>> स्वप्निल वाळके खून; हल्ल्याची योजना एक महिना अगोदरच
कृष्णी ज्वेलर्सचे मालक स्वप्निल वाळके यांच्या खून प्रकरणाचा सखोल तपास करण्याची जबाबदारी गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांवर असून हा खून चोरीच्या उद्देशाने झाला नसल्याचे प्राथमिक तपासात दिसून येते. कोणीतरी त्यांचा काटा काढण्यासाठी मुस्तफा शेख व त्याच्या टोळीला सुपारी दिली असावी असे त्या टोळीतील एडसन गोन्साल्विस याने दिलेल्या जबानीवरून समजते.
स्वप्निल वाळके यांचा खून गेल्या बुधवारी दुपारी १२ वा. मडगाव येथील दुकानात पिस्तुलने गोळी झाडून व चाकूने वार करून केला.
या प्रकरणी ओंकार पाटील, इव्हेंडर रॉड्रिगीस, मुख्य आरोपी मुस्तफा शेख व एडसन गोन्साल्विस यांना गुन्हा अन्वेषण विभागाने पकडून मडगाव येथे आणले व घटनास्थळी पहाणी करून नेले. या कामी निरीक्षक सी. एल. पाटील यांची नियुक्ती केली असून त्यांनी तपास सुरू केला. एडिसन गोन्साल्विस याला पोलीस घेऊन जात असताना पत्रकारांनी विचारले असता त्याने या खुनाची योजना एक महिन्याआधी झाली होती. मात्र ती कोणाची होती हे ठाऊक नसल्याचे सांगितले. या प्रकरणी मुस्तफा याला सुपारी दिली असल्याचे एडसन याने सांगितले. हे हल्लेखोर दोन महिन्यांपूर्वी मडगाव येथील एका हॉटेलमध्ये खोली घेऊन राहिले होते. त्यावेळी त्यांनी उत्तर गोव्यात लुटलेल्या दागिन्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न चालविला होता. याबाबत पोलीस त्यांना त्या त्या सराफांकडे घेऊन जाणार आहेत. लॉकडाऊन असल्याने हॉटेल्स बंद होती. तरीही हे आरोपी कोणत्या हॉटेलात थांबले होते व कोणत्या नावाने थांबले याचा तपास पोलीस करीत आहेत.
मुस्ताफाने केलेला गोळीबाराचा सराव
या घटनेतील मुख्य संशयित आरोपी मुस्ताफा याने काही दिवसांपूर्वी केपे व नेसाय येथील जंगलात दोन गोळ्या झाडून गोळीबाराचा सराव केला होता. अशी धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली आहे.