गवळेभाट चिंबल येथील एका बार ऍण्ड रेस्टॉरंट मालक विश्वंभर शिरवईकर यांचे खुनाच्या हेतूने अपहरण ओल्ड गोवा पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसले असून या प्रकरणी चार जणांना काल अटक करण्यात आली. अशी माहिती पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी काल दिली.
या प्रकरणी अनार वागमुडे, चेतन वागमुडे, विनायक वागमुडे आणि गौरीश फातर्पेकर (सर्व मेरशी) अशा चार जणांना अटक करण्यात आली आहे. गवळेभाट चिंबल येथील एका व्यक्तीचे चार युवक अपहरण करीत असल्याची माहिती शनिवारी रात्री ओल्ड गोवा पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलीस येत असल्याचे दिसून येताच संशयितांनी ‘त्या’ व्यक्तीला रस्त्याच्या बाजूला फेकून पलायन केले. पोलीस पथकाने ‘त्या’ व्यक्तीला ताब्यात घेऊन या प्रकरणी रीतसर तक्रार नोंदवून घेतली. विश्वंभर शिरवईकर असे पोलिसांनी सुटका केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शनिवार ६ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास दुकानाच्या होणारे भांडण शिरवईकर यांनी रोखले होते.
तोच राग मनात ठेवून संशयित चार जण आणखीन काही जणांना घेऊन रात्री ९.१५ च्या सुमारास शिरवईकर यांच्या दुकानावर आले. त्यांनी शिरवईकर याना मारहाण केली. तसेच दुकानातील सामानाची नासधूस केली. शिरवईकर यांचे वडील आणि गणेश नामक इसमाला मारहाण केली. तसेच, शिरवईकर याना चॉपरचा धाक दाखवून स्कूटरवर बसवून अज्ञात स्थळी नेण्यास सुरुवात केली होती. परंतु, पोलीस वेळीच ‘त्या’ ठिकाणी पोहोचल्याने त्यांचा अपहरणाचा बेत फसला.
या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर संशयितांना ताब्यात घेण्यासाठी खास पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. खास पथकाने दोन तासात चारही जणांना ताब्यात घेण्यात यश मिळविले, अशी माहिती पोलीस निरीक्षक दळवी यांनी दिली.