चाळीशी येताच स्त्री का थकते?

0
710
  •  डॉ. मनाली म. पवार
    (गणेशपुरी, म्हापसा)

एक म्हणजे कालानुसार येणारे प्रौढत्व, प्रौढत्वाबरोबर येणारे शारीरिक बदल, शारीरिक बदलाबरोबर होणारे कामजीवनातील बदल हे मान्य करायला शिकले पाहिजे. ही जी मनाला समजावण्याची स्थिती ती अध्यात्मामुळे प्राप्त होते. आता आपले तारुण्य पूर्वीप्रमाणे राहिले नाही, याची जाणीव ठेवून औषधोपचार घ्यावेत.

ज्यावेळी हाडांमध्ये वेदना उत्पन्न होतात त्यावेळी हाडाच्या कडेच्या शिरांमध्ये रोध असतो. हाडातील स्निग्ध पदार्थ म्हणजे मज्जा क्षीण होते. मज्जा क्षीण झाल्यास हाडे पोकळ होतात. यावर गाईचे दूध, तूप, गोड ताक, मोरावळा, सर्व प्रकारच्या ताज्या भाज्या, पालेभाज्या, फळे यांचा योग्य उपयोग करणे व वेळच्या वेळी जेवणे,

अनादी काळापासून स्त्रीला ‘शक्ती’ मानलेले आहे. या शक्तीचे रूप फक्त बलरुपी शक्ती नव्हे, शक्तीचे रुप शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक सर्व रुपात पहायला मिळते. आजच्या स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. स्त्रियांनाही समानता हवी आहे. मग आजची स्त्री चाळीशी येताच का थकते, कारण स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेणे. सतत ताण-तणावात, सतत कसली तरी चिंता, शारीरिक श्रम, हार्मोन असंतुलन, अयोग्य अन्न सेवन, व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांनी स्त्रियांचे स्वास्थ्य लवकर बिघडायला लागते. युवावस्थेत संपूर्ण घराचे संसाराचे इंद्रधनुष्य पेलणारी स्त्री अचानक निष्क्रीय व चिडचिडी व्हायला लागते, अचानक तिच्या आयुष्यात जणू पोकळी आल्यासारखी वाटते. अशा स्त्रियांमध्ये कंबरदुखी – सांधेदुखी व नैराश्य खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते म्हणून महिला दिनी त्यांच्या आरोग्यासाठी पुरस्कृत करा. दरवर्षी जास्तीत जास्त महिला आरोग्याच्या दृष्टीने पावले उचलतील एवढ्या त्या सक्षम बनल्या पाहिजे.

मॉर्निंग वॉक घेणार्‍या पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाणे वाढले पाहिजे. एखाद्-दुसरी सूर्यनमस्कार घालणारी आजी… एवढेच प्रमाण न राहता, प्रत्येक स्त्रीने सूर्यनमस्कार घातले पाहिजेत. आरोग्याच्या तक्रारींना कुठेच वाव देता कामा नये. चाळीशीच्या पुढे सुद्धा स्त्रिया सर्व बाबतीत सक्षम बनल्या पाहिजे व हे शक्य आहे.
आर्तव निवृत्ती काळापूर्वी साधारण चाळीशीतच शरीरामध्ये परिवर्तन होऊ लागते. गर्भधारणेला प्रतिबंधक असे परिवर्तन घडायला लागते. म्हणजे अंतःफलाकडून बीजनिर्मिती बंद व्हायला लागते. क्वचित प्रसंगी दाढीमिशांच्या जागी दाट लव येऊ लागते. शरीर एकदम स्थूल किंवा बारीक होते. स्त्रीच्या चेहर्‍यावरील स्त्रीसुलभ कोमलता नाहीशी होते, चक्कर येते, स्त्रिया बैचैन होतात, चिडचिड करतात, वेड्यासारख्या वागतात, चंचल होतात, झोप येत नाही, अंग गरम होते, अधोदरात वेदना, स्तनभागी वेदना, धडधडणे, ढेकरा येणे, मलावष्टंभ अशी लक्षणे उत्पन्न होतात. हा काळ स्त्रीसाठी ‘संक्रमक’ काळ आहे.

