजकारणाचा भरपूर अनुभव असलेल्या विष्णुदेव साई यांची निवड केली.
तिसऱ्यांदा आमदार
संयुक्त मध्यप्रदेश विधानसभेत आमदार म्हणून साई हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. यावेळी त्यांनी कुंकुरीत काँग्रेसच्या उद मिंज यांचा पराभव केला. 1990 मध्ये ते संयुक्त मध्य प्रदेशमध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते.
विष्णूदेव यांनी केंद्रातही मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडताना ते चारवेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. 2014 ते 2019 दरम्यान ते केंद्रीय राज्यमंत्रीही होते.
मुख्यमंत्री झाल्यानंतर विष्णुदेव साई यांनी, छत्तीसगड विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत माझी मुख्यमंत्रिपदी निवड केल्याबद्दल मला खूप आनंद झाला असून सर्वप्रथम मी भाजपचे आभार मानतो. मी सर्वांच्या विश्वासावर पूर्ण प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करेन. 18 लाख घरांचे काम आधी करेन. जनतेचा विश्वास संपादन करत 100 टक्के काम करण्याचा प्रयत्न करेन असे सांगितले.
राजस्थान विधिमंडळ पक्षाची आज बैठक
राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी आज सोमवारी विधिमंडळ बैठक होणार आहे. निरीक्षक संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्यसभा खासदार सरोज पांडे आणि राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे काल रविवारी राजस्थानला पोहोचले आहेत. दरम्यान, आजच्या विधिमंडळ बैठकीपूर्वी या बैठकीपूर्वी प्रदेश भाजपने सर्व आमदारांना जयपूरला बोलावले आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांशिवाय दोन उपमुख्यमंत्री बनवण्याचा फॉर्म्युलाही लागू केला जाऊ शकतो.
राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी रात्री आमदारांशी संवाद साधला. राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी व्हीसीच्या माध्यमातून सर्व नवनिर्वाचित आमदारांशी संपर्क साधला. विकास भारत संकल्प यात्रा आणि पक्षाच्या आगामी कार्यक्रमांबाबत आमदारांशी चर्चा केली.
बाबा बालकनाथ शर्यतीत नाहीत
बाबा बालकनाथ यांनी मुख्यमंत्री होण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना नकार दिला. त्यांनी सोशल मीडियावरकृपया माझ्याबद्दल लावल्या जात असलेल्या चर्चांकडे दुर्लक्ष करा. मला अजून अनुभव घ्यायचा आहे असे म्हटले आहे.
13 रोजी शपथविधी
बुधवार दि. 13 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होणार असून या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री शपथ घेणार आहेत. तसेच राज्यात दोन उपमुख्यमंत्री असतील असे निश्चित झाले आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर, अरुण साओ आणि विजय शर्मा उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. तर माजी मुख्यमंत्री रमण सिंह हे विधानसभा अध्यक्ष पदाची धुरा सांभाळतील. नवे मुख्यमंत्री विष्णूदेव साई यांनी राज्यपाल विश्वभूषण हरिश्चंद्र यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.