चाळीशीतला गोंधळ

0
211
– डॉ. मनाली म. पवार
(गणेशपुरी-म्हापसा)
दरवर्षी ठराविक दिवशी काही तपासण्या करून घ्यायचे ठरवून टाका. ‘८ मार्च’ जागतिक महिला दिन का नाही? मान-सन्मान, सत्कार, भाषणे करण्याइतकेच महत्त्वाचे घरातील महिलांचे आरोग्यरक्षण होय.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत काम करणारी, वेळी-अवेळी जाऊन पलंगावर विश्रांती घ्यायला लागली किंवा अर्ध्या तासात उरकणार्‍या कामांना दोन तास घेऊ लागल्यास समजावे की स्त्रीला मानसिक, शारीरिक त्रास होत आहे. तिला विश्रांतीची व तुमच्या उबदार सहकाराची गरज आहे. 
घराला घरपण देणारी ती,
सगळ्यांच्या आवडी-निवडी सांभाळणारी ती
सगळ्यांची मने- मर्जी राखणारी ती,
मुलांचे नीतीमुल्ये सांभाळत संगोपन करणारी ती,
वृद्धांची आजारपणात पथ्ये सांभाळणारी ती,
नवर्‍याच्या कष्टांना योग्य मान देणारी ती,
संसाराला स्वतःही हातभार लावून
प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेत
संसार फुलवणारी ती,
गृहिणी, माता, बायको, सून…
आज जर चाळीशीच्या उंबरठ्यावर आपल्या आरोग्याच्या तक्रारीने कुरबुर करत आहे तर… ‘‘मम्मी, काय हे रोज तुला बरे नसते…’’ किंवा नवर्‍याने… ‘‘व्यायाम कर व्यायाम, नीट खात जा..’’, असे सल्ले देणे किंवा वृद्धांनी जेवणामध्ये खोड्या काढणे इत्यादि प्रकाराने एखाद्या स्त्रीला हिणवणे योग्य नव्हे. जी स्त्री आयुष्याच्या प्रत्येक वळणावर चारही बाजूने पसरलेल्या आपल्या संसाराला योग्य विचाराने, मायेने, वात्सल्याने, प्रेमाने, काळजीने सावरत असते. तिलाही आज प्रेमाने समजून घेण्याची गरज आहे. तिला बोचर्‍या शब्दांनी घायाळ करू नका किंवा तिला दुर्लक्षित (इग्नोर) करू नका. फक्त महिलादिनी तिचा सत्कार-सन्मान करायचा नसतो. हा सन्मान आयुष्यभर प्रत्येकाने करावा.
रोज हीरीरीने सर्वांसाठी व त्यांच्या त्यांच्या आवडीचे पदार्थ- जेवण करणारी आज जर खिचडीच करते किंवा पेजच करते असे जेव्हा म्हणायला लागते तेव्हा समजून घ्या, तिला काहीतरी त्रास होत आहे. मुलांनी पसारा केल्यावर गुपचूप तो न आवरता किंवा मुलांना न सागंता चिडचिड करायला लागली तर समजावे तिचे आरोग्य बरे नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत काम करणारी, वेळी-अवेळी जाऊन पलंगावर विश्रांती घ्यायला लागली किंवा अर्ध्या तासात उरकणार्‍या कामांना दोन तास घेऊ लागल्यास समजावे की स्त्रीला मानसिक, शारीरिक त्रास होत आहे. तिला विश्रांतीची व तुमच्या उबदार सहकाराची गरज आहे. ही गरज बर्‍याचवेळा चाळीशीच्या उंबरठ्यावर लागते.
