चीनने बांधकाम थांबवेपर्यंत भारत सैन्य हटवणार नाही

0
323

प्रत्यक्ष ताबा रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र एलएसीजवळ चीनकडून सुरू असलेले वेगवान बांधकाम थांबवल्यास भारत आपले सैन्य हटवेल या भूमिकेवर भारत ठाम आहे. त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये जी परिस्थिती होती ती कायम ठेवण्याबाबत भारत आग्रही आहे. भारत-चीन सीमेवर जैसे थे स्थिती ठेवण्याच्या प्रयत्न करत आहेत. पण भारत आता पूर्णपणे सतर्क झाला असून चीनची कोणतीही चाल हाणून पाडण्यास सज्ज आहे.

दोन्ही देशांकडून मंगळवारी संयुक्त निवेदन जारी करण्यात आले असून त्यात एलएसीवरील तणाव कमी करणे आणि वादग्रस्त भागातील कोणत्याही पक्षाने चिथावणीखोर कृती करू नये, यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याचे निवेदनात म्हटलं आहे. पण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भारत पूर्णपणे तयार आहे.

वाटाघाटीतूनच तोडगा ः जयशंकर
दरम्यान, भारत-चीनमध्ये सीमेवर तणाव कायम असून चीनकडून भारतीय क्षेत्रात घुसखोरीच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत-चीन सीमेवर अभूतपूर्व स्थिती आहे. आणि वाटाघाटीतूनच तोडगा काढायला हवा, असे म्हटले आहे. अलिकडेच मंत्री जयशंकर यांनी रशियात मॉस्कोमध्ये चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये चर्चाही झाली होती. यानंतर जयशंकर यांनी पहिल्यांदाच हे विधान केले आहे.