>> वॉटसन, रायडू, धोनीची आक्रमक खेळी
>> दिल्लीचा पुन्हा पराभव
चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा १३ धावांनी पराभव केला. कालच्या कामगिरीसह त्यांनी ६ विजय आपल्या खात्यात जमा करत १२ गुणांसह गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २११ धावांचा डोंगर उभारला. परंतु, दिल्ली संघाला ऋषभ पंत व विजय शंकरच्या आक्रमक फलंदाजीनंतरही विजयापासून दूर रहावे लागले. २० षटकांत त्यांनी ५ बाद १९८ धावांपर्यंत मजल मारली.
तत्पूर्वी, सलामीवीर शेन वॉटसन, कर्णधार धोनी आणि अंबाती रायडूच्या स्फोटक खेळीच्या जोरावर चेन्नईने २० षटकात ४ बाद २११ धावांचा डोंगर उभारला. धोनीने केवळ २२ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावांची खेळी केली. वॉटसनने ४० चेंडूत ७८ धावा केल्या, तर रायडूने २४ चेंडूत ४१ धावा चोपल्या. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईची सुरुवात चांगली झाली. दुखापतीतून सावरल्यानंतर मैदानात उतरलेला ड्युप्लेसी
आणि वॉटसनने १० षटकात १०० धावांची भागीदारी रचली. वॉटसन फटकेबाजी करत असताना त्याला स्ट्राईक देण्याची भूमिका बजावलेला ड्युप्लेसी ३३ चेंडूत ३३ धावा काढून बाद झाला. रैनाही फक्त १ धाव काढून बाद झाला. त्यानंतर धोनी आणि वॉटसननेमध्ये छोटी भागीदारी झाली. शतकाकडे वाटचाल करणारा वॉटसन ७८ धावांवर बाद झाला. वॉटसन बाद झाल्यानंतर धोनी आपल्या नेहमीच्या आक्रमकतेचे दर्शन पुणेकरांना घडविलेे. धोनीला रायडूने चांगली साथ दिली. धोनीने नाबाद ५१ आणि रायडूने ४१ धावा करत संघाचा डाव २०० पार नेला. दिल्लीकडून प्लंकेट सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याच्या ३ षटकात चेन्नईच्या फलंदाजांनी ५२ धावा कुटल्या. मिश्रा, शंकर आणि मॅक्सवेलला प्रत्येकी एक बळी मिळाला.
चेन्नईने या सामन्यासाठी फाफ ड्युप्लेसी, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी व केएम आसिफ यांना संधी देताना सॅम बिलिंग्स, दीपक चाहर, इम्रान ताहीर व शार्दुल ठाकूर यांना बाहेर बसविले. तर दिल्लीने केकेआरवर विजय मिळविलेल्या संघात कोणताबी बदल केला नाही. आज मंगळवारी रॉयल बंगलोर व मुंबई यांच्यात सामना होणार आहे.
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स ः शेन वॉटसन झे. प्लंकेट गो. मिश्रा ७८, फाफ ड्युप्लेसी झे. बोल्ट गो. शंकर ३३, सुरेश रैना त्रि. गो. मॅक्सवेल १, अंबाती रायडू धावबाद ४१, महेंद्रसिंग धोनी नाबाद ५१, रवींद्र जडेजा नाबाद ०, अवांतर ७, एकूण २० षटकांत ४ बाद २११.
गोलंदाजी ः बोल्ट ४-०-४८-०, आवेश ४-०-२८-०, तेवतिया २-०-२३-०, प्लंकेट ३-०-५२-०, मिश्रा ४-०-३०-१, विजय शंकर २-०-२२-१, मॅक्सवेल १-०-५-१.
दिल्ली डेअरडेव्हिल्स ः पृथ्वी शॉ झे. जडेजा गो. आसिफ ९, कॉलिन मन्रो झे. शर्मा गो. आसिफ २६, श्रेयस अय्यर धावबाद १३, ऋषभ पंत झे. जडेजा गो. एन्गिडी ७९, ग्लेन मॅक्सवेल त्रि. गो. जडेजा ६, विजय शंकर नाबाद ५४, राहुल तेवतिया नाबाद ३, अवांतर ८, एकूण २० षटकांत ५ बाद १९८.
गोलंदाजी ः एन्गिडी ४-०-२६-१, आसिफ ३-०-४३-२, वॉटसन २-०-२७-०, जडेजा ४-०-३१-१, हरभजन ४-०-२६-०, ब्राव्हो ३-०-४३-०.