
शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठा ताणलेल्या रोमहर्षक झालेल्या सामन्यात काल रविवारी चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा ४ धावांनी पराभव करत विजयी चौकार लगावला. इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या मोसमातील हा विसावा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात आला. चेन्नईने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सन आणि युसूफ पठाणने विजयासाठी नेटाचा प्रयत्न केला. विल्ययम्सनने ५१ चेंडूत ८४ आणि पठाणने २७ चेंडूत ४५ धावा केल्या. अष्टपैलू राशिद खानने यानंतर फक्त ४ चेंडूत १७ धावा करत चेन्नईला दबावाखाली आणले.
राशिदने दोन षटकार आणि एक चौकार लगावत सामना हैदराबादच्या बाजून झुकवला परंतु शेवटच्या चेंडूवर ६ धावांची आवश्यकता असताना ब्राव्होने अप्रतिम चेंडू टाकत राशिदला मोठा फटका मारण्यापासून रोखले.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईला पन्नास धावांच्या आत दोन तगडे झटके बसले. गेल्या सामन्यातील शतकवीर शेन वॉटसन ९ आणि यंदाच्या आयपीएलमधील पहिला सामना खेळणारा ड्युप्लेसी ११ धावा काढून बाद झाले. वॉटसनला भुवनेश्वरने तर ड्युप्लेसीला राशिद खानने बाद केले. सुरेश रैना आणि अंबाती रायडू यांनी यानंतर काही षटके सावध खेळ केला. जम बसल्यानंतर दोघांनीही हैदराबादच्या भक्कम गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. बाद होण्यापूर्वी दोघांमध्ये ९ षटकात ११२ धावांची भागिदारी करत संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्स ः २० षटकांत ३ बाद १८२ (वॉटसन ९, ड्युप्लेसी ११, रैना नाबाद ५४, रायडू ७९, धोनी नाबाद २५, अवांतर ४, गोलंदाजी ः भुवनेश्वर २२-१, स्टेनलेक ३८-०, शाकिब ३२-०, कौल ३३-०, राशिद ४९-१, हुडा ८-०) वि. वि. सनरायझर्स हैदराबाद ः भुई ०, विल्यमसन ०, हुडा १, शाकिब २४, युसूफ ४५, साहा ५, राशिद नाबाद १७, अवांतर २, गोलंदाजी ः चाहर १५-३, ठाकूर ४५-१, वॉटसन २३-०, जडेजा २८-०, कर्ण ३०-१, ब्राव्हो ३७-१)