चिमुकलीच्या खून प्रकरणी मातेला जन्मठेप

0
3

1.10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला; बाल न्यायालयाचा निवाडा

बार्देश तालुक्यातील शिरसई येथील एका पाच महिन्यांच्या बालिकेच्या खून प्रकरणात तिची आई आर्मिंदा डोरा फर्नांडिस हिला बाल न्यायालयाने दोषी ठरवून काल जन्मठेप सुनावली. याशिवाय आणि 1.10 लाख रुपये दंडही ठोठावला.

ही घटना 14 ऑगस्ट 2022 रोजी रात्रीच्या वेळी कपेलवाडा-शिरसई येथे घडली होती. आर्मिंदा फर्नांडिसने रागाच्या भरात पाच महिन्यांच्या मुलीवर लाटण्याच्या साहाय्याने वार केल्याने तिच्या 5 महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या बालिकेचे वडील सुदन गोंडलेकर यांनी 14 ऑगस्ट 2022 रोजी उत्तररात्री मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या त्या बालिकेला बास्केटमध्ये घालून कोलवाळ पोलीस स्थानकात नेले. त्यानंतर कोलवाळ पोलिसांनी त्या बालिकेला म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी तिचा आधीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले होते. कोलवाळ पोलिसांनी त्या बालिकेची माता आर्मिंदा डोरा फर्नांडिस आणि वडील सुदन गोंडलेकर या दोघांविरोधात गुन्हा नोंद करून तपासाला सुरूवात केली. या चौकशीत आईने रागाच्या भरात मुलीला हातातील लाटण्याने मारहाण केल्याचे उघड झाले. त्यामुळे कोलवाळ पोलिसांनी त्या बालिकेच्या मातेच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

या बालिकेच्या मृत्यू प्रकरणाध्ये पोलिसांनी 200 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. पोलिसांनी 30 साक्षीदारांची साक्ष नोंदविली होती. बाल न्यायालयाने त्या बालिकेची माता आर्मिंदा फर्नांडिस हिला भादंसंच्या कलम 302 अंतर्गत जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद, तसेच गोवा बाल कायद्याचे कलम 8 अंतर्गत तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि 1 लाख रुपये दंड. दंड न भरल्यास दोन वर्षांची साधी कैद, अशी शिक्षा ठोठावली आहे.