चित्रपटांसाठी समाजाकडून मिळते प्रेरणा

0
6

इफ्फीतील संवाद सत्रात दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी व्यक्त केले मत

आपणाला चित्रपटांसाठी समाजाकडून प्रेरणा मिळते. समाजाची नाडी समजून घेतल्याने पडद्यावर आणलेल्या कथांना बळ मिळते. प्रभावी चित्रपट तयार करण्यासाठी खिळवून ठेवणारी पटकथा आवश्यक आहे. खिळवून ठेवणारी पटकथा ही एका चांगल्या चित्रपटाच्या हृदयाची स्पंदने असतात, असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता मधुर भांडारकर यांनी कला अकादमीमध्ये आयोजित 54 व्या इफ्फीतील संवाद सत्रात बोलताना काल व्यक्त केले. संवाद सत्रात मधुर भांडारकर यांच्याशी चित्रपट समीक्षक आणि विश्लेषक तरण आदर्श यांनी संवाद साधला.

चित्रपट निर्मिती हा एक नैसर्गिक प्रवास आहे जिथे अपयश ही यशाची पहिली पायरी असते. उत्कृष्ट आशय निर्मितीसाठी ते अपरिहार्य आहे. नवोदित चित्रपट दिग्दर्शकांनी श्रद्धा आणि आत्मविश्वासाने काम करण्याची गरज आहे. चित्रपट निर्मितीतील सर्जनशील समाधानासाठी अतूट विश्वासाची गरज असते. हा मार्ग सोपा नाही; परंतु पटकथेवर आणि स्वतःवर विश्वास ठेवणे सर्वोत्तम आहे, असेही भांडारकर यांनी सांगितले.

चित्रपट एका कल्पनेतून निर्माण होतो. सिनेमॅटिक परिदृश्यात वास्तववादी सिनेमाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. वास्तववादी चित्रपटांमध्ये कलात्मक आणि व्यावसायिकदृष्ट्‌‍या प्रभावशाली असण्याची दुहेरी कसरत सांभाळतानाच प्रेक्षकांच्या मनाला भिडण्याची शक्ती असते, असे भांडारकर यांनी सांगितले.

संशोधन हा चित्रपट निर्मितीचा यूएसपी आहे. कथा सादरीकरण, कथेला सखोलता आणि प्रामाणिकतेची जोड देऊन समृद्ध करणारा हा पाया आहे. बॉक्स ऑफिसच्या यशासाठी कोणताही नियम नाही. वित्त पुरवठा आणि आशयाचे स्वातंत्र्य मोठी आव्हाने उभी करतात; मात्र नवोदित चित्रपट दिग्दर्शकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.