चीनमधील गूढ आजाराबाबत भारतात सतर्कता

0
29

>> चीनमध्ये न्यूमोनियासदृश आजाराचा फैलाव

>> लहान मुलांना होतोय श्वसनाचा त्रास

चीनमध्ये वाढत असलेल्या न्युमोनियासदृश गूढ आजाराबाबत भारत सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क केले आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक आरोग्य प्रणाली अद्ययावत करण्याची सूचना केली असून कोणत्याही मोठ्या आजाराच्या प्रसारासाठी रुग्णालयांना तयार राहण्यास सांगितले आहे.
रुग्णालयांमध्ये कर्मचारी, खाटा, अत्यावश्यक औषधे, प्राणवायू, अँटीबायोटिक्स, पीपीई कीट, टेस्टिंग कीट उपलब्ध करून ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत, चीनमध्ये पसरणाऱ्या रहस्यमय आजारावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. चीनमधील मुलांमध्ये एच9एन2 प्रकरणे आणि श्वसन रोगांच्या प्रसाराचा आजार पसरत असून त्याचे बारकाईने निरीक्षण केले जात असल्याचे म्हटले आहे.
चीनमधील रुग्णालये अशा न्यूमोनियासदृश आजाराने त्रस्त असलेल्या मुलांनी भरत आहेत. अशा आजारी मुलांच्या प्रचंड गर्दीमुळे पालकांना आपल्या मुलांच्या उपचारासाठी 7 तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचेही वृत्त आहे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी चीनमधील शाळा बंद करण्यात ठेवण्यात आल्या आहेत. बाधित मुलांमध्ये फुफ्फुसात जळजळ, खूप ताप, खोकला आणि सर्दी अशी लक्षणे दिसून येत आहेत.
बीजिंगमधील रुग्णालयात या आजाराने ग्रस्त असलेली सुमारे 1200 मुले रोज आपत्कालीन स्थितीत दाखल होत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील, चीनने पत्रकार परिषदेत श्वसन रोगाचा प्रसार झाल्याची माहिती दिली होती असे म्हटले आहे.

जगभरात अलर्ट
प्रो-मेडने चीनमधील न्यूमोनियाबाबत जगभरात अलर्ट जारी केला आहे. प्रो-मेड ही संस्था मानव आणि प्राण्यांमध्ये पसरणाऱ्या रोगांची माहिती ठेवते. लोकांना मास्क घालण्यास आणि सामाजिक अंतर पाळण्यास सांगितले आहे. सध्या चीनमध्ये प्रचंड थंडी आहे. तापमान शून्य अंशांच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेही हा आजार बळावला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्राकडून राज्ये सतर्क
चीनमध्ये न्यूमोनियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच केंद्रातील मोदी सरकारने राज्यांना रुग्णालयांच्या तयारीसंदर्भात आढावा घेण्याचा सल्ला दिला आहे. चीनमधील या रहस्यमय आजाराच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य मंत्रालयाने श्वसनाशी संबंधित आजारांच्या तयारीसंदर्भात सक्रिय आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालयाच्या तयारीसंदर्भात तत्काळ आढावा घेण्याचा सल्ला दिला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना, कोरोना संदर्भातील दक्षतेच्या धोरणाची सुधारित ऑपरेशनल मार्गदर्शक तत्त्वे’ लागू करण्यास सांगितले आहे. आरोग्य मंत्रायलाचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे. तसेच, याला घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

चीनमध्ये आढळलेल्या एव्हीयन इन्फ्लूएंझा (एच9एन2) आणि श्वसन रोगांचा धोका भारताला कमी आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत तयार आहे असे मंत्रालयाने म्हटले आहे.

चीनमध्ये फैलाव
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार चीनमधील बीजिंग आणि लिओनिंग येथील रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात बालकांना दाखल केले जात आहे. अनेक रुग्णालयांनी बालकांसाठी विशेष कक्षांची उभारणी केली आहे. अनेक रुग्णालये बालरुग्णांनी ओसंडून वाहत असून रुग्णशय्या अपुऱ्या पडत आहेत. या गूढ न्यूमोनियामध्ये वाढ होत असल्याने काही शहरांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

काय आहे नवा आजार?

चीनच्या उत्तर भागात बालकांमध्ये श्वसनाचे विकार वाढल्यानंतर याबाबत माहिती देण्यासाठी चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने नुकतीच पत्रकार परिषद घेतली. उत्तर चीनमधील शैक्षणिक संस्थांमधून गूढ न्यूमोनियाचा उद्रेक झाल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनासारखाच हा श्वसनविकार असून अनेक बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चीनमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या श्वसनविकारवाढीचा संबंध इन्फ्लूएंझा, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, बॅक्टेरियाचा संसर्ग यांच्याशी जोडला असून हा आजार विशेषत: लहान मुलांना होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार बालकांमध्ये श्वसन आणि न्यूमोनियाशी संबंधित आजार आढळून आले आहेत, मात्र त्याची लक्षणे न्यूमोनियापेक्षा वेगळी आहेत. मुलांमध्ये तीव्र ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास आदी लक्षणे दिसून येतात. काही मुलांमध्ये फुप्फुसाला सूज येणे, तीव्र ताप आणि श्वसनविकारांसबंधी अन्य लक्षणेही दिसून आली आहेत.