- प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर
जणू काही चिकित्सा विक्रीला ठेवल्याप्रमाणे तिचा लिलाव होत आहे. पुरस्कार आणि पारितोषिके देताना गुण आणि योग्यता न तपासता गोतावळा धुंडाळला जात आहे. पुरस्कारप्राप्त माणसांची नावे जाहीर झाल्यावर हसावे की रडावे हेच समजत नाही.
माणसाची चिकित्सक वृत्ती नेहमीच त्याला उपकारक ठरली आहे. कोणतीही वस्तू निवडताना चिकित्सा हवीच. चिकित्सा केल्यामुळे वस्तूतील गुण-दोष आपल्या लक्षात येतात. वस्तू बाहेरून चांगली दिसली म्हणजे ती आतून चांगली असतेच असे नाही.
जुने घर भाड्याला देताना आकर्षक दिसणारा रंग भिंतीना ला
वतात. विजेचे दिवे, पंखे, नळ यांची तात्पुरती दिखाऊ दुरुस्ती करतात आणि भाडे वाढवून बोली करतात.
राहायला आलेला माणूस आपल्या नजरेतून घराची चिकित्सा करतो. सगळे दोष त्याच्या लक्षात येतात. छताच्या सिमेंटचे तुकडे गेल्याचे जाणवते. जमिनीच्या फरशीना भेगा पडल्याचे दिसते. भिंतीना ठिकठिकाणी फूट आल्याचे लक्षात येते. खिडक्या मोडक्या असल्याने हवेचा कोंदटपणा गुदमरायला लावतो. संडास, बाथरूमच्या टाक्या तुंबल्यामुळे दुर्गंधी अस्वस्थ करत असते. ही सगळी चिकित्सा मनातल्या मनात करूनदेखील बिचारा भाडेकरू अतिमहाग अशी तीच खोली भाड्याने घेतो. कारण त्याचा नाइलाज असतो. दुसरी चांगली खोली मिळत नाही. जे मिळते तेच स्वीकारावे लागते.
मासे ताजे नाहीत व त्यांना खराबीचा वास येतो हे आपल्याला कळते. आपली चिकित्सा बरोबर असते तरीदेखील महाग किमतीत आपण ते खराब मासे खरेदी करतो. कारण आपला नाइलाज असतो. दुसरे चांगले मासे मिळत नाहीत. जेवताना आपण ते घेण्यासाठी पैसे मोजलेत म्हणून तोंड वाकडे करत आपल्या घशाखाली ढकलतो. चिकित्सा आपली चांगली असते, पण दुर्लभतेमुळे आपला नाइलाज असतो.
पालेभाज्या खूपदा ताज्या नसतात. फळेदेखील खूप दिवसांची शिळी असतात. जेव्हा आपल्याला पर्याय खूप उपलब्ध असतात तेव्हा आपण चांगले तेवढे शोधत जातो. पण जेव्हा ती उपलब्धता नसते तेव्हा जे मिळते ते नाइलाजाने घेऊन येतो. घरातील इतर माणसांकडून आपल्या चिकित्सेची चाललेली बदनामी आपल्याला पचवावी लागते.
स्त्रिया साड्या खरेदी करताना रंग, धागा, सूत, किनार, मॅचिंग, डिझाईन, वीण या सगळ्यांची बारकाईने चिकित्सा करतात. रेडिमेड कपड्यांच्या दुकानात पुरुषदेखील पँट व शर्ट निवडताना रंग, कपडा, किंमत व मॅचिंग यांची चिकित्सा करतात.
विकायला ठेवलेल्या बैलांची शिंगे रंगवतात, त्यांना सजवतात, पण खरेदी करताना त्यांच्या आतील गुणांची पारख करावी लागते. नांगर जुंपल्यावर तो ठीक चालणार का? शेतातील कामासाठी तो चपळ असेल का? पारख नसलेला माणूस येथे फसतो. म्हणून येथे अनुभवी चिकित्सा हवी.
वधूला निवडताना काही माणसे वधूची चिकित्सा गाय-बैल खरेदी केल्याप्रमाणे करतात. हे चुकीचे आहे असे मनातून वाटते. वधू दिसते कशी? तिचा रंग, आकार, प्रत्येक अवयव यांचे इतके बारकाईने निरीक्षण करतात की वधू बिचारी लज्जित होते. कधी या वधू-परीक्षेतून आपली सुटका होईल या चिंतेत ती असते. होकार किंवा नकार. वधूच्या हृदयाची धडकन कोणी बरे ऐकावी?
तिला काय येते व काय येत नाही यावर प्रश्न विचारले जातात. काही ठिकाणी तिला गीत गायलाही लावले जाते. स्वयंपाक कसा करावा व वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपी यांवरही प्रश्न विचारले जातात. शिवण-सूत, भरतकाम, विणकाम यांचीदेखील प्रात्यक्षिके तपासली जातात. ही सगळी बहिर्गत चिकित्सा झाली. अंतर्गत चिकित्सा ही स्वभावाची असते. ती चाचणी समजणे अगदीच कठीण. खूपदा सगळी चिकित्सा करून आणलेली वधू कुटुंब टिकविण्यास निरुपयोगी ठरते. म्हणून बाहेरील रूप-रंगापेक्षा वधूचे स्वभाव-गुण महत्त्वाचे ठरतात. म्हणून समाजाने चिकित्सा करताना बाहेरच्या सजावटीला भुलू नये तर अंतर्गत गुणांची चिकित्सा करावी. संत चोखा मेळ्याच्या अभंगाची येथे प्रकर्षाने आठवण येते.
ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा।
काय भुललासी वरलिया रंगा॥
आजच्या जगात चिकित्सा बाजारू बनली आहे. आजचे चिकित्सक भ्रष्टाचाराला बळी पडत आहेत. लांच देऊन काम बनवून घेणे, मिळत नसलेले प्रमाणपत्र गैरमार्गाने मिळवणे, मुळातच ठिसूळ व अर्धवट असलेला प्रबंध वशिलेबाजीने पास करवून घेऊन खोट्या पदव्यांचा मुकुट घालून मिरवणे ही आजची भ्रामक प्रतिष्ठा बनली आहे. मौलिक विचार नसताना इथून-तिथून नक्कल केलेले व इंटरनेटवरून आयती माहिती गोळा करून चिकटवलेले प्रोजेक्ट आज ताबडतोब ग्राह्य ठरवले जात आहेत. जणू काही चिकित्सा विक्रीला ठेवल्याप्रमाणे पावणीच्या संदर्भात तिचा लिलाव होत आहे. पुरस्कार आणि पारितोषिके देताना गुण आणि योग्यता न तपासता नाती-गोती, जाती-धर्म, आतला-बाहेरचा, आपला-परका हा सगळा गोतावळा धुंडाळला जात आहे. पुरस्कारप्राप्त माणसांची नावे जाहीर झाल्यावर हसावे की रडावे हेच समजत नाही.
वैद्यकीय चिकित्सा तरी विश्वासपात्र व्हायला हवी. तिचेदेखील खूप ठिकाणी अवमूल्यन झालेले दिसते. चिकित्सेला आज उतरती कळा लागली आहे, हे माणसाच्या मनोवृत्तीचे अधःपतन आहे. माणसाची विचारक्षमता घसरत खालच्या पातळीवर पोहोचल्याचे हे लक्षण आहे.