चेन्नईनला नमवून एफसी गोवा उपांत्य फेरीत

0
115
जवाहरलाल नेहरू स्टेडियमवरील आयएसएल लढतीत एफसी गोवाचा पहिला गोल नोंदवलेला रोमिओ फर्नांडिस आणि संघसाथी आनंद साजरा करताना.

यजमान चेन्नईन एफसीवर ३-१ असा सफाईदार विजय मिळवित एफसी गोवाने हीरो इंडियन सुपर लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
येथील नेहरू स्टेडियमवर झालेल्या या लढतीत पाहुण्या एफसी गोवातर्फे ‘हिरो ऑफ दी मॅच’ रोमिओ फर्नांडिस (२३वे मिनिट), ब्राझिलियन आंद्रे सांतोस (४१वे मिनिट) आणि झेक स्ट्रायकर मिरोस्लाव स्लेपिका (६२वे मिनिट) यांनी तर चेन्नईन एफसीचा एकमात्र गोल राखीव मॉरिसने अंतिमक्षणात नोंदला.चेन्नईन एफसीचा हा स्वमैदानावरील पहिला पराभव होय. या विजयासह ब्राझिलियन प्रशिक्षक झिको यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाने १३ सामन्यातून २१ गूण जमविले असून आघाडीवीर चेन्नईनहून ते केवळ एका गुणाने मागे आहेत. गेल्या सात सामन्यात अपराजित रहाताना पाच विजय नोंदवलेल्या एफसी गोवाचा अखेरचा लीग सामना दि. १० रोजी ऍटलेटिको दे कोलकाताशी होईल.
यजमान चेन्नईनने आक्रमक प्रारंभ केला आणि दुसर्‍याच मिनिटाला संधी मिळाली, पण ब्रुणो पेलिसारीचा फटका थेट गोलरक्षक सेडाच्या हाती गेला. १९व्या मिनिटाला पेलिसरचा आणखी एक प्रयत्न असफल ठरला. यजमानांचे प्रयत्न असफल टरत असतानाच २३व्या मिनिटाला रोमिओ फर्नांडिसने एफसी गोवाचा आघाडीचा गोल केला. मंदार राव देसाईने हाणलेला तेज लेफ्टफूटर फटका क्रॉसबारवर आदळून परतला आणि डेन्सन देवदासच्या पायाजवळ आला पण मिरोस्लवाव स्लेपिकाने चेंडू पुढे रोमिओ फर्नांडिसच्या दिशेने सरकविला आणि त्याने संुंदर लेफ्टफूटर फटका गोलरक्षक शिल्टन पॉलला चकवीत अचूक जाळीत फटकावला (१-०).
आघाडीनंतर पाहुण्यानी नव्या जोमाने आक्रमणे केली. ४०व्या मिनिटाला पाहुण्याना आघाडीवृध्दीची संधी लाभली पण सांतोसचा सुंदर फ्रीकिक फटका गोलपोस्टर आदळून परतला, तथापि, पुढच्याच मिनिटाला त्याची भरपाई करताना आमीरच्या चालीनंतर स्लेपिकाने दिलेल्या पासवर सांतोसने लेफ्टफूटर फटका जाळीत घुसवीत एफसी गोवाचा दुसरा गोल केला (२-०).
उत्तरार्धात चेन्नईनने गोलसाठी जोरदार प्रयत्न केले पण यश आले नाही आणि ६२व्या मिनिटाला मिरोस्लाव स्लेपिकाने पाहुण्याचा तिसरा गोल नोेंदवित आघाडी ३-० अशी मजबून बनविली. नारायण दासने पुढे मुसंडी मारीत हाणलेला तेज फटका गोलरक्षकाने परतविलला पण पुढे सरसावलेल्या स्लेपिकाने ‘रिबाऊंड’वरील चेंडू अचूक जाळीत फटकावला (३-०).
‘इंज्युरी टाइम’मधील अंतिमक्षणात जोर्जडिकच्या पासनंतर गोलरक्षक सेडा पुढे आला आणि मॉरिसने या संधीचा लाभ उठवीत चेंडू अचुक जाळीत फटकावीत चेन्नईन एफसीचा दिलासादायी गोल नोंदवला.
इंडियन सुपर लीग गुणतक्ता
क्रम संघ सामने गोलफरक गुण
१. चेन्नईन एफसी १३ ४ २२
२. एफसी गोवा १३ ९ २१
३. ऍथलेटिको दे कोलकाता १२ ४ १८
४. एफसी पुणे सिटी १२ -३ १६
५. केरला ब्लास्टर्स एफसी १३ -३ १६
६. दिल्ली डायनामोज एफसी १२ -१ १४
७. नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी १३ -२ १४
८. मुंबई सिटी एफसी १२ -१० १२