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणारे एक अपरिहार्य आणि महत्त्वाचे वळण हा चाळीशीचा उंबरठा आहे. तारुण्य व प्रौढत्व यांच्यामधील हा उंबरठा पुष्कळ स्त्रियांना अस्वस्थ करून टाकतो. आपली पाळी जाणार म्हणजे स्त्रीत्व संपणार, वृद्धत्वाच्या कल्पनेने त्यांना डोळ्यांसमोर एक विकलांग, जरा जर्जर अवस्था दिसू लागते. चाळीशीनंतर साधारण आठ ते दहा वर्षांचा हा कालखंड असतो. ह्या काळाला ऋतूनिवृत्ती काळ असे म्हणतात. या काळात स्त्रियांमध्ये आमूलाग्र अंतर्बाह्य बदल होतात. त्यातील एक म्हणजे मासिक पाळी बंद होणे. हा विशिष्ट कालखंड आता बर्‍याच प्रमाणात चर्चेत आहे व त्रासदायकही ठरत आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे स्त्रियांचे आयुर्मान मात्र वाढले आहे. पूर्वी होणारा गर्भारपणातील मृत्यूदर संख्या, प्रसूतिपश्‍चात् होणारा मृत्यू दर संख्या झपाट्याने कमी झाली. तसेच अज्ञात कारणांनी होणारा मृत्यू आता टळला आहे. त्यामुळे आता स्त्रियाही सत्तरी काय नव्वदीही पार करू लागल्या आहेत. म्हणजे स्त्रियांच्या रजोनिवृत्तीनंतर त्या जवळजवळ १/३ आयुष्य जगतात. आयुष्याच्या या कालखंडात सुसह्य, सुखद व चांगल्या प्रतीचे आयुष्य जगण्याच्या दृष्टीने अधिक जागरुक होणे आवश्यक आहे.
रजोनिवृत्ती किंवा पाळी बंद होण्याचे सरासरी वय आहे ४७ वर्षे, पण ती ४५ ते ५० वर्षे या वयात केव्हाही होऊ शकते. अनुवंशिकता, स्त्रीची प्रकृती, पाळी सुरू होण्याचे वय इत्यादी अनेक गोष्टींवर ते अवलंबून असते. वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत जर पाळी बंद झाली नाही किंवा ३५व्या वर्षाच्या आधीच पाळी गेली तर डॉक्टरांकडून तपासण्या अवश्य करून घ्याव्यात.
या व्यतिरिक्त शस्त्रक्रियेमध्ये स्त्री-बीजांडग्रंथी काढाव्या लागल्या किंवा कॅन्सरसाठी चालू असलेल्या रेडिएशन किंवा केमोथेरपीमुळे ही पाळी बंद होऊ शकते.
रजोनिवृत्तीची कारणे
स्त्री-बीजांडग्रंथीत (ओव्हरीत) असलेला स्त्रीबीजांचा साठा संपला की पाळी बंद होते. कारण त्यापासून निर्माण होणारे स्त्रीसुलभ हार्मोन्स (अंतस्त्राव) हे कमी-कमी होत जातात. त्यामुळे गर्भाशयाच्या आतील स्तर खूप पातळ होतो व पाळी बंद होते.
जन्मतः स्त्री-बीजांडग्रंथीत साडेसात ते आठ लाख स्त्रीबीजे असतात, स्त्रीच्या आयुष्यात साधारणतः ४८० ते ५०० मासिक पाळ्या असतात, असे गृहीत धरले तर प्रत्येक पाळीत एक स्त्रीबीज पक्व होताना, शेकडो स्त्रीबीजे मोठी होतात. पण सुकून जातात. असे करता करता चाळीशीच्या सुमारास ओव्हरीत जेमतेम ४०० ते ५०० स्त्रीबीजे शिल्लक राहतात. हीसुद्धा पहिल्यासारखी हार्मोन्स तयार करण्याच्या अवस्थेत नसतात. त्यामुळे स्त्रीसुलभ हार्मोन्स, इस्ट्रोजेन व प्रोजस्टेरॉन हे कमी कमी होत जातात. त्याबरोबर शीर्षस्थ ग्रंथी (पिट्युटरी) तून तयार होणारे हार्मोन्स वाढतात. पुरुषप्रधान अँड्रोजेन हार्मोन्स वाढतात. या सर्व हार्मोन्सच्या बदलांचा परिपाक म्हणजे स्त्रियांच्यात होणारे अंतर्बाह्य बदल.
पाळी बंद होताना स्त्रियांमध्ये खूप प्रकारचे गैरसमज आढळतात. पाळी ही खालील तीन प्रकाराने बंद व्हायला हवी.
– पहिला प्रकार म्हणजे नियमित येणारी पाळी अचानक बंद होते, ती पुन्हा येतच नाही.
– दुसर्‍या प्रकारात पाळी नियमित येते, पण त्यात होणार्‍या रक्तस्त्रावाचं प्रमाण कमी होत जातं आणि शेवटी थांबते.
