>> ५०० किमीपर्यंत अचूक मारा करण्याची क्षेपणास्त्राची क्षमता
चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर प्रथमच सामरिक कारवाईसाठी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश करणार आहे. लष्कराने एलएसीवर ‘प्रलय’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे क्षेपणास्त्र १५० ते ५०० किलोमीटरपर्यंतचे आपले लक्ष्य अचूकपणे भेदू शकते.
डिसेंबर २०२१ मध्ये या क्षेपणास्त्राची सलग दोन दिवसांत दोनदा यशस्वी चाचणी घेण्यात आली होती, तेव्हापासून भारतीय लष्कर त्याचे अधिग्रहण आणि समावेश करण्याच्या दिशेने काम करत आहे.
भारत-चीन सीमेवर या क्षेपणास्त्राच्या तैनातीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील आठवड्यात होणार्या उच्चस्तरीय बैठकीत त्यास मान्यता मिळण्याची शक्यता आहे. भारताच्या तिन्ही सेना सध्या रॉकेट फोर्स बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा परिस्थितीत प्रलय क्षेपणास्त्राची तैनाती लवकरच शक्य आहे.
प्रलय क्षेपणास्त्र सॉलिड प्रोपेलंट रॉकेट मोटारने सुसज्ज आहे. सोबतच त्यात नवीन तंत्रज्ञानही आहे. क्षेपणास्त्राच्या गाइडन्स सिस्टिममध्ये स्टेट ऑफ द आर्ट नेव्हिगेशन आणि इंटिग्रेटेड एव्हिओनिक्स आहे. प्रलय हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. डीआरडीओने अद्याप प्रलयच्या वेगाचा खुलासा केलेला नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार हे क्षेपणास्त्र रात्रीच्या वेळीही शत्रूंना लक्ष्य करण्यास सक्षम आहे.
२०१५ पासूनच प्रलयच्या निर्मितीची चर्चा सुरू होती. डीआरडीओने आपल्या वार्षिक अहवालात या क्षेपणास्त्राचा उल्लेख केला होता. या क्षेपणास्त्राच्या अचूकतेमुळे ते चीनच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मुकाबला करण्यास पूर्णपणे सक्षम ठरते. ते जमिनीवरून तसेच कनेस्टरमधूनही डागले जाऊ शकते. प्रलय क्षेपणास्त्र हे इतर कमी पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांपेक्षा जास्त प्राणघातक आहे.
प्रलय क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये
५०० किमीपर्यंत अचूकपणे लक्ष्य भेदू शकते.
१००० किलोग्रॅमपर्यंत स्फोटके वाहून नेऊ शकते.
ठराविक अंतरानंतर क्षेपणास्त्राचा मार्गही बदलता येतो.
शत्रू देशांची इंटरसेप्टर क्षेपणास्त्रेही हाणून पाडू शकते.
जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यास ‘प्रलय’ सक्षम.