या काळात सार्वदेहिक पित्त कमी होते. ज्यामुळे रस-रक्त संवहनात बिघाड उत्पन्न होतो. म्हणून हात-पाय गार पडतात, थंडी जास्त वाजते, हातापायाला मुंग्या येतात, सांधे दुखतात. कंबर दुखते, अरुची, अग्निमांद्यासारखी लक्षणे दिसतात. अशा वेळेला द्रवप्राय, उष्ण अशी पंचकोष सिद्ध पेया, दाडिमादी घृत इत्यादिंचा उपयोग होतो. तिळ किंवा मोहरीच्या तेलाने अभ्यंग करावे.
काही जणींमध्ये वारंवार अंग गार पडण्याची तक्रार दिसते. अशा वेळी हृद्य, बल्य, उष्ण असा आहार द्यावा. आर्द्रकावलेहाबरोबर १ चमचा बला तेल + एक चमचा तूप असा उपयोग करावा. याकडे दुर्लक्ष झाल्यास रक्तस्कन्नता येऊन तीव्र सांधेदुखी होण्याची शक्यता असते. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये.

एकदम चक्कर येणे किंवा डोक्यात गरम होणे अशी लक्षणेही उत्पन्न होतात. यामध्ये पचनही बिघडते. बहुतेकदा मलावष्टंभाची तक्रार असते आणि रक्तधातूतील पित्त वाढलेले असते. रक्तधातूतील आग्नेय गुणे वाढलेला असतो. त्यामुळे गरमपणा वाढलेला असतो व हा गरमपणा विशेष करून बीजधातून वाढतो. त्यामुळे रजप्रवृत्ती कमी होणे किंवा जास्त होणे असा खेळ सुरू होतो. आधिक्य असलेल्या संप्राप्तीत दुर्लक्ष केल्यास ‘व्हेरीकोज व्हेन्स’चा त्रास वाढू लागतो. त्यामुळे तीव्र पादशूल निर्माण होऊन हलताही येत नाही. अशा परिस्थितीत काही जणींना उच्च रक्तदाबाची सवय लागते, डोके दुखी होते किंवा उन्हाळे लागून पित्तज मेहाची संप्राप्ती घडते.

कित्येक स्त्रियांना शुल्लक कारणांनी चिंता करण्याची सवय लागते. ही चिंता ओढवून घेतलेल्या कारणांनी असल्यामुळे शारीरिक दौर्बल्याबरोबर मानसिक दौर्बल्यही यात जाणवू लागते. म्हणून या ठिकाणी शारीरमानस अशा प्रकारची चिकित्सा करावी लागते.
मुले मोठी होतात व बायकांची जबाबदारी कमी होते. त्यामुळे आपल्याला काही किंमत नाही असे वाटूनही या बायका रंजीस येतात आणि पाळी जाताना होणारा त्रास सहन करू शकत नाही. कारण पाळी जाताना येणारा थोडासा अनियमितपणा, उशिरा येणे, लवकर येणे, रजःस्राव अत्याधिक प्रमाणात होणे, कधी खूप कमी प्रमाणात होणे ही सर्व लक्षणे आर्तववह स्रोतसाच्या संकोचामुळे उत्पन्न होतात. म्हणून पाळी बंद होण्याच्या वेळी ती जाणवतात. यावरही द्रवप्राय बल्य आहार आणि हृद्य औषधांचा योग्य उपयोग करावा. विदारी, अश्‍वगंधा, शतावरी, शतपुष्पा, जटामांसी, ब्राह्मी आदी बल्य व रसायन औषधांचा वापर करावा. शुक्रधातुच्या (आर्तव) कमतरतेमुळे आलेले दौर्बल्य कमी होण्यास मदत होते.

