>> वझरे- दोडामार्ग येथे जंगले कुटुंबावर काळाचा घाला
दोडामार्ग येथून जवळच असलेल्या वझरे कोळगिरा येथे चिरेखाणीत असलेल्या पाण्यात पडून धनगर समाजातील नागेश विठ्ठल जंगले (७) व धोंडीराम भगवान जंगले (७) यांचा काल रविवारी मृत्यू झाला. या घटनेची दोडामार्ग पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. हे धनगर कुटुंब मूळ चौकुळ सावंतवाडी येथील असून त्यांच्यासोबत या समाजातील अनेक कुटुंबे दहा ते बारा वर्षांपासून येथे वास्तव्यास आहेत.
कोळगिरे येथील सरिता जंगले ही महिला येथे चिरेखाणीत नेहमीप्रमाणे कपडे धुण्यासाठी सकाळी गेली होती. यावेळी तिच्यासोबत नागेश व धोंडीराम हे दोघेही गेले होते. कपडे धुऊन झाल्यावर दोघेही मुलगे तेथे नसल्याचे तिला समजले. तिला ते दोघे घरी गेले असावेत असा विचार करून ती घरी आली. मात्र घरी येऊन पाहिले असता घरीही मुलगे नसल्याने मुलांचे वडील विठ्ठल व त्यांचा भाऊ चिरेखाणीवर गेले असता चिरेखाणीच्या पाण्यात ते दोघे मुलगे बुडाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दोन्ही मृतदेह चिरेखाणीत पंधरा फूट खोल होते.
आर्थिक मदतीची मागणी
चिरेखाणीत बुडून मृत्यू पावलेल्या दोन मुलांच्या मृत्यूस महसूल विभाग जबाबदार असल्याचा आरोप करत दोडामार्ग तहसीलदारांनी शासनाकडे असलेल्या खनिजकर्म निधीतून संबंधित दोन्ही कुटुंबांना पाच पाच लाख रूपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी धनगर समाज बांधवांच्या वतीने सखाराम झोरे यांनी केली आहे.