>> अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सशी भिडणार
चेन्नई सुुपर किंग्सने ‘क्वॉलिफायर २’ सामन्यात काल शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सचा ६ गडी व ६ चेंडू राखून पराभव केला. या विजयासह त्यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या मोसमाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी होणार्या अंतिम सामन्यात त्यांना मुंबई इंडियन्सशी दोन हात करावे लागणार आहेत. आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची चेन्नईची ही आठवी वेळ आहे.
दिल्लीच्या संघाने विजयासाठी चेन्नईला १४८ धावांचे माफक आव्हान दिले होते. चेन्नईचे सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ ड्युप्लेसी या दोघांनी दिलेल्या ८१ धावांची खणखणीत सलामीच्या जोरावर चेन्नईने सहज विजय संपादन केला.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना वॉटसन व ड्युप्लेसी यांनी स्थिरावण्यास थोडा वेळ घेतला. पहिल्या चार षटकांत या दुकलीने केवळ १६ धावा फलकावर लगावल्या. यानंतर पाचव्या षटकापासून मात्र दोघांनी गियर बदलले. पॉवरप्लेच्या शेवटच्या दोन षटकांत २६ धावा कुटून त्यांनी संथ सुरुवातीची भरपाई केली. आठव्या षटकात त्यांनी चेन्नईचे अर्धशतक फलकावर लगावले. किमो पॉलची गोलंदाजी लक्ष्य करण्याचे ठरवूनच त्यांनी फलंदाजी केली. पॉलच्या पहिल्या व डावातील आठव्या षटकात चेन्नईने १६ धावा जमवल्या. यात पाच वाईड धावांचा देखील समावेश होता. डावातील ११ल्या षटकात ड्युप्लेसीला बाद करत बोल्टने संघाला पहिले यश मिळवून दिले. फाफने यंदाच्या मोसमातील आपले तिसरे व एकूण १२वे आयपीएल अर्धशतक लगावले.
ड्युप्लेसी परतल्यानंतर वॉटसनने सूत्रे आपल्या हातात घेतली. किमो पॉलच्या दुसर्या व डावातील १२व्या षटकात वॉटसनने ३ षटकार व १ चौकार चोपला. या षटकांत तब्बल २५ धावा आल्या. षटकापूर्वी ७.२२असलेली आवश्यक धावगती ५.०० पर्यंत खाली आली. मिश्राने आपल्या पुढील षटकात वॉटसनला बाद केले. वॉटसनने यंदाच्या मोसमातील आपले केवळ दुसरे व एकूण १८वे आयपीएल अर्धशतक लगावले. त्याने ३ चौकार आणि ४ षटकार यांच्या मदतीने ३२ चेंडूत ५० धावा केल्या. काही चेंडू चाचपडल्यानंतर सुरेश रैनाने तंबूची वाट धरली. त्याने केवळ ११ धावा केल्या. विजयासाठी २ धावा आवश्यक असताना धोनीला विजयी षटकार मारण्याच्या मोहामुळे महेंद्रसिंग धोनीला आपली विकेट गमवावी लागली. अखेर रायडूने विजयी फटका लगावत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. दिल्लीची फलंदाजी पुरती कोलमडली. ऋषभ पंत आणि कॉलिन मन्रोचा अपवाद वगळता दिल्लीचे फलंदाज चेन्नईच्या गोलंदाजीचा नेटाने सामना करू शकले नाहीत. सलामीवीर पृथ्वी शॉला माघारी धाडत दीपक चहरने दिल्लीला पहिला धक्का दिला. यानंतर शिखर धवनही हरभजन सिंगच्या गोलंदाजीचा शिकार होऊन माघारी परतला. यानंतर प्रत्येक फलंदाज एका मागोमाग एक माघारी परतत राहिल्यामुळे दिल्लीचा संघ एकही मोठी भागीदारी उभारु शकला नाही. मधल्या फळीत ऋषभ पंतने फटकेबाजी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ही मोठी खेळी करु शकला नाही. त्याने दिल्लीकडून ३८ धावा केल्या. चेन्नईकडून दीपक चहर, हरभजन सिंग, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. इम्रान ताहीरने १ बळी घेत त्यांना चांगली साथ दिली.
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ पायचीत गो. चहर ५, शिखर धवन झे. धोनी गो. हरभजन १८, कॉलिन मन्रो झे. ब्राव्हो गो. जडेजा २७, श्रेयस अय्यर झे. रैना गो. ताहीर १३, ऋषभ पंत झे. ब्राव्हो गो. चहर ३८, अक्षर पटेल झे. ताहीर गो. ब्राव्हो ३, शर्फेन रुदरफर्ड झे. वॉटसन गो. हरभजन १०, किमो पॉल त्रि. गो. ब्राव्हो ३, अमित मिश्रा नाबाद ६, ट्रेंट बोल्ट त्रि. गो. जडेजा ६, इशांत शर्मा नाबाद १०, अवांतर ८, एकूण २० षटकांत ९ बाद १४७
गोलंदाजी ः दीपक चहर ४-०-२८-२, शार्दुल ठाकूर १-०-१३-०, हरभजन सिंग ४-०-३१-२, रवींद्र जडेजा ३-०-२३-२, इम्रान ताहीर ४-०-२८-१, ड्वेन ब्राव्हो ४-०-१९-२
चेन्नई सुपरकिंग्स ः फाफ ड्युप्लेसी झे. पॉल गो. बोल्ट ५० (३९ चेंडू, ७ चौकार, १ षटकार), शेन वॉटसन झे. बोल्ट गो. मिश्रा ५० (३२ चेंडू, ३ चौकार, ४ षटकार), सुरेश रैना त्रि. गो. पटेल ११, अंबाती रायडू नाबाद २०, महेंद्रसिंग धोनी झे. पॉल गो. शर्मा ९, ड्वेन ब्राव्हो नाबाद ०, अवांतर ११, एकूण १९ षटकांत ४ बाद १५१
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट ४-०-२०-१, इशांत शर्मा ४-०-२४-१, अक्षर पटेल ४-०-३२-१, अमित मिश्रा ४-०-२१-१, किमो पॉल ३-०-४९-०
भज्जीचे दीडशतक
इंडियन प्रीमियर लीगमध्ये बळींचे दीडशतक पूर्ण करणारा हरभजन सिंग हा चौथा खेळाडू ठरला आहे. भज्जीने धवन व रुदरफर्ड यांना बाद करत १५० आयपीएल बळी पूर्ण केले. मुंबई इंडियन्सचा लसिथ मलिंगा (१६९), दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा अमित मिश्रा (१५६) व कोलकाता नाईट रायडर्सचा पीयुष चावला (१५०) या त्रिकुटाने १५० किंवा जास्त आयपीएल बळी घेतले आहेत.
ब्राव्होची ‘शंभरी’
चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळताना बळींची सेंच्युरी ठोकणारा ड्वेन ब्राव्हो हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. अक्षर पटेल हा त्याचा शंभरावा बळी ठरला. या यादीत ९० बळींसह रविचंद्रन अश्विन दुसर्या क्रमांकावर असून पंजाबकडून खेळत असलेला अश्विन पुन्हा चेन्नईकडून खेळण्याची शक्यता खूप कमी आहे.