चिनी कंपनीकडून भारतातील महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत

0
123

>> ‘इंडियन एक्स्प्रेस’ चा शोधपत्रकारितेद्वारा मोठा गौप्यस्फोट;

झेन्हुआ ही चिनी कंपनी भारतातील बहुतेक सर्व महत्त्वाच्या व्यक्तींची वैयक्तिक माहिती गोळा करीत आली असल्याचा गौप्यस्फोट ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या देशातील आघाडीच्या राष्ट्रीय दैनिकाने जवळजवळ दोन महिन्यांच्या शोधपत्रकारितेअंती केला आहे.

‘ओव्हरसीज की इन्फर्मेशन डेटाबेस’ च्या नावाखाली सदर कंपनी ही माहिती गोळा करीत असल्याचे सदर वृत्तपत्राचे म्हणणे आहे. देशाचे पाच पंतप्रधान, दोन डझन मुख्यमंत्री, जवळजवळ ३५० खासदार, इतकेच नव्हे, तर राजकारण्यांपासून उद्योगपतींपर्यंत आणि न्यायालयांपासून प्रसारमाध्यमांपर्यंत विविध क्षेत्रांतील जवळजवळ दहा हजार नामांकित व्यक्तींवर अशा प्रकारे ऑनलाइन पाळत ठेवली जात होती, तसेच सदर कंपनीचा संबंध चीन सरकारशी व चिनी कम्युनिस्ट पक्षाशी असल्याचेही वृत्तात म्हटले आहे.

लष्करप्रमुख, नौदल व हवाईप्रमुख, तसेच लष्कर, नौदल व हवाई दलाचे १५ माजी प्रमुख यांचीही माहिती सदर कंपनीने गोळा केल्याचे सदर वृत्तपत्राचे म्हणणे आहे. देशातील बड्या उद्योगपतींप्रमाणेच काही स्टार्टअप्सच्या प्रमुखांचीही माहिती गोळा केल्याचे आढळून आले आहे. केंद्र सरकारच्या प्रशासनातील महत्त्वपूर्ण अधिकार्‍यांची माहितीही गोळा केली जात होती असे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. सध्याचे व माजी मिळून २३ केंद्रीय सचिवांची व अनेक राज्यांच्या आजी व माजी पोलीस प्रमुखांचीही नावे यात आहेत. क्रीडा, संस्कृती, प्रसारमाध्यमे, धर्मसंस्था आदींशी संबंधित व्यक्तींची माहितीही ही चिनी कंपनी गोळा करीत असे असेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ज्याला ‘डेटा सायन्स’ संबोधले जाते अशा प्रकारच्या अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने ही माहिती गोळा केली जात असे असे दिसते. या यादीमध्ये काही महानगरांचे महापौर, काही गावांचे सरपंच, काही आमदार, खासदार यांचीही नावे आहेत. विविध पक्षांचे १३५० राजकारणी या यादीत आहेत. त्यात राष्ट्रीय पक्षांबरोबरच प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचाही समावेश आहे. देशातील शास्त्रज्ञांचाही या नामावलीत समावेश आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने ही माहिती गेल्या दोन वर्षांत गोळा केली गेल्याचे आढळून आले आहे, असे ‘इंडियन एक्स्प्रेस’ने म्हटले आहे.

कशा स्वरूपाची माहिती?
सदर चिनी कंपनी राजकारण, प्रशासन, व्यवसाय, तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे आणि अन्य क्षेत्रांतील महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती गोळा करीत असे. त्यासाठी विविध सोशल मीडियांवरील त्यांचा वावर, प्रसारमाध्यमांतून त्यांच्यासंबंधी येणार्‍या बातम्या याबरोबरच कागदपत्रे, पेटंट, निविदा कागदपत्रे आदी मिळतील त्या स्त्रोतांतून ही माहिती गोळा केली जाई असे ‘इंडियन एक्स्प्रेस’चे म्हणणे आहे. या माहितीचा वापर चिनी गुप्तचर यंत्रणांना करून दिला जात असण्याची शक्यताही यातून समोर येत असून सध्याच्या भारत चीन दरम्यानच्या लडाखमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या वृत्ताला महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा प्रकारच्या व्यक्तिगत माहितीचे विश्लेषण करून त्याचा वापर करण्याच्या तंत्राला ‘हायब्रिड वॉरफेअर’ असे संबोधले जाते.

गोव्याचे राजकारणी आणि पणजीचे महापौरदेखील!
‘झेन्हुआ’ कडून ज्यांची माहिती गोळा केली जात होती, त्यामध्ये गोव्याचे आजी माजी मुख्यमंत्री, मंत्री, तसेच अगदी पणजीच्या महापौरांचादेखील समावेश आहे असे ‘इंडियन एक्स्प्रेस’ च्या सदर शोधपत्रकारितेतून उजेडात आलेली माहिती पाहता दिसून येत आहे. दिवंगत संरक्षणमंत्री व गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, तसेच अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांचा देखील या यादीत समावेश आहे.