चेन्नई स्पर्धेबाहेर; मुंबई नंबर १

0
239

>> ट्रेंट बोल्टचे ४ बळी, ईशान किशनचे तडाखेबंद अर्धशतक

मुंबई इंडियन्सने काल शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्जचा १० गडी राखून पराभव करत त्यांना स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. इंडियन प्रीमियर लीगच्या १३व्या मोसमातील आव्हान कायम राखण्यासाठी चेन्नईला कोणत्याही परिस्थितीत विजय गरजेचा होता. मुंबईने धमाकेदार विजयासह गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले. मोसमातील पहिल्याच लढतीत चेन्नईने मुंबईला नमवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली होती. त्याच मुंबईकडून पराजित झाल्याने चेन्नईला काल स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले.

चेन्नईने विजयासाठी ठेवलेले ११५ धावांचे लक्ष्य मुंबईने केवळ १२.२ षटकांत गाठले. ईशान किशनने क्विंटन डी कॉकसह डावाची सुुरुवात करताना नियमित कर्णधार रोहित शर्माची उणीव संघाला भासू दिली नाही. चेन्नईच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत त्याने ६ चौकार व ५ षटकारांनी आपली नाबाद ६८ धावांची खेळी सजवली. डी कॉकने दुय्यम भूमिका घेत ३७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४६ धावा जमवत संघाला ‘विशाल’ विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, मुंबईचा हंगामी कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. फलंदाजीला पोषक शारजाच्या या खेळपट्टीवर मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. प्रत्यक्षात चेन्नईच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी करत ‘पॉवरप्लेमध्ये’च शरणागती पत्करली. महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड सलामीला मिळालेल्या संधीचा लाभ उठवण्यात कमी पडला. बोल्टने त्याला भोपळाही फोडू दिला नाही. तिसर्‍या स्थानावरील रायडूला बुमराहने चकवत तंबूत पाठवले. जगदीशने पुन्हा एकदा निराश केले. पहिल्याच चेंडूवर स्लिपमध्ये सूर्यकुमारकडे झेल देत त्याने तंबूची वाट धरली. फाफ ड्युप्लेसी संघाचा कोसळता डोलारा सावरण्याची अपेक्षा होती. परंतु, बोल्टचा एक बाहेर जाणारा चेंडू छेडण्याच्या नादात डी कॉककडे सोपा झेल त्याने दिला. ड्युप्लेसी बाद झाला त्यावेळी चेन्नईची २.५ षटकांत ४ बाद ३ अशी केविलवाणी स्थिती झाली होती. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात बोल्टने जडेजाला माघारी धाडले. पंधराव्या षटकात ८ बाद ७१ अशी स्थिती असताना सॅम करन याने इम्रान ताहीरला हाताशी धरून नवव्या गड्यासाठी ४३ धावांची भागीदारी केल्याने चेन्नईला शतकी वेस ओलांडता आली.

चेन्नईने या सामन्यासाठी संघात तीन बदल करताना शेन वॉटसन, केदार जाधव व पीयुष चावला यांना बाहेर बसवताना ऋतुराज गायकवाड, नारायण जगदीशन व इम्रान ताहीर यांना संधी दिली. मुंबईने जायबंदी रोहितच्या जागेवर सौरभ तिवारीला पुन्हा संघात घेतले.

धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज ः ऋतुराज गायकवाड पायचीत गो. बोल्ट ०, फाफ ड्युप्लेसी झे. डी कॉक गो. बोल्ट १, अंबाती रायडू झे. डी कॉक गो. बुमराह २, नारायण जगदीशन झे. यादव गो. बुमराह ०, महेंद्रसिंग धोनी झे. डी कॉक गो. राहुल १६, रवींद्र जडेजा झे. कृणाल गो. बोल्ट ७, सॅम करन त्रि. गो. बोल्ट ५२, दीपक चहर यष्टिचीत डी कॉक गो. राहुल ०, शार्दुल ठाकूर झे. यादव गो. कुल्टर नाईल ११, इम्रान ताहीर नाबाद १३, अवांतर १२, एकूण २० षटकांत ९ बाद ११४
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट ४-१-१८-४, जसप्रीत बुमराह ४-०-२५-२, कृणाल पंड्या ३-०-१६-०, राहुल चहर ४-०-२२-२, नॅथन कुल्टर नाईल ४-०-२५-१, कायरन पोलार्ड १-०-४-०
मुंबई इंडियन्स ः क्विंटन डी कॉक नाबाद ४६ (३७ चेंडू, ५ चौकार, २ षटकार), ईशान किशन नाबाद ६८ (३७ चेंडू, ६ चौकार, ५ षटकार), अवांतर २, एकूण १२.२ षटकांत बिनबाद ११६
गोलंदाजी ः दीपक चहर ४-०-३४-०, जोश हेझलवूड २-०-१७-०, इम्रान ताहीर ३-०-२२-०, शार्दुल ठाकूर २.२-०-२६-०, रवींद्र जडेजा १-०-१५-०