कालची सकाळ समस्त भारतीयांसाठी अपूर्व आनंदाची ठरली. जवळजवळ ४१ वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने काल टोकियो ऑलिम्पिकमध्ये एका अत्यंत चित्तथरारक सामन्यामध्ये कांस्यपदक हस्तगत केले. खरे तर बेल्जियमविरुद्धची उपांत्यफेरी हरल्यानंतर कोणत्याही संघाचे मनोधैर्य खच्ची झाले असते, परंतु ज्या प्रकारे काल कांस्यपदकासाठी भारतीय संघाने जर्मनीशी प्रबळ झुंज दिली ती थरारक तर होतीच, परंतु क्रीडाजगतामध्ये एका नव्या ऊर्जेची पेरणी करणारीही होती. सदैव क्रिकेट, क्रिकेट, क्रिकेट करणार्या आणि क्रिकेटपलीकडे इतर खेळांना नाके मुरडणार्या आजच्या तरुणाईला हॉकीसारखा खेळही त्याहून थरारक आणि रोमांचकारी असू शकतो ह्याचा प्रत्ययच यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय पुरुष व महिला हॉकी संघांच्या सामन्यांनी दिला आहे. केवळ पुरुष संघाचीच नव्हे, तर महिला संघाची कामगिरीही तोडीस तोड आहे आणि आज महिला संघही कांस्यपदकासाठी ग्रेट ब्रिटनशी झुंजणार आहे.
कालचा पुरुष हॉकीचा सामना सुरू होताच दुसर्याच मिनिटाला जर्मनीने फील्ड गोल करून भारताला १-० ने पिछाडीवर टाकले होते. पहिली पंधरा मिनिटे जर्मनीची ही आघाडी कायम राहिली, परंतु दुसर्या पंधरा मिनिटांत सिमरनजीतसिंगनेही फील्ड गोल करून १-१ ची बरोबरी साधली तेव्हा भारतीय क्रीडारसिकांच्या अपेक्षा उंचावल्या, परंतु चोविसाव्या मिनिटाला जेव्हा निकलस मेलेनने गोल डागला आणि त्या पाठोपाठ दुसर्या मिनटाला बेनेडिक्टने तिसरा गोल केला तेव्हा जर्मनीच्या ३-१ च्या आघाडीने सामना पाहणार्या कोट्यवधी भारतीयांना निराशेच्या गर्तेत ढकलले होते. परंतु भारतीय हॉकी संघाचे कौतुक करावे लागेल ते ह्या पिछेहाटीनंतरही निराश न होता आणि धैर्य न सोडता त्यांनी केलेल्या दमदार पुनरागमनाबद्दल. हार्दिकसिंगने पेनल्टी कॉर्नरची संधी साधत दुसरा गोल केला आणि दोन मिनिटांत पुन्हा दुसर्या पेनल्टी कॉर्नरला हरमनप्रीतसिंगने तिसरा गोल डागून जर्मनीशी बरोबरी साधली आणि हाफ टाइमपर्यंत भारतीय क्रीडारसिकांच्या जिवात जीव तर आलाच, परंतु पुढील कामगिरीबाबतची उत्सुकताही प्रचंड ताणली गेली.
सामन्याच्या उत्तरार्धाची सुरुवात होताच भारताच्या रुपिंदरपालसिंग आणि सिमरनजीतने आणखी दोन गोल डागून भक्कम वर्चस्व प्रस्थापित केले तेव्हा कोट्यवधी भारतीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही, परंतु जर्मनीला लागोपाठ मिळत गेलेल्या पेनल्टी कॉर्नर्सनिशी प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकतच राहिला. जर्मनीच्या लुकसने पेनल्टी कॉर्नरला एका गोलची परतफेड केली तेव्हा मागील पराभवाची पुनरावृत्ती होणार की काय अशी शंकेची पाल चुकचुकू लागली होती, परंतु सामना संपता संपता जर्मनीला मिळालेले पेनल्टी कॉर्नर रोखण्यात भारतीय गोलरक्षक श्रीजेशला मिळालेले यश भारताला ऐतिहासिक विजयाकडे घेऊन गेले. निराशेच्या गर्तेत जाऊन आत्मविश्वास न गमावता ज्या तर्हेने ही विजयश्री भारतीय संघाने अक्षरशः खेचून आणली ती ह्या विजयाला अधिक मोल मिळवून देणारी आहे. ह्या स्पर्धेच्या उपांत्यफेरीत बेल्जियमला वारंवार लाभलेल्या पेनल्टी कॉर्नरमुळे हार पत्करावी लागली नसती तर भारतीय संघाने कदाचित थेट सुवर्णपदकापर्यंतही मजल मारली असती.
आज महिला हॉकी संघाचा सामना कांस्यपदकासाठी ग्रेट ब्रिटनशी होणार आहे. उपांत्यफेरीत त्या संघालाही अर्जेंटिनाकडून अवघ्या एका गोलने पराभव सोसावा लागला असला तरी महिला हॉकी संघाचा खेळही निश्चितच दमदार आणि नेत्रदीपक राहिला आहे. त्यामुळे आज कांस्यपदकासाठीच्या सामन्यामध्ये पुन्हा एकवार ह्या रणरागिणी आपली चमक दाखवतील अशी अपेक्षा आहे. काल रवी दहिया कुस्तीच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला तरी त्याने भारताला रौप्यपदक मिळवून दिले आहे. भारताची पदक तालिका इतर देशांच्या तुलनेत कमी असेल, परंतु किमान ह्या कोरोनाकाळातील ऑलिम्पिक स्पर्धेने क्रिकेटेतर खेळांबाबत भारतीय युवापिढीमध्ये जी उत्सुकता आणि उत्साह निर्माण केला आहे तो खरोखर अभूतपूर्व आहे. कुस्ती असो, बॅडमिंटन असो अथवा हॉकी असो, ह्या सगळ्या खेळांविषयी आजची तरुणाई भरभरून बोलताना आणि टीव्हीवर आवर्जून सामने पाहताना दिसत आहे. यापूर्वीच्या ऑलिम्पिकला असे चित्र सहसा दिसत नव्हते. त्यामुळे हा जो काही नवउत्साह भारतीयांच्या नव्या पिढीमध्ये निर्माण झालेला आहे, तो ह्या सगळ्या खेळांमधील भारताचा भावी सहभाग आणि कामगिरी ह्याबद्दलच्या अपेक्षा नक्कीच उंचावतो. विविध क्रीडाप्रकारांना योग्य उत्तेजन मिळाले तर पुढील ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारत याहूनही सरस कामगिरी नक्कीच करून दाखवील!