…चुके काळजाचा ठोका

0
106

वयाच्या १७ व्या वर्षी दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका, रंगभूमी आणि चित्रपटांतून अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमावत असतानाच ३४ व्या वर्षी ‘अस्मिता चित्र’ ही स्वतःची निर्मितीसंस्था, त्याद्वारे उत्तमोत्तम चित्रपट आणि दर्जेदार मालिकांची निर्मिती सुरू असतानाच अवघ्या ५९ व्या वर्षी या दुनियेतूनच एक्झिट… स्मिता तळवलकर यांचा हा अल्प जीवनप्रवास, परंतु आज प्रत्येक मराठी घर त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून हळहळते आहे हे या सार्‍या प्रवासात त्यांनी मिळवलेले संचित मानावे लागेल. कसदार अभिनय, उत्तम विषयांची तितकीच उत्तम हाताळणी, सादरीकरणातील परिपक्वता यातून स्मिता तळवलकर म्हणजे गुणवत्ता हे समीकरण तयार झाले आणि ते कधीच पुसले गेले नाही. अस्मिता चित्रचे बोधचिन्ह असलेले ते उगवते सूर्यबिंब आता अकालीच लोपले आहे. काल भल्या सकाळी तळवलकरांच्या निधनाचे कटू वृत्त ऐकून त्यांच्याच ‘चौकट राजा’तल्या गीताप्रमाणे तमाम मराठी रसिकांच्या काळजाचा ठोका चुकला. दुर्धर कर्करोगाशी गेली चार वर्षे त्यांची झुंज सुरू होती. एकीकडे त्यावर उपचार घेत असताना दुसरीकडे आपल्या सृजनशीलतेमध्ये त्यांनी कुठेही खंड पडू दिला नव्हता. वैयक्तिक जीवनातील दुःखाची आणि संघर्षाची झळ लागू न देता त्यांचे कलाजीवन सुरू होते. पण शेवटी काळाने मात केली. आता मागे उरला आहे त्यांचा अस्सल सहजस्फूर्त अभिनय आणि त्यांच्या प्रेरणेतून साकारलेले चित्रपट आणि मालिका यांचा झगमगता पट. ‘ग्लॅमरपेक्षा शिकायची जिद्द महत्त्वाची’ या विचारधारेवर ठाम असलेल्या स्मिता तळवलकरांनी या झगमगत्या चंदेरी दुनियेमध्ये स्वतःचे स्थान दुर्दम्य आत्मविश्वासाच्या बळावर प्रयत्नपूर्वक निर्माण केले. अभिनयाबरोबरच चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन, वितरण या आघाड्या सांभाळल्या. स्मिता तळवलकर यांची निर्मिती आणि संजय सूरकर यांचे दिग्दर्शन हा मराठी रसिकांसाठी एक सुवर्णयोग होता. दुर्दैवाने सूरकर दोन वर्षांपूर्वी ह्रदयविकाराच्या झटक्याने अकाली गेले आणि आता स्मिता तळवलकरही आपल्यात राहिलेल्या नाहीत. विवाहबाह्य संबंधांचा नाजूक विषय हाताळणार्‍या ‘कळत नकळत’ द्वारे त्यांनी निर्मितीक्षेत्रात पदार्पण केले आणि त्या चित्रपटालाच उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘चौकट राजा’ कोण विसरू शकेल? आपल्या बालमैत्रिणीसाठी फळ काढायला झाडावर चढलेला नंदू खाली पडून मतिमंद बनतो आणि त्या दुर्घटनेला स्वतःला जबाबदार धरून त्याचे जीवन सावरण्यासाठी मीनल जिवाचे रान करते. दिलीप प्रभावळकर आणि स्मिता तळवलकर यांच्या त्या जातिवंत अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्याखेरीज राहातच नाही. अस्मिता चित्रच्या मोहन जोशी, सुहास जोशी अभिनीत ‘तू तिथे मी’ वरूनच अमिताभ – हेमामालिनीचा ‘बागबान’ काढला गेला. पुणे विद्यापीठाच्या आवारात पोलीस असल्याचे सांगून एका मुलीवर बलात्कार झाला, त्या सत्यकथेवर आधारित ‘सातच्या आत घरात’ मधून आपल्या गोव्याची कार्तिका राणे मराठी चित्रसृष्टीत उतरली. मृणाल देव कुलकर्णी, मकरंद अनासपुरे अशा अनेक कलाकारांना मता तळवलकरांमुळे आपले अभिनयनैपुण्य दाखवण्याची संधी मिळाली. वरवर पाहता त्या खूप गंभीर दिसायच्या, परंतु त्यांच्या विनोदी अभिनयाची चुणूक रसिकांना अनेकदा पाहायला मिळाली. ‘अडगुलं मडगुलं’ मधली सुनेला काळाकुट्ट मुलगा झाल्याने नाराज झालेली सासू तर त्यांनी अशी फर्मास रंगवली आहे की प्रेक्षकांच्या हसून हसून मुरकुंड्या वळतात. स्वभावात नसलेला ‘खाष्ट’ पणा त्या फार सुंदररीत्या दाखवीत. आपल्या वैयक्तिक दुःखाची आणि ओढवलेल्या संकटांची चाहूलही प्रेक्षकांना लागू न देता त्या हसतमुखाने जीवनाला सामोर्‍या गेल्या. पराकोटीची सकारात्मकता त्यांच्यापाशी होती आणि त्या बळावरच त्या हा संघर्ष पेलू शकल्या. त्यांच्या ‘तळवलकर्स’ हेल्थ क्लबचे जाळे गोव्यापर्यंत पसरलेले आहे. त्यांचा मुलगा अंबर तो व्यवसाय सांभाळतो. कन्या आरती चित्रपटक्षेत्रात काम करते आहे. नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करणारी अस्मिता चित्र अकादमीही त्यांनी स्थापन केलेली आहे. पण या सार्‍यांहून त्यांचा वारसा सांगेल तो त्यांचा अत्यंत जिवंत अभिनय आणि त्याच्या बळावर पेललेल्या विविधांगी भूमिका.