
>> अंबाती रायडूचा शतकी धमाका
सलामीवीर अंबाती रायडूच्या शतकी धमाक्याच्या जोरावर हैदराबादचा ८ गड्यांनी पराभव करत चेन्नई सुपर किंग्सचा संघ इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वातील ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. रायडूने आयपीएलमधील आपले पहिले शतक झळकावताना नाबाद १०० धावा केल्या. केवळ ६२ चेंडूंचा सामना करताना त्याने ७ चौकार व ७ षटकारांसह आपली खेळी सजवली. हैदराबादने दिलेले १८० धावांचे लक्ष्य चेन्नईने १९ षटकांत गाठले.
शेन वॉटसनने ३५ चेंडूत ५७ धावांची खेळी करत रायडूसोबत चेन्नईला १३४ धावांची सलामी दिली. धोनीने नाबाद २० धावा केल्या. हैदराबादकडून संदीप शर्माने एक बळी मिळवला. तत्पूर्वी, पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळताना हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईसमोर विजयासाठी १८० धावांचे आव्हान ठेवले होते. हैदराबादने २० षटकात ४ बाद १७९ धावा केल्या. हैदराबादकडून सलामीवीर शिखर धवनने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. धवनने चेन्नईच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवत ४९ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह ७९ धावा चोपल्या. कर्णधार केन विल्यमसनने धवनला उत्तम साथ दिली. त्याने ३९ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५१ धावा केल्या. धवनला ब्राव्होने बाद केले, तर विल्यमसन शार्दुलचा बळी ठरला. हे दोघे बाद झाल्यानंतर दीपक हुडाने आपल्या बॅटचा तडाखा चेन्नईच्या गोलंदाजांना दिला. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरला दोन आणि दुखापतीनंतर पुनरागमन करणार्या दीपक चहर आणि ब्राव्होला प्रत्येकी एक बळी मिळाला. सनरायझर्सने या सामन्यासाठी युसूफ पठाणला बाहेर बसवून दीपकला खेळविले तर चेन्नईने राहुलसाठी कर्णला बाहेरचा रस्ता दाखविला.
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद ः शिखर धवन झे. हरभजन गो. ब्राव्हो ७९, आलेक्स हेल्स झे. रैना गो. चाहर २, केन विल्यमसन झे. ब्राव्हो गो. ठाकूर ५१, मनीष पांडे झे. विली गो. ठाकूर ५, दीपक हुडा नाबाद २१, शाकिब अल हसन नाबाद ८, अवांतर १३, एकूण २० षटकांत ४ बाद १७९
गोलंदाजी ः दीपक चाहर ४-०-१६-१, शार्दुल ठाकूर ४-०-३२-२, डेव्हिड विली २-०-२४-०, हरभजन सिंग २-०-२६-०, शेन वॉटसन २-०-१५-०, ड्वेन ब्राव्हो ४-०-३९-१, रवींद्र जडेजा २-०-२४-०
चेन्नई सुपर किंग्स ः शेन वॉटसन धावबाद ५७, अंबाती रायडू नाबाद १००, सुरेश रैना झे. विल्यमसन गो. संदीप २, महेंद्रसिंग धोनी नाबाद २०, अवांतर १, एकूण १९ षटकांत २ बाद १८०
गोलंदाजी ः संदीप शर्मा ४-०-३६-१, भुवनेश्वर कुमार ४-०-३८-०, राशिद खान ४-०-२५-०, शाकिब अल हसन ४-०-४१-१, सिध्दार्थ कौल ३-०-४०-०