>> २१ दिवसांत १२९ बळी, बुधवारी दोन मृत्यू
राज्यात चोवीस तासांत नवे ३०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून २ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच काळात ४०८ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ३३९ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ३०९९ एवढी झाली आहे. गोमेकॉतील कोविड प्रयोगशाळेत १२६२ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ३०८ नमुने पॉझिटिव्ह आढळले.
२१ दिवसांत १२९ बळी
राज्यातील कोरोना मृत्यूंची एकूण संख्या ५५७ एवढी झाली आहे. राज्यात ऑक्टोबर महिन्यात २१ दिवसात १२९ जणांचा बळी गेला आहे. राज्यात सरासरी दरदिवशी सहा रुग्णांचा मृत्यू होत आहे. गोमेकॉमध्ये पोंबुर्पा येथील ८७ वर्षीय पुरुष आणि आंबावली येथील ५९ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१६ टक्के एवढी झाले आहे. चोवीस तासांत ४०८ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३७ हजार ६८३ एवढी झाली आहे. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन १७४ रुग्णांनी होम आयसोेलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन ४५ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.
पणजीत नवे १० रुग्ण
पणजी परिसरात नवे १० रुग्ण आढळून आले असून पणजीत रुग्णांची एकूण संख्या १६३ झाली आहे. मिरामार, पणजी शहर, सांतइनेज, करंजाळे, पणजी मार्केट आदी परिसरात नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोविड केअर सेंटरमधील रुग्णांची संख्या कमी होत आहे. कोविड केअर सेंटरमधील ७५ टक्क्यांपेक्षा जास्त खाटा रिकाम्या आहेत. उत्तर गोव्यातील कोविड सेंटरमधील ४६९ खाटांपैकी ३१९ तर दक्षिण गोव्यातील कोविड सेंटरमधील १००६ खाटांपैकी ७८९ खाटा रिक्त आहेत. उत्तर गोव्यात पर्वरी परिसरात सर्वाधिक २४२ रुग्ण आहेत. चिंबल १८७, कांदोळी ११०, पणजी १६३, म्हापसा १६१ तर साखळीत १२२ रुग्ण आहेत. दक्षिण गोव्यात मडगाव परिसरात सर्वाधिक ३०२ रुग्ण आहेत. वास्को १९९, कुठ्ठाळी १३२ तर फोंडा १८२, आहेत. इतर ठिकाणी रुग्णांची संख्या शंभरांपेक्षा कमी आहे.