>> पणजी पोलिसांच्या तपासात उघड; कोल्हापुरातील एकास अटक
पणजी शहरातून ‘रेंट-अ-बाईक’द्वारे भाडेपट्टीवर मिळणाऱ्या दुचाकींची चोरी करून त्या ‘ओएलएक्स’ वेबसाईटवर विक्री करण्याचा अजब प्रकार पणजी पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. या प्रकरणी कोल्हापूर येथील सद्दाम खलबुद्दीन जमादार (32) याला पणजी पोलिसांनी अटक केली असून, तपासाअंती त्याच्याकडून चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. जमादार याने ओएलएक्सवर दोन दुचाकींच्या विक्रीतून दोन लाख रुपये मिळविल्याचे उघड झाले आहे.
पाटो-पणजी येथे पार्क केलेली ॲक्टिव्हा दुचाकी चोरताना संशयित सद्दाम जमादार याला 5 जुलै रोजी रंगेहाथ पकडण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी करताना संशयिताने ‘रेंट-अ-बाईक’खाली दुचाकी वाहने भाडेपट्टीवर घेतल्यानंतर ती महाराष्ट्रात नेऊन विकल्याचे उघडकीस आले. ‘ओएलएक्स’ वेबसाईट्चा वापर जुन्या सामानाच्या विक्रीसाठी केला जातो. त्या साईटचा आधार घेत चोरट्याने पणजीतून ‘रेंट अ बाईक’ व्यावसायिकांकडून भाडेपट्टीवर घेतलेल्या दोन ॲक्टिवा दुचाकी महाराष्ट्रात नेऊन ओएलएक्सद्वारे वेगवेगळ्या ग्राहकांना विकल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
या प्रकरणी चिंबल येथील सचिन उसगावकर यांनी येथील पोलीस स्थानकात दुचाकी चोरी प्रकरणी तक्रार दाखल केली होती. पाटो-पणजी येथे एका दुकानाजवळ पार्क केलेली ॲक्टिवा दुचाकीची चोरताना सद्दाम जमादार याला सचिन उसगावकर यांनी रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर पणजीतील तीन ‘रेंट-अ-बाईक’ व्यावसायिकांनी पोलीस स्थानकात त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. संशयिताने बनावट आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सादर करून वेगवेगळ्या नावांवर दुचाकी वाहने नेली होती; मात्र ती अद्याप परत केली नाहीत. सद्दाम याच्याशी मोबाईवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तो फोन कॉल टाळत आहे, असे तक्रारीत म्हटले होते.
दरम्यान, चोरी प्रकरणात यापूर्वीही सद्दामला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो जामिनावर सुटला होता.
संशयिताकडून 4 दुचाकी जप्त
या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशीला सुरुवात केल्यानंतर अचंबित करणारी माहिती उघड झाली. सद्दाम जमादार हा रेंट अ बाईकवर भाडेपट्टीवर घेतलेल्या दुचाकी कोल्हापूर येथे नेऊन त्यांचा नोंदणी क्रमांक बदलायचा आणि त्यांची विक्री करायचा. ओएलएक्सवरून दोन दुचाक्या तब्बल 2 लाखांना विकल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील ग्राहकांना या गाड्या विकल्या होत्या. पणजी पोलिसांनी या दोन गाड्यांसह आणखी एक तिसरी गाडीही जप्त केली आहे. कळंगुट पोलीस स्थानकात चोरीची नोंद झालेली दुचाकी देखील जप्त केली आहे.