लिथुएनियाचा ३२ वर्षीय स्ट्रायकर नेरीयूस वॅल्सकीस याने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर चेन्नईन एफसीने हैदराबाद एफसीचा ३-१ अशा गोलफरकाने पराभव करीत हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) शुक्रवारी आकर्षक विजय नोंदविला. वॅल्सकीस याच्या दोन गोलांव्यतिरिक्त ब्राझीलचा ३० वर्षीय मध्यरक्षक रॅफेल क्रिव्हेलारो याने एक गोल केला. या विजयासह चेन्नईनने बाद फेरीच्या आशा उंचावल्या आहेत.
बालयोगी स्टेडियमवर यजमान हैदराबादला एकमेव गोलवर समाधान मानावे लागले. तीन मिनिटे बाकी असताना मार्सेलिनीयो याने हा गोल केला. चेन्नईनने पहिल्या सत्रात तीन मिनिटांच्या अंतराने दोन गोल केले. मध्यंतराची ही आघाडी उपयुक्त ठरली. मग दुसर्या सत्रात आणखी एक गोल झाला.
चेन्नईनने ११ सामन्यांत तिसरा विजय मिळविला असून तीन बरोबरी व पाच पराभव अशा कामगिरीसह त्यांचे १२ गुण झाले. चेन्नईनने केरला ब्लास्टर्स (११ सामन्यांतून ११) व नॉर्थईस्ट युनायटेड (१० सामन्यांतून ११) या दोन संघांना मागे टाकले. आता चेन्नईन सातव्या क्रमांकावर आहे.
हैदराबादसाठी हा निकाल निराशाजनक ठरला. त्यांना १२ सामन्यांत नववा पराभव पत्करावा लागला. एकमेव विजय आणि दोन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे ५ गुण आणि अखेरचे दहावे स्थान कायम राहिले. हैदराबादविरुद्ध झालेल्या गोलांची संख्या आता २९ पर्यंत गेली आहे. त्यांना केवळ १२ गोल करता आले असून गोलफरक उणे १७ इतका घसरला आहे.
४०व्या मिनिटाला हैदराबादच्या आशिष राय याच्या ढिलाईमुळे वॅल्सकीसला चेंडूवर ताबा मिळविता आला. त्यावेळी प्रतिक्षेत असलेल्या क्रिव्हेलारोने धाव घेत आगेकूच केली. फटका मारण्यास त्याने बराच वेळ लावला, पण अचूकतेमध्ये तो कमी पडला नाही. त्याने हैदराबादता गोलरक्षक कमलजीत सिंग याला चकविले.
त्यानंतर तीन मिनिटांत आंद्रे शेम्ब्री याने गोलक्षेत्रालगत पास देताच वॅल्सकीसने लक्ष्य साधले. दुसर्या सत्रात चेन्नईनच्या एकूण तिसर्या गोलला हैदराबादचा ढिसाळ बचाव कारणीभूत ठरला.