– तिसर्‍या प्रकारात दोन पाळ्यांमधील अंतर वाढत जाते. दोन, तीन, चार महिने असे करता करता जेव्हा वर्षभर पाळी येत नाही, तेव्हा ती गेली, असे समजावे. या तीन प्रकारांव्यतिरिक्त इतर कुठलाही त्रास झाला तरी तो नॉर्मल नाही, असे समजून आपल्या डॉक्टरांकडून योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात.
कधीकधी मासिक पाळी बर्‍याच दिवसांनंतर येते आणि खूप जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत राहतो. सखी-मैत्रीणींच्या सल्ल्यानुसार फक्त घरगुती औषधे घेत ‘या वयात सर्वांना असेच होते’ अशा गैरसमजूतीत राहू नये. प्रत्येक प्रकृती वेगळी तसा पाळी बंद होण्याचा कालावधी, तर्‍हा वेगळ्या.
तसेत एकदा वर्षभर पाळी बंद झाली आणि मग पुन्हा रक्तस्त्राव झाला, तर ते बरोबर नाही.. हे आतील अवयवांच्या (गर्भाशय, ओव्हरी इत्यादी) कॅन्सरचेही लक्षण असू शकते. तेव्हा हयगय न करता वेळीच डॉक्टरांना दाखवायला हवे.
ऋतुनिवृत्तीच्य काळात परिणाम तत्कालिक स्वरुपाचे किंवा दूरगामी स्वरुपाचे असू शकतात. तत्कालिक परिणाम स्त्रीची त्वचा , केस, बांधा, स्तन इत्यादींवर होणारे असतात, तर दूरगामी परिणाम हाडे, हृदय व मज्जासंस्था यांवर होणारे असतात.
म्हणून स्त्रियांची आरोग्याची बारीक सारीक जरी कुरबूर सुरू झाली तरी ती दुर्लक्षित करू नये. चाळीशीनंतर काही चाचण्या दरवर्षी करून घ्याव्यात. चाळीशीनंतर स्त्रियांमध्ये काही प्रमाणात, हृदयविकाराचे प्रमाण आढळते व ६५ वर्षांनंतर स्त्रियांमध्ये हे प्रमाण वाढत जाते. इस्ट्रोजेन या स्त्रीसुलभ हार्मोन्सचे शरीरातील चरबीच्या प्रमाणावर नियंत्रण असते. कोलेस्टेरॉलची पातळी व चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली येते. इस्ट्रोजेनमुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. चांगले कोलेस्टेरॉल (एचडीएल) वाढते तसेच वाईट कोलेस्टेरॉल (एलडीएल) कमी होते. चाळीशीनंतर इस्ट्रोजेनच्या अभावामुळे ‘एचडीएल’ कमी होते आणि ‘एलडीएल’ वाढत जाते. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागतात. हृदय, मेंदू इत्यादी महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. रक्तदाब वाढत जातो व हृदयविकाराचा धोका वाढतो. याव्यतिरिक्त इस्ट्रोजेनचे हृदयावर व रक्तवाहिन्यांवर प्रत्यक्ष चांगले परिणामही होत असतात. त्यातही इस्ट्रोजेनच्या अभावाने बदल घडून येतात. इस्ट्रोजेनचे सुरक्षा कवच गेल्यावर हे सर्व फरक दिसून येतात.
मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर इस्ट्रोजेन अभावाचा परिणाम दिसतोच शिवाय या हार्मोन्सचा मज्जासंस्थेवर थेट परिणाम होऊन मज्जासंस्थेत कमकुवतपणा येऊ लागतो आणि स्मृतिभ्रंशासारखे आजार उद्भवू शकतात. म्हणूनच या काळात स्त्रियांचा विसरभोळेपणा वाढतो. या विसरभोळेपणाच्या संरक्षणासाठी तिला सारखे टोचून बोलू नका.
इस्ट्रोजेन हार्मोन्समुळे पित्तनिर्मितीही नियंत्रित होते. रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेन अभावामुळे हे नियंत्रण दूर होते आणि पित्त खूप मोठ्या प्रमाणात आतड्यांत साठायला लागते. परिणामतः सारखी डोकेदुखी, छातीत जळजळणे, ढेकर येणे इत्यादी पित्तवृद्धीची लक्षणे दिसतात. या त्यांच्या तक्रारींकडे कानाडोळा करू नका. कारण पित्त मोठ्या प्रमाणात आतड्यांमध्ये साठून राहिल्यास मोठ्या आतड्यांचा कर्करोगसुद्धा होण्याची शक्यता असते.
हे सर्व टाळण्यासाठी योग्य सावधानी व जागरुकतेची गरज आहे. म्हणूनच तर दरवर्षी ठराविक दिवशी काही तपासण्या करून घ्यायचे ठरवून टाका. ‘८ मार्च’ जागतिक महिला दिन का नाही? मान-सन्मान, सत्कार, भाषणे करण्याइतकेच महत्त्वाचे घरातील महिलांचे आरोग्यरक्षण होय.
सर्वसाधारण तपासण्या अशा आहेत –
डॉक्टरांकडून संपूर्ण शारीरिक तपासणी
– वजन, रक्तदाब
– हिमोग्लोबीन, रक्तातील साखर, उपाशी पोटी व जेवणानंतर दोन तासांनी
– किडणीच्या कार्याच्या चाचण्या
– यकृताच्या कार्याच्या चाचण्या
– लिपीड प्रोफाईल (कोलेस्टेरॉल, एचडीएल, एलडीएल, ट्रायग्लिसरॉइडस)
– थायरॉईडच्या चाचण्या
याचबरोबर काही विशेष चाचण्या अशा ः
१) पॅप स्मिअर टेस्ट २) पोटाची व ओटीपोटाची सोनोग्राफी ३) स्तनांचा एक्स-रे- मॅमोग्राफी
– पॅप स्मिअर टेस्टः- या टेस्टबद्दल बर्‍याच जणींना भीती असते किंवा गैरसमजुतीमुळे ही टेस्ट करायला टाळतात. ही तपासणी म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या स्त्रावाची तपासणी. गर्भाशयमुखावरील स्त्राव हा एका छोट्या ब्रश किंवा पट्टीने घेऊन एका काचेच्या पट्टीवर पसरला जातो. तो एका स्प्रेद्वारे फिक्स करून प्रयोगशाळेत पाठवला जातो. कर्करागाच्या पेशी नाहीत ना, काही सूज आहे का इत्यादी गोष्टींची तपासणी केली जाते. ही तपासणी अतिशय सोपी, न दुखणारी व विशेष खर्चिक नसलेली अशी आहे. ही तपासणी प्रत्येक स्त्रीने चाळीशीनंतर वर्षातून एकदा तरी करून घ्यावी.
सोनोग्राफी ः पोटाची व ओटीपोटाची सोनोग्राफी हीसुद्धा चाळीशीनंतर प्रत्येक स्त्रीने वर्षातून किमान एकदातरी करून घ्यावी. रजोनिवृत्तीनंतर गर्भाशयाचे अस्तर चार मिलिमीटरपेक्षा कमी जाडीचे असायला हवे. कॅन्सरसारखा आजार तपासणी न झाल्याने बहुधा खूप उशीरा समजतो. दरवर्षी तपासण्या केल्याने प्राथमिक अवस्थेत हा आजार समजू शकतो.
मॅमोग्राफी ः स्तनाचा कॅन्सर हा अगदी प्राथमिक अवस्थेत लक्षात आल्यास त्याचा इलाज पूर्णपणे करता येतो आणि तो बरा होतो. स्तनांचा एक्स-रे विशेष पद्धतीने काढतात, त्याला मॅमोग्राफी म्हणतात. ही तपासणी वयाच्या पस्तीशीपासून करावी. ४० ते ५० वर्षे दर तीन वर्षांनी ५० ते ६० वर्षांनी दर दोन वर्षांनी आणि वयाच्या साठीनंतर दरवर्षी ही तपासणी एकदातरी करून घ्यावी.
दर महिन्याला घरच्या घरी स्वयंतपासणीही करावी. त्यासाठी ठराविक दिवशी आरशासमोर, कपडे काढून उभे राहून ही तपासणी करायची आहे. उजव्या हाताने डाव्या स्तनाची व डाव्या हाताने उजव्या स्तनाची तपासणी करावी. प्रथम स्तनाग्रे व्यवस्थित बाहेर आहेत ना, आत रुतली नाहीत ना हे पहावे. त्यातून पाणी, दूध, पू, रक्त इत्यादींपैकी काही स्त्राव येत नाही ना हे पहावे. हाताच्या तळव्याच्या मदतीने दोन्ही स्