चौकशी व्हावीच, पण..

0
132

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्लीतून हुबळीला घेऊन जाणार्‍या खासगी छोटेखानी विमानात नुकत्याच उड्डाणादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडांमागे घातपात असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. त्यासंदर्भात हुबळीत पोलीस तक्रारही दाखल झाली आहे. राहुल गांधींसारख्या महत्त्वपूर्ण राजकीय नेत्याच्या विमानामध्ये अशा प्रकारे तांत्रिक बिघाड होणे ही दुर्लक्षिण्याजोगी बाब नाही. त्यासंबंधी सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. राहुल यांच्या विमानात झालेल्या बिघाडासंबंधी कळताच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विचारपूस केली ही स्वागतार्ह बाब. आपला राजकीय विरोधक म्हणजे वैरी नव्हे ही उदारता नेत्यांमध्ये दिसलीच पाहिजे. राहुल गांधींना घेऊन जाणारे दासाल्ट फाल्कन २००० हे दहा आसनी छोटेखानी विमान दिल्लीहून सकाळी हुबळीकडे निघाले. आकाशात ४१ हजार फुटांवर असताना त्यातील स्वयंचलित पायलट यंत्रणा बंद पडली. विमान एका बाजूला कलले. एका बाजूने आवाज येऊ लागला. अचानक विमानाची उंची खाली गेली. थडथडाट ऐकू येऊ लागला. काही काळ रडारवरून हे विमान दिसेनासे झाले. हुबळी विमानतळावर ते उतरवण्याचे दोन प्रयत्न असफल झाले आणि शेवटी तिसर्‍या प्रयत्नात विमान उतरवले गेले. विमानातील बिघाडाचे स्वरूप पाहिल्यास राहुल यांचे दैव बलवत्तर होते असेच म्हणावे लागेल. खराब हवामानात अशा छोट्या विमानांमध्ये अशा गोष्टी घडू शकतात, परंतु बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाश असताना व हवामान उत्तम असताना हे सारे घडणे निश्‍चितच शंकित करणारे आहे. त्यात राहुल गांधींसारखा व्हीव्हीआयपी पाहुणा विमानात असताना असे घडणे हे अधिक गंभीर आहे, कारण आजवर त्यांच्या काकांसह अनेक राजकीय नेत्यांचा अशा प्रकारच्या हवाई दुर्घटनांमध्ये बळी गेलेला आहे. संजय गांधी तर दिल्लीत सफदरजंग विमानतळाजवळच त्यांचे ग्लायडर कोसळून ठार झाले होते. आजवर अनेक नेत्यांचा हेलिकॉप्टर अथवा छोट्या – मोठ्या विमान दुर्घटनांमध्ये अकाली बळी गेला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांचे हेलिकॉप्टर चित्तूर जिल्ह्यात कोसळले तेव्हा तब्बल २७ दिवस त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. लोकसभेचे सभापती बालयोगी यांचे हेलिकॉप्टर खराब हवामानात जमीन समजून पाण्यावर उतरल्याने त्यांचा दुर्दैवी बळी गेला होता. माधवराव शिंदे जाहीर सभेसाठी जात असताना विमान कोसळून ठार झाले होते. केंद्रीय मंत्री कुमारमंगलम इंडियन एअरलाइन्सचे विमान दिल्लीजवळ कोसळले त्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले होते. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत बळी गेला. अशा अनेक राजकारण्यांचे प्राण हवाई दुर्घटनांत गेले आहेत आणि अनेकजण सुदैवीही ठरले आहेत. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई पुष्पक विमानाच्या एका मोठ्या दुर्घटनेतून आश्चर्यकारकरीत्या बचावले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेकदा हेलिकॉप्टर दुर्घटनांतून सुरक्षितरीत्या बचावले आहेत. राजनाथसिंह, मुख्तार अब्बास नक्वींसारखे भाजप नेते, अहमद पटेल, पृथ्वीराज चव्हाणांसारखे कॉंग्रेस नेतेही अशा हवाई दुर्घटनांचा अनुभव घेऊन शहाणे झाले आहेत. राजकारणी वा उद्योजक मंडळी वेळ वाचवण्यासाठी हवाई प्रवासाचा अवलंब करीत असतात, परंतु ही छोटी हेलिकॉप्टरे किंवा छोटेखानी विमाने उड्डाणास अनेकदा सज्ज नसतात, परंतु नेत्यांना घाई असते, त्यामुळे धोका पत्करून उड्डाणे केली जातात आणि दुर्घटनांना आमंत्रण मिळते. राहुल गांधी यांच्या विमानाची तांत्रिक सुसज्जता पाहणे ही संबंधितांची जबाबदारी होती. हे विमान एका खासगी कंपनीच्या मालकीचे. दिल्लीच्या एका चार्टर कंपनीच्या माध्यमातून राहुल गांधींसाठी ते भाड्याने घेण्यात आले होते. राहुल गांधी यांना खास एसपीजी सुरक्षा आहे. त्यामुळे त्यांच्या विमान प्रवासाची आगाऊ माहिती डीजीसीएला व एसपीजीला दिली जाते. अशा वेळी विमानाची उड्डाणपूर्व कसून तपासणी व्हायलाच हवी होती. मग असा मोठा बिघाड विमानात कसा राहू शकतो? म्हणजेच या विमानोड्डाणाबाबत गंभीर तांत्रिक त्रुटी राहिलेल्या असू शकतात. त्याची चौकशी व्हायला हवी. कॉंग्रेसने या घटनेला राजकीय रंग देणे उचित नाही. तांत्रिक बिघाडाची चौकशी व्हावी इथपर्यंत त्यांनी केलेली मागणी रास्त आहे, परंतु हा बिघाड मुद्दामहून घडवला गेला असावा असे म्हणणे हा अतिरेक वाटतो. जोवर यासंबंधीची सखोल चौकशी होत नाही व निष्कर्ष बाहेर येत नाहीत, तोवर अशा प्रकारे संशय व्यक्त करून राजकीय रंग देणे गैर आहे. कर्नाटकच्या निवडणुकीचा माहौल सध्या तापला आहे. त्यामुळे अशा घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त केल्याने आपल्या पक्षाला जनतेची सहानुभूती मिळेल असा स्वार्थी विचार कॉंग्रेस नेत्यांच्या मनात डोकावला असण्याची शक्यता आहे, परंतु कोणताही पुरावा नसताना अशा प्रकारचा आरोप केंद्रातील सत्ताधारी पक्षावर करणे ही फार गंभीर बाब आहे. या घटनेला वेगळे वळण देण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो उचित म्हणता येत नाही.