चिनी क्रीडा साहित्यावर बहिष्कार

0
139

>> भारतीय भारोत्तोलक महासंघाचा निर्णय

भारतीय भारोत्तोलक (वेटलिफ्टिंग) महासंघाने चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या कोणत्याही साहित्याचा वापर न करण्याचे निश्‍चित केले आहे. चीनमधील साहित्य सदोष असते तसेच गलवानमध्ये चीनमुळे २० भारतीय जवानांना हौतात्म्य आल्याच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आल्याचे महासंघाचे सरचिटणीस सहदेव यादव यांनी सांगितले.

मागील वर्षी चीनमधील कंपनी झांग कॉंग बारबेल (झेडकेसी) यांच्याकडून आम्ही भारोत्तोलनाचे चार सेट खरेदी केले होते. यामध्ये बारबेल्स व वेटप्लेटस् यांचादेखील समावेश होता. परंतु, हे सदोष असल्याचे आढळून आले. त्यामुळे भारोत्तोलक याचा वापर करत नाहीत. महासंघ खेळाडूंच्या साहित्याच्या दर्जाशी कोणतीही तडजोड करत नाही, असे यादव यांनी सांगितले. भारोत्तोलक महासंघाचा निर्णय भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) यांना कळवल्याची माहिती त्यांनी दिली. भविष्यात आम्ही चीनमध्ये तयार झालेले कोणतेही साहित्य खरेदी करणार नाही. भारतात तयार झालेल्या क्रीडा साहित्याला महासंघ प्राधान्य देईल, असे यादव म्हणाले.

राष्ट्रीय प्रशिक्षक विजय शर्मा यांनी ‘झेडकेसी’कडून खरेदी करण्यात आलेल्या साहित्याविषयी बोलताना सांगितले की, कोरोनामुळे भारोत्तोलकाच्या सरावाला खीळ बसली होती. परंतु, भारोत्तोलकांनी पुन्हा सरावाला सुरुवात करताच साहित्याचा दर्जा निकृष्ट असल्याचे आढळून आले. खेळाडूंच्या कामगिरीवर याचा परिणाम होऊ नये यासाठी आम्ही याचा वापर बंद केला आहे. सर्व खेळाडूंनी आपल्या मोबाईलमधील ‘टिकटॉक’ ऍप काढून टाकले आहे. ऑनलाइन खरेदी करताना सर्व खेळाडू वस्तू कोणत्या देशात तयार झाली हे बारकाईने पाहतात, असे शर्मा पुढे म्हणाले. टोकियो ऑलिंपिकसाठी चीनमधील साहित्याचा वापर होणार होता. त्यामुळे भारोत्तोलकांना याचा सराव व्हावा, यासाठीच चीनमधून क्रीडा साहित्य आयात करण्यात आले होते, असे शर्मा म्हणाले. सर्व खेळाडू आता स्वीडनमध्ये तयार झालेल्या साहित्याचा वापर करत आहेत. ‘एलिको’ या कंपनीने हे तयार केले आहे. जगभरातील बहुतांशी स्पर्धांमध्ये ‘एलिको’ कंपनीने तयार केलेले साहित्य वापरण्यात येते. त्यामुळे काही दिवसांतच भारोत्तोलनाचे दहा नवे कोरे सेटस् महासंघाला मिळणार आहेत.