चीनकडील सीमेवर भारत रस्त्यांचे विणणार जाळ

0
9

चीनकडून वाढता धोका लक्षात घेता केंद्र सरकारने सीमेवर पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू केले आहे. चीनच्या सीमेवर पुढील काही आठवड्यांमध्ये विशिष्ट पायाभूत सुविधांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये लेहच्या पर्यायी मार्गावरील रस्त्यांच्या पॅचचा समावेश आहे. तसेच केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने भारत-चीन सीमा रस्ते कार्यक्रमांतर्गत इतर प्रकल्पांनाही प्राधान्य दिले आहे. उत्तराखंडमधील मानसरोवर यात्रा मार्गावरील लिपुलेख खिंडीपर्यंत संपूर्ण कनेक्टिव्हिटी स्थापित करण्यास प्राधान्य देण्यासह लेहच्या पर्यायी मार्गावरील रस्त्यांचे पॅचिंग आणि सर्व हवामान संपर्क सुनिश्चित करण्याचा समावेश आहे.

लेहकडे जाण्यासाठी तीन मार्ग
लेहला जाण्यासाठी सध्या तीन मार्ग आहेत. यात जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर-झोजिला-कारगिलमार्गे जाणारा पहिला, दुसरा मार्ग हिमाचल प्रदेशातील मनाली-रोहतांगमार्गे, तर पदम आणि निमूमार्गे लेहला जोडणारा हा तिसरा मार्ग आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलैमध्ये त्यांच्या द्रास भेटीदरम्यान शिंकुन ला बोगदा प्रकल्पाच्या बांधकामाचा शुभारंभ केला होता. आता या बोगद्याचे काम सुरू होणार आहे. 15,800 फूट उंचीवर जगातील सर्वात उंच बोगदा बनेल. 1,681 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारा हा बोगदा मनाली आणि लेहमधील 60 किमीचे अंतर कमी करेल.