चोवीस तासांत राज्यात 3.42 इंच पाऊस

0
4

>> आतापर्यंत एकूण 70.5 इंचांची नोंद

राज्याला सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसाने झोडपून काढले. राज्यात चोवीस तासांत 3.42 इंच पावसाची नोंद झाली आहे. चोवीस तासांत वाळपई येथे सर्वाधिक 7.74 इंच पावसाची नोंद झाली.
राज्यात आतापर्यंत 70.05 इंच पावसाची नोंद झाली आहे. सांगे येथे आतापर्यंत सर्वाधिक 79.57 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे.
काही ठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने नागरिक व वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला. येत्या 21 जुलैपर्यंत पावसाची जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच, 22 व 23 जुलैला काही भागात जोरदार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

पडझडीच्या 56 घटना
राज्यात चोवीस तासांत झाडांच्या पडझडीच्या आणखी 56 घटनांची नोंद झाली आहे. तर, बुधवार 19 जुलै रोजी सकाळपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत झाडांच्या पडझडीच्या आणखी 9 घटनांची नोंद झाली आहे.
राज्यातील पावसाचे प्रमाण 13.4 टक्के एवढे अधिक आहे. म्हापसा येथे 4.29 इंच, पेडणे येथे 3.49 इंच, फोंडा येथे 3.02 इंच, पणजी येथे 4.10 इंच, साखळी 6.90 इंच, वाळपई 7.74 इंच, काणकोण येथे 0.92 इंच, दाबोळी येथे 1.47 इंच, मडगाव येथे 2.17 इंच, मुरगाव 1.72 इंच, केपेे 3.55 इंच, सांगे 2.70 इंच पावसाची नोंद झाली.

साळावली धरणात 94% पाणी साठा

राज्यातील साळावली या प्रमुख धरणातील पाण्याचा साठा 94 टक्क्यावर पोहोचला आहे. तर, पंचवाडी येथील म्हैसाळ धरण भरण्याचा मार्गावर असून पाणीसाठा 99 टक्के एवढा आहे. गवाणे धरणात 92 टक्के, चापोली धरणात 73 टक्के, आमठणे धरणात 85 टक्के पाणीसाठा आहे. राज्यातील सर्व धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असली तरी, सत्तरीतील अंजुणे धरणातील पाणीसाठा अजूनपर्यंत कमीच आहे. अंजुणे धरणामध्ये आत्तापर्यंत 35 टक्के पाण्याचा साठा झाला आहे.

वाळपई, म्हापसा, जुने गोवा, पणजी व इतर भागात पावसाचा जोर कायम आहे. काल 19 रोजी सकाळी 8.30 वाजल्यापासून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यत वाळपई येथे 1.63 इंच पावसाची नोंद झाली आहे. म्हापसा येथे 1.61 इंच, जुने गोवा येथे 1.55 इंच, पणजी येथे 1.06 इंच, मडगाव येथे 0.90 इंच पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.