पंचेचाळीस – पन्नास या काळामध्ये स्त्रीचे तारुण्य संपते आणि ती वार्धक्याकडे झुकू लागते. त्यामुळे अंतःफलाची क्रिया मंदावते. पुरुष व स्त्री यांच्यामध्ये हाच प्रमुख फरक आहे, कारण स्त्री ही लवकर मोठी होते व लवकर वृद्ध होते उलट, पुरुष हा उशिरा तरुण होतो व उशिरा वृद्ध होतो. यामुळे ज्यावेळी योनिभागातील श्‍लेष्मा अंतःफलाच्या आकुंचनामुळे कमी होऊ लागते. त्यावेळी कित्येक स्त्रियांमध्ये कामजीवनाविषयी साशंकता निर्माण होते. यामुळे या स्त्रिया मानसिक ताण घेतात. कारण तरुणवयात निरोगिता, वर्णसंपत चांगला असणे, स्वर चांगला असणे, समोपचित असा बांधा असणे, बल चांगले असणे, बुद्धी कार्यक्षम असणे, या असणार्‍या आपल्या गोष्टी नाहीशा होणार व विषयसेवनात प्रत्यवाय निर्माण होणार, आयुष्य आहे तोपर्यंत सुखोपओग घ्यायला हवा… याचा ताण घेवून कित्येक स्त्रिया आजारी पडतात.

एक म्हणजे कालानुसार येणारे प्रौढत्व, प्रौढत्वाबरोबर येणारे शारीरिक बदल, शारीरिक बदलाबरोबर होणारे कामजीवनातील बदल हे मान्य करायला शिकले पाहिजे. ही जी मनाला समजावण्याची स्थिती ती अध्यात्मामुळे प्राप्त होते. आता आपले तारुण्य पूर्वीप्रमाणे राहिले नाही, याची जाणीव ठेवून औषधोपचार घ्यावेत. ह्या काळात औषधे घेताना किंवा देताना नुसता योनिगत श्‍लेष्मा वाढवण्यासाठी औषधोपचार घेऊ नये किंवा विचार न करता रसायन म्हणजे उर्जस्कर व वृष्य अशा अंतःफलावर कार्य करणार्‍या वयस्थापन औषधींचा उपयोग केल्यास श्रम, व्याधी, यांचा नाश होतो व भूक वाढते. भूक वाढल्यामुळे स्वाभाविकच अग्नीची शक्ती वाढते, इंद्रियाची शक्ती वाढते. सत्व, कांती व ओज वाढते. आरोग्य सुधारते आणि त्यामुळे शुक्र (आर्तव) धातूही प्रबल होतो. रसायन औषधांचा योग्यरित्या ह्या वयात उपयोग केल्यास बर्‍याचशा समस्या दूर होतात. जरा डोळसपणे ह्या वयात विचार करणे व पाहणे महत्वाचे आहे.

योनिगत श्‍लेष्मा कमी झाल्यास मनातल्या मनात रागावणे, धुसफुसणे, खिन्न होणे, जळफळाट होणे किंवा मध्येच रडणे ही सर्व ओजक्षीणतेची लक्षणे दिसू लागतात. कारण त्यांना असुरक्षितेची भावना भेडसावू लागते. मुलांकडून मिळणारा स्नेहभाव कमी होतो आहे असे जाणवू लागते ही खूप महत्वाची बाब आहे.

चाळीशीच्या आसपास अग्निमांद्य हे एक महत्वाचे लक्षण बर्‍याच स्त्रियांमध्ये आढळते. त्याचे कारण म्हणजे त्यांना चमचमीत खाण्याची आवड आहे किंवा काही कारणांमुळे यकृत अशक्त आहे. अशा स्त्रियांमध्ये वायू साम होवून सुरूवातीला विषध, मग विषमाग्नी म्हणजे मध्येच भूक लागते – मध्येच लागत नाही अशा तक्रारी सुरू होतात आणि अग्निमांद्य ही कायमची तक्रार राहते. मग त्या भूक लागत नाही म्हणून अरबट-चरबट किंवा चमचमीत खायला लागतात. परिणामी वायू साम होतो. तो रसरक्ताला दुष्ट करतो. हे सामदोष ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी तीव्र वेदना निर्माण करतात.

रसरक्तातील प्राकृत स्थिती बदलते. रक्त घट्ट होते. रक्तातील द्रवता कमी होते. त्योच रंजकत्व कमी होते. त्यामुळे रक्तस्थ आप आणि तेज ही महाभूतं बिघडतात. स्वाभाविकच त्यांचे लघुत्व कमी होते आणि स्रोतोरोध होऊन येथील स्पंद कमी होतो. वायूच्या वहनाच्या कार्यास अडथळा निर्माण होतो. म्हणून चाळीस-पंचेचाळीस वयानंतर स्त्रियांमध्ये सांधेदुखी हे लक्षण प्रकर्षाने निर्माण होते. यामध्ये वेदना तीव्र स्वरुपाच्या असतात. वयानुसार सहनशक्ती कमी झाल्यामुळे त्या वेदना सहन होत नाहीत व पेन किलर घेण्याची प्रवृत्ती उत्पन्न होते. वास्तविक वेदनाशामक द्रव्यांनी तात्पुरता आराम मिळतो व आजाराच्या संप्राप्तीचा भंग होत नाही. पथ्यपालन करण्याची सवय नसल्याने रोग वाढत जातो. याचा परिणाम हृदयस्थ धमन्यांवरही पडू शकतो, आमता वाढत जाते त्यामुळे सांधेदुखीच्या जोडीला हृदय रोगही उत्पन्न होऊ शकतो.

यावर उपाय म्हणजे योग्य आहार, अग्निमांद्य दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. यासाठी वेळच्या वेळी फुलका, भाजी, मुगाचे वरण, भाकरी, चाकवत, कोहळा, मुळा, दुधी, पडवळ… अशा भाज्या, मूग, मसूर ही कडधान्ये यांचा वापर करून तेलकट पदार्थ चिवडा, वेफर, बिस्किटे, भजी – वर्ज्य करून गोड- साधे ताक, फळे, मुस्ता – शुंठी सिद्ध जल यांचा योग्य वापर केल्यास हळुहळू फरक पडू लागतो व रुग्ण बरा होतो.

दुसर्‍या प्रकारामध्ये काही स्त्रियांना अति तिखट खाणे, उशिरा जेवण, जेवणामध्ये तूप-भाज्या, फळे कमी खाणे, सरसरीत पदार्थ म्हणजे कढी, सार, पातळभाजी, वरण न खाणे यामुळे शरीराला आवश्यक असणारे घटक निर्माण होण्याची प्रक्रिया कमी होते. ज्यावेळी हाडांमध्ये वेदना उत्पन्न होतात त्यावेळी हाडाच्या कडेच्या शिरांमध्ये रोध असतो. हाडातील स्निग्ध पदार्थ म्हणजे मज्जा क्षीण होते. मज्जा क्षीण झाल्यास हाडे पोकळ होतात. यावर गाईचे दूध, तूप, गोड ताक, मोरावळा, सर्व प्रकारच्या ताज्या भाज्या, पालेभाज्या, फळे यांचा योग्य उपयोग करणे व वेळच्या वेळी जेवणे, याबरोबरच महायोगराज गुग्गुळ, महावातविध्वंस, गुळवेल सत्व. यष्टीमधु, गोक्षूर, मंजिष्ठा व शुंठी यांचा प्रकृतीनुसार उपयोग करावा. सोबत अनुवासन व निरुह बस्ती दिल्यास संप्राप्ती भंग होऊन रुग्णांस बरे वाटते
तिसर्‍या पद्धतीने निर्माण झालेली लक्षणे म्हणजे शिळे अन्न खाणे, फ्रिजमधील अन्न खाणे, वेळच्या वेळी न खाणे, बैठी कामे करणे, वारंवार अग्नीजवळ काम करणे, बाहेरील चमचमीत पदार्थ वारंवार खाणे, तसेच द्रवप्राय आहार न घेणे, फक्त पोळी भाजी खाणे, मिठाई-मैद्याचे पदार्थ जास्त खाणे यामुळे हे पदार्थ पचत नाही. रसगत द्रवता हा गुणधर्म कमी होतो. त्यामुळे व्यानवायूला विक्षेपणात अडथळा निर्माण होतो.

आधुनिक शास्त्राप्रमाणे इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे कोलेस्ट्रॉल निर्माण होतं. त्यामुळे परत हॉर्मोन्स दिल्या जातात. याचा परिणाम म्हणून ही सामता वाढत जाते. जोडीला रक्तदाब वाढल्यास लक्षणे तीव्र होतात. अशा अवस्थेत प्रथम हेतूसेवन (कारणे) बंद करून योग्य ते रसायन याबरोबर मधुर, बृहण, द्रवप्राय असा आहार, वसंत कल्पांचा योग्य वापर व पाचक औषधांचा योग्य उपयोग केल्यास ही अवस्था कमी होते.