चिंबलमध्ये टॅक्सीचालकाचा संशयास्पद मृत्यू

0
9

>> आयआरबी पोलिसासह दोघांना जुने गोवे पोलिसांनी घेतले ताब्यात

चिंबल येथील टॅक्सीचालक जयेश चोडणकर यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून, जुने गोवे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशीला सुरू केली आहे. संशयितांमध्ये एका आयआरबी पोलिसाचाही समावेश आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिंबल जंक्शनवर जयेश चोडणकर आणि अन्य एका व्यक्तीमध्ये वाहन पार्किंगच्या विषयावरून बुधवारी रात्री आठच्या सुमारास वाद झाला होता. त्याच रात्री जयेश चोडणकर हा मेरशीजवळ रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली होती. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये उपचार सुरू असताना त्याचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला.

जयेश याला झालेला हा अपघात की घातपात, याचा शोध जुने गोवा पोलीस घेत आहेत. या प्रकरणी संशयित म्हणून कृपेश वळवईकर (बिठ्ठोण) आणि प्रीतेश हडकोणकर (चिंबल) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रीतेश हडकोणकर हा आयआरबी पोलीस म्हणून कार्यरत आहे.

चिंबल येथे पार्किंगच्या विषयावरून वाद झाल्यानंतर रात्री उशिरा वाद झालेला तो व्यक्ती आणि त्याच्या नातेवाईकाने जयेशला बोलावून माफी मागण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली. त्यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जयेश मेरशीजवळ जखमी अवस्थेत आढळून आला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जयेशला इस्पितळात दाखल केले. पोलिसांनी हिट अँड रन आणि मारहाण केल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे नोंद केले आहेत. या प्रकरणी जुने गोवे पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.