चीनने आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या 11 ठिकाणांची नावे बदलली आहेत. चीनने गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा असे कृत्य केले आहे. यापूर्वी 2021 मध्ये चीनने 15 आणि 2017 मध्ये 6 ठिकाणांची नावे बदलली होती.
चीनच्या नागरी कामकाज विभागाने रविवारी अरुणाचल प्रदेशमधील एका मोठ्या भूभागाचा उल्लेख ‘दक्षिण तिबेट’ असा केला. यानंतर या भागातील 11 ठिकाणांची चिनी नावे चीनकडून जाहीर करण्यात आली. त्याला ‘झँगनन’ असे नाव देऊन तो तिबेटचा दक्षिण भाग असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या 11 ठिकाणांमध्ये दोन खुले भूखंड, दोन निवासी भाग, पाच डोंगरावरची ठिकाणे, दोन नद्या यांचा समावेश आहे. या ठिकाणांचा उल्लेख करत त्यांच्या नव्या नावांची यादीही चीनच्या नागरी कामकाज मंत्रालयाने जारी केली आहे. यामध्ये एक ठिकाण तर थेट अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरच्या जवळचे असल्याचे निदर्शनास आले आहे.
चीनने अरुणाचल प्रदेशला भारताचे राज्य म्हणून कधीही मान्यता दिलेली नाही. त्यांनी अरुणाचलचे वर्णन ‘दक्षिण तिबेट’चा भाग म्हणून केले आहे. भारताने तिबेटचा भूभाग जोडून अरुणाचल प्रदेश बनवल्याचा चीनचा आरोप आहे.
भारताने चीनला सुनावले!
चीनने केलेल्या या आगळिकीबाबत माध्यमांमधून माहिती समोर आल्यानंतर भारताने त्यावर परखड शब्दांत चीनला ठणकावले आहे. आम्ही या संदर्भातल्या बातम्या वाचल्या. चीनकडून असा प्रयत्न पहिल्यांदाच होत नाहीये. आम्ही ही यादी फेटाळून लावत आहोत. अरुणाचल प्रदेश हा भारताचाच अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहणार आहे, अशा शब्दांत भारतीय परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी चीनला सुनावले आहे. अशा प्रकारे वेगळी नावे दिल्याने अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याच्या वास्तवात कोणताही बदल होणार नाही, असेही बागची यांनी म्हटले आहे.