चोरट्यांकडून 1 कोटीचे दागिने हस्तगत

0
4

>> ‘नास्नोडकर ज्वेलर्स’मधील चोरी प्रकरणी चौघा जणांना अटक

म्हापसा बाजारपेठेतील चंद्रमोहन नास्नोडकर यांच्या मालकीचे ‘नास्नोडकर ज्वेलर्स’ या सराफी दुकानात झालेल्या चोरी प्रकरणातील दोन बाल गुन्हेगारांना सिंधुदुर्गातून, तर इतर दोघांना अजमेर-राजस्थान येथून म्हापसा पोलिसांनी अटक केली. म्हापसा शहरातील रात्रीची गस्त आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने या आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीचा चार दिवसांत पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी चोरीला गेलेले 1 किलो सोन्याचे व 12 किलो चांदीचे सुमारे 1 कोटीहून अधिक किमतीचे दागिने या चोरट्यांकडून जप्त करण्यात केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी काल दिली.

सविस्तर माहितीनुसार, म्हापसा बाजारपेठेतील गजबजलेल्या ठिकाणी असलेले चंद्रमोहन नास्नोडकर यांच्या मालकीचे नास्नोडकर ज्वेलर्स हे सराफी दुकान चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री 2 ते सोमवारी पहाटे 4 वाच्या दरम्यान फोडले होते. चोरट्यांनी दुकानाच्या छपरावरून आत प्रवेश केला आणि कोट्यवधी रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्या होत्या.

या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे हरजी पूनम सिंग चौहान (26) आणि भवानी हिरा सिंग (18) अशी आहेत. अन्य दोघे अल्पवयीन आहेत. हे सर्वजण राजस्थानमधील अजमेर येथील कृष्णनापुराली कंकर गावातील आहेत. ते चोरी केल्यानंतर रेल्वेमधून अजमेरला जाण्यासाठी प्रवास करत होते. त्यापूर्वीच पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने त्यांना गजाआड केले. या तपासकामासाठी तीन वेगवेगळी पोलिस पथके स्थापन करून ती मुंबई, गुजरात व राजस्थान येथे पाठवण्यात आली होती. रेल्वे पोलिसांचीही मदत घेण्यात आली होती. अटक केलेल्या दोन बाल गुन्हेगारांची रवानगी ‘अपना घर’मध्ये करण्यात आली आहे, तर अन्य दोन संशयितांना पोलीस कोठडी घेण्यात आल्याचे अक्षत कौशल यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक अक्षत कौशल व उपअधीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हापसा पोलीस निरीक्षक निखिल पालेकर व त्यांच्या चार पोलीस पथकांनी ही कारवाई यशस्वी केली.

रात्रीच्या गस्तीचा झाला मोठा फायदा

नास्नोडकर ज्वेलर्स हे सराफी दुकान फोडल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली होती. त्याचदिवशी म्हणजेच रविवारी रात्री नेहमीप्रमाणे म्हापसा पोलीस गस्तीवर असताना त्यांनी दोन संशयास्पद तरुणांना थांबवून त्यांची चौकशी केली होती. त्यांची छायाचित्रेही गस्तीवरील त्या पोलिसाने मोबाईलवर काढली होती. त्यामुळे सराफी दुकानात चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या बुरखाधारी चोरट्यांचे वर्णन या छायाचित्रांशी मिळतेजुळते आढळल्याने तपासकामात मदत झाली.