>> आणखी एका रुग्णाचे निधन
>> एकूण बळींची संख्या १८
राज्यात काल नवीन कोरोना पॉझिटिव्ह १७० रूग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनाबाधित आणखी एका रूग्णाचे मडगाव येथील कोविड इस्पितळात उपचार चालू असताना निधन झाले असून कोरोना बळींची संख्या १८ झाली आहे. सलग चौथ्या दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या निधनाच्या घटनेची नोंद झाली आहे.
मुरगावात ५६२ पॉझिटिव्ह
कोविड इस्पितळामध्ये उपचार घेणार्या चिखली वास्को येथे ४७ वर्षीय रूग्णाचे मंगळवारी सकाळी निधन झाले. कोविडमुळे मुरगाव तालुक्याला जबर फटका बसला आहे. आत्तापर्यत या भागातील ५६२ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. तर, कोरोना विषाणूमुळे १२ जणांचा बळी गेला आहे.
मडगाव येथील कोविड इस्पितळात आणखी एका व्यक्तीच्या निधनाची घटना घडलेली आहे. परंतु, या व्यक्तीची कोविड चाचणी निगेटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीचा कोरोना बळीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत होणारी वाढ सुरूच आहे. कोरोना विषाणूचा फैलाव नवनवीन विभागात होत आहे. मांगूर हिलनंतर वेर्णा येथील एका कंपनीतून राज्यातील विविध मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा फैलाव होत आहे. या कंपनीमध्ये काम करणारे अनेक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. या कंपनीतील सुमारे २० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांनी सदर कंपनी १४ दिवस बंद ठेवण्याचा आदेश दिलेला आहे.
कासारवर्णे, करासवाडा, शेळपे- म्हापसा येथे नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गिरी येथे १ आयसोलेटेड कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.
कासारवर्णे येथे ६ कोरोनो पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर, करासवाडा येथे ९ रुग्ण आढळले आहे.
तुलीप कंपनीत १३६ रूग्ण
वेर्णा येथील तुलीप फार्मा कंपनीमध्ये नवीन ५६ रुग्ण आढळल्याने रुग्णांची एकूण संख्या १३६ झाली आहे.
फोंडा, वाळपई, उसगाव, मडकई येथील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. फोंड्यात ५ नवीन रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ४१ झाली आहे. वाळपईत १ रुग्ण आढळला असून रुग्णसंख्या २३ झाली आहे. उसगावात नवीन २ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ७ झाली आहे. मडकईत नवीन ३ रुग्ण आढळले असून संख्या ६ झाली आहे.
कुडका, शंकरवाडी येथे नवीन १ रुग्ण आढळून आला असून रुग्णसंख्या ५ झाली आहे. साखळीत आणखी ४ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या २८ झाली आहे.
मडगाव येथे नवीन ३ रुग्ण आढळले असून रुग्ण संख्या १३ झाली आहे. नावेली येथे आणखी १ रुग्ण, केपे येथे आणखी १ रुग्ण आढळून आला आहे. कुडतरी येथे आणखी १ रुग्ण आढळून आला आहे.
मांगूर हिलमध्ये नवीन १ रुग्ण आढळला आहे. तर, मांगूर लिंकमध्ये नवीन ९ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ३०६ झाली आहे. नवेवाडे वास्को येथे नवीन ९ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ९२ झाली आहे.
राज्यपालांनी आज
बोलावली बैठक
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्यपाल मलिक यांनी राज्यातील कोरोना विषाणूच्या एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, मुख्य सचिव, आरोग्य खात्याचे अधिकारी यांची उच्च पातळीवरील आज बुधवारी बैठक बोलावली आहे.
कोविड-१९ योद्ध्यांसाठी खाटा राखीवतेचा आदेश
आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा यांनी राज्यातील खासगी इस्पितळांना अतिदक्षता विभागातील (आयसीयू) २० टक्के खाटा कोविड व्यवस्थापनासाठी राखीव ठेवण्याबाबतचा आदेश काल जारी केला. खासगी इस्पितळांकडून कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी आकारण्यात येणार्या शुल्काची माहिती आरोग्यखात्याला सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.