चौथ्या दिवशी भारताला ३० सुवर्णपदके

0
123

>> १३वी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा

येथे सुरू असलेल्या १३व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आपला धडाका सुरूच ठेवताना काल तब्बल ३० सुवर्णपदके मिळविली. काल मिळविलेल्या ३० सुवर्ण, १८ रौप्य व ८ कांस्यपदकांमुळे भारताने पदकतक्त्यात शंभरी पार केली आहे.
६२ सुवर्ण, ४१ रौप्य आणि २१ कांस्य मिळून भारत एकूण १२४ पदकांसह आपले अव्वल स्थान भक्कम केले आहे. यजमान नेपाळ ३६ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३८ कांस्य मिळून १०१ पदकांसह दुसर्‍या स्थानी तर श्रीलंका १७ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ५५ कांस्य मिळून १०७ पदकांसह तिसर्‍या स्थानी आहे.

काल गुरुवारी चौथ्या दिवशी ऍथलेटिक्ससह वुशू आणि जलतरणमध्ये भारताने शानदार कामगिरी केली. काल एकाच दिवशी भारताने ५६ पदके आपल्या खात्यात जमा केली. जलतरणमध्ये काल भारतीय जलतरणपटूंनी ४ सुवर्णांसह एकूण ११ पदके प्राप्त केली. त्यात ६ रौप्य आणि १ कांस्यपदकाचा समावेश आहे. लिखित सेल्वराज प्रेमाने २०० मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये २ मिनिटे १४.६७ सेकंदाची वेळ देत सुवर्णपदक प्राप्त केले. तर दानुश सुरेशने (:१९.२७) रौप्यपदक मिळविले. अपेक्षा फर्नांडिसने पुरुषांच्या २०० मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये :३८.०५ अशी वेळ देत सुवर्ण पदक मिळविले. दिव्या सतिजाने महिलांच्या १०० मी. बटरफ्लायमध्ये १:०२.७८ अशी वेळ देत सुवर्णपदक मिळविले. तर महिलांच्या ४०० मी. फ्रीस्टाईल रिले संघानेही सुवर्ण कामगिरी करताना ३:५५.१७ अशी वेळ दिली. वेटलिफ्टिंगमध्ये भारताने काल चार सुवर्णपदके मिळविली. झिल्ली दलबेहराने ४५ किलो वजनी गटात १५१ किलो वजन उचलत सुवर्णपदक मिळविले. ४९ किलो वजनी गटात स्नेहा सोरेनने १५७ किलो वजन उचलत सुवर्णपदक मिळविले. ५५ किलो वजनी गटात सोरोखैंबम बिंदयारानी देवीने १८१ किलो वजन उचलले तर भारताला चौथे सुवर्णपदक मिळवून देताना पुरुषांच्या ६१ किलो वजनी गटात सिद्धान्त गोगोईने २६४ किलो वजन उचलले. तायक्वांदोत काल भारतीय खेळांनी आकर्षक कामगिरी केली. त्यांनी ३ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्यपदक मिळवून एकूण ६ पदके मिळविली. महिलांच्या विभागात पूर्वा दिक्षित (४९ किलो), रुचिका भावे (६७ किलो) आणि मार्गारेट मारिया (८७ किलो) यांनी सुवर्णपदके मिळविली. तर निरज चौधरी (५८ किलो) व अक्षय हूडा (८७ किलो) यांना रौप्यपदकांवर समाधान मानावे लागले. ऍथलेटिक्समध्ये काल भारताने काल एका सुवर्णपकासह एकूण ६ पदके पदकतक्त्यात जमा केली. तिहेरी उडीत कार्तिक उन्नीकृष्णनने १६.४७ अंतर कापत सुवर्णपदक मिळविले. तर भराताच्याच मोहम्मद सलालुद्दीने १६.१६ मी. अंतर पार करीत रौप्यपदक प्राप्त केले.दरम्यान, फुटबॉलमध्ये काल महिलांनी श्रीलंकेवर एकतर्फी विजय मिळविला. पोखरा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात त्यांनी लंकेचा ६-० असा धुव्वा उडविला.

बॅडमिंटनमध्ये अश्मिता छलिहा आणि गायत्री गोपिचंद यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तर पुरुषांच्या एकेरीत सिरील वर्मा आणि आर्यमन टंडन यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भारताची सुवर्ण आणि रौप्यपदके निश्‍चित झाली आहेत.