>> नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक
चीन लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न करत असताना भारतीय जवानदेखील चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर देत आहे. सीमेवर चीन करत असलेली कट-कारस्थाने, लडाखमधील ताजी स्थिती आणि भविष्यातील रणनीतीबाबत दिल्लीमध्ये एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या उच्चस्तरीय बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, एनएसए अजित डोवाल, संरक्षण दलप्रमुख जनरल बिपिन रावत, सेनाप्रमुख एम. एम. नरवणे आणि मिलिटरी ऑपरेशन्सचे महासंचालक उपस्थित होते. यावेळी चीनला सडेतोड प्रत्युत्तर देण्याविषयी रणनीती आखण्यात आली.
दरम्यान, दुसरीकडे भारत आणि चीनने पूर्व लडाखमध्ये पेंगॉंग सरोवराच्या दक्षिण किनार्याच्या भागात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या नव्या संघर्षानंतर उत्पन्न झालेला तणाव कमी करण्यासाठी काल मंगळवारी चुशूल येथे आणखी एक बैठक सुरू झाली.
दि. २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री लडाखमध्ये भारताला डिवचण्याच्या उद्देशाने चीनने पेंगॉंग सरोवराच्या दक्षिणेकडील भागातील स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला मात्र, भारतीय सैनिकांनी चीनचा हा बेत हाणून पाडला. त्यानंतर दोन्ही पक्षांनी सोमवारी सुमारे सहा तास चर्चा केली, मात्र त्या चर्चेतून विशेष असे काही निघू शकले नाही.
दरम्यान, चीनच्या हवाई हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय हवाई दलाला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ सक्रिय होण्यास सांगण्यात आले आहे. चीनने होतन विमानतळावर दीर्घ अंतरावर मारा करू शकतील अशी क्षमता असलेल्या जे-२० लढाऊ विमाने आणि इतर सामग्री तैनात केली असल्याचे वृत्त आहे.
ब्लॅक टॉप पोस्ट भारताच्या ताब्यात
प्रत्यक्ष ताबा रेषेवरील चीनचा कट उधळून लावत भारतीय लष्कराने ब्लॅक टॉप पोस्ट ताब्यात घेतली आहे. २९-३० ऑगस्ट रोजी रात्री चिनी सैन्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ब्लॅक टॉप पोस्ट ताब्यात घेतली. एवढेच नव्हे तर चिनी लष्कराचे कॅमेरे आणि पाळत ठेवण्याची उपकरणदेखील हटवली आहेत. चिनी सैन्य पीपल्स लिबरेशन आर्मीने पेंगॉंग सरोवराच्या दक्षिणेकडील ब्लॅक टॉप पोस्टवर कब्जा करत कॅमेरे आणि पाळत ठेवणारी यंत्रणा बसवली होती. ही पोस्ट भारतीय जवानांनी ताब्यात घेतली आणि तेथील कॅमेरे आणि पाळत ठेवण्याची उपकरणे हटवली.