विशेष संपादकीय
‘मुक्तपणान दियात, घेयात
उतराक उतर, सुराक सूर जोडून
काळजांतले कवीत गायात…’
कसदार कोकणी कवी, कुशल संघटक, लढवय्या स्वातंत्र्यसेनानी, आपले सामाजिक भान सदैव जागे ठेवणारा – भाषेचा प्रश्न असो वा राष्ट्रीयत्वाचा, वयाचा विचार न करता रस्त्यावर उतरायला क्षणभरही न कचरणारा निःस्पृह कार्यकर्ता आणि एक दिलखुलास जिंदादिल माणूस, असे नागेश करमली नावाचे सदैव सळसळते चैतन्य काल हरपले. कोकणी कवितेचा एक स्तंभ कोसळला. गोव्याच्या मातीत जन्मलेला, मातीत वाढलेला आणि ‘आमी या भुयेचो कस घोटिल्ले, ह्या युगमंथनांत रूख जावन वीख पचयिल्ले’ म्हणत आयुष्यभर या मातीचे सुक्त गाणारा हा निजाचा कवी आता आपल्याला दिसणार नाही. जाताना आपल्या कवितेचे ‘वंशकुळाचे देणे’ मात्र तो जरूर मागे ठेवून गेला आहे.
खरे तर हा एका दुकानदाराचा मुलगा. घरी ना कवितेचे संस्कार, ना साहित्याचे. अवतीभवती प्रोत्साहन देणारे, पाठराखण करणारे कोणीही नव्हते, परंतु ‘आपल्या एकाकीपणात आतली खदखद व्यक्त करू पाहणारे मन आपणहून बोलू लागले व आपली कविता जन्मली’ असे त्यांनीच आपल्या एका संग्रहाच्या प्रस्तावनेत लिहून ठेवले आहे. कोकणी भाषेचा हा ‘निजधर्माचा दिष्टावा’ आपल्याला आपला पुनर्जन्मच वाटल्याचेही त्यांनी त्यात नमूद केले आहे. सुदैवाने बाकीबाब बोरकर नावाच्या परिसाचा स्पर्श या मुलाला विद्यार्थिदशेत झाला आणि समोरचे ते गाणारे झाड पाहत पाहत मोठा होताना, या मुलाच्या ह्रदयस्पंदनांनीही कवितेची योग्य लय पकडली. त्यामुळेच कोकणी कवितेचे दालन खऱ्या अर्थाने समृद्ध करणारे आणि ‘कविता म्हणजे काय’ हे नेमके उमजलेले जे मोजके कवी कोकणीत आहेत, त्यामध्ये नागेश करमली हे एक बिनीचे नाव म्हणावे लागते. ते कोकणी साहित्यिक असले, तरी प्राथमिक शिक्षण मराठीतून झालेले असल्याने उत्कृष्ट मराठी लिहायचे. जोवर जमायचे, तोवर नवप्रभेसाठीही आमच्या आग्रहावरून त्यांनी सतत लिहिले; ना वयाची चिंता केली, ना मानधनाची. ऊर्दू आणि बंगालीही त्यांना येत असे आणि कर्नाटकातील कोकणी साहित्य वाचता यावे यासाठी कन्नड लिपीचाही अभ्यास त्यांनी केलेला होता. खलिल जिब्रानचा ‘प्रोफेट’ समजावा यासाठी तर त्यांनी अख्खे बायबल वाचून काढले होते.
नागेश करमलींची कविता ही नुसती फुलापानांची कविता नाही. तो सामाजिक जाणिवांचा जागता हुंकार आहे. पूर्वी खाणीवर काम करीत असताना खेड्यापाड्यांतील गोरगरीबांचे दुःख, व्यथा, वेदना त्यांनी जवळून पाहिली, अनुभवली. त्या उपेक्षित कष्टकऱ्याशी त्यांची नाळ सदैव जुळलेली राहिली.
‘आमी हे भुयेचो कस घोटिल्ले,
ह्या युगमंथनांत रूख जावन विख पचयिल्ले’
उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या ‘भुंयदेवा’चे स्तोत्र गाताना या देवाचे दर्शन कर्मकांडांनी नव्हे, तर ‘धर्तरेची आस – भास जाका कळता’ त्यालाच ते घडेल, असे हा कवी सांगून गेला. जातीपातीच्या जंजाळात अडकून पडलेला आपला समाज व्यथितपणे एकीकडे पाहत असताना ‘दिगंतराक वचूंक गेल्ले ते मात केन्नाच दिको हुपून गेले, आमी मात पळोवपाचेच काम केले’ ही विलक्षण अस्वस्थता या कवीच्या कवितेतून प्रखरपणे प्रकटली. फॅसिझमवरची करमलींची ‘फासिझम’ ही दीर्घकविता तर आजही पडताळून पाहण्यासारखी आहे.
भोवतीचा निसर्ग जसा गोमंतकीय कवींना प्रेरणा देत आला आहे, तसाच करमलींच्या कवितेतूनही अर्थातच तो प्रकटल्याविना राहत नाही. वृक्षांचे, लाटांचे, ढगांचे, किरणांचे मुक्त – विमुक्त आनंदसुक्त त्यानेही मनमुराद गायिले आहे, परंतु करमलींची कविता हे खरे ‘मनीसपणाचे गीत’ आहे. ते ‘ह्या थळाचे आणि थळावे’ आहे. ती जशी रौद्र आहे, तितकीच सौम्य आहे. ‘सलाम करीत रावचेले ते दीस आता गेले’ याची प्रखर जाणीव जशी ती करून देते, तशीच ‘मेळ म्हाका मेळ, सुकतेवेळार मेळ’ सारखे प्रेमाचे तरल गीतही गाते.
‘दर्याची खर खोलाय, म्हाका म्हज्या काळजांत जाय
मळबाची विशाळकाय म्हाका म्हजे नदरेंत जाय
पर्जळाची रास म्हाका म्हजे भोवतणी जाय
परमळाची भास म्हाका म्हज्या उतरांनी जाय’ असे म्हणता म्हणता धरित्रीचे प्रेमही आपल्या रंध्रांमध्ये रहावे अशी अपेक्षा तर हा कवी व्यक्त करतोच, शिवाय ‘आवेगाचो धग म्हाका म्हजे कवितेंत जाय
फुडाराचे सपन म्हाका म्हज्या सांगाताक जाय’ असे भविष्याचे स्वप्नही तो पाहतो.
‘युगधर्माचो उलो भुयेक, भौसाक नव्यान जागयतलो’ हा दृढ विश्वास या कवीने बाळगला. त्याच्या कवितेला ‘जोरगत’ येत राहिली, ‘सांवार’ चढत राहिला. सागरालाही तो सांगता झाला, ‘नाच ल्हारा नाच, तांडवाचो नाच!’
पण हा कवी नुसती वांझोटी स्वप्ने पाहत राहिला नाही, नुसते शब्दांचे खेळ मांडत राहिला नाही. परिणामांची पर्वा न करता गोव्याच्या मुक्तीसमरात जसा शिरला, दहा वर्षांची शिक्षा होऊन रेईश मागूशला दोन महिने प्रत्यक्ष तुरुंगवास जसा भोगला, तसाच कोकणी चळवळीमध्ये तनमनधनपूर्वक उतरला. जीवनाच्या सांध्यपर्वातही जेव्हा जेव्हा गोव्यात देशी भाषांशी, राष्ट्रीयत्वाशी प्रतारणा करणाऱ्या गोष्टी आजूबाजूला घडताना दिसल्या, तेव्हा तरुणाच्या उत्साहात रस्त्यावर उतरायला आणि पोर्तुगीज नावांच्या पाट्या फोडायलाही त्याने मागे पुढे पाहिले नाही.
‘काळोख पयस जाला.
तो कितलो पयस गेला,
खबर ना.
ह्या रणांत उबो आसा.
कितले झुजचे आसा
खबर ना’..
‘आमची काणी तळमळ्यांची, उत्फरके आणी उमाळ्यांची
आमची काणी सांगूक येना, आमची काणी आमीच जाणां’ म्हणताना नव्या प्रवाहांप्रती हा कवी सदैव स्वागतशील राहिला. त्याने ‘म्हालगड्या’चा तोरा मिरवला नाही आणि नव्या पिढ्यांना जिव्हाळ्याने मार्गदर्शन करण्यात कमीपणाही मानला नाही. ‘झडपून वचात आनी मागीर आंगभर झडत रावात’ असे म्हणणाऱ्या या कवीच्या चिंचवाडा, चिंबलच्या ‘मानसदीप’चे दार सर्वांसाठी सदैव उघडेच राहिले. आकाशवाणीच्या सेवेत असताना तेथेही हा भला माणूस लहानथोरांत तितक्याच रमरसतेने गप्पाष्टकांत गुंतलेला दिसे. चैतन्याचा तो खळाळ वातावरणातील मरगळ दूर सारून जाई. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला त्यांचा तो चैतन्यमयी स्वर विसरता येणार नाही. निघून जाताना हा कवी जणू सांगून गेला आहे –
‘आमी परत परत येतले..
जे कोण सपनांंत जागतले,
जाग्रततायेन सपनां देखतले,
तेच आमचे प्रिय जातले..’
आपल्या नजरेमध्ये विशालता असली पाहिजे, त्यात भाषिक, प्रादेशिक संकुचितता असता कामा नये, हा विचार नागेश करमलींनी ठामपणे आणि ठासून मांडला. आपल्या दृष्टीच्या या विस्ताराची गरज व्यक्त करताना ‘कोंडाळ्यातले’, ‘संभ्रमातले’ कोकणी साहित्य वैश्विक कसे ठरू शकेल ते पहा, तरच मर्यादा संपतील, असा संदेश त्यांनी कोकणी साहित्यविश्वाला दिलेला आहे. तो किती अनुसरायचा आणि आत्मसंतुष्टतेत किती लोळायचे हे ज्याने त्याने जरूर ठरवावे, परंतु करमलींच्या मागे उरलेली त्यांची कविता हा त्या विशालतेचा साक्षात्कार आहे हे तितकेच खरे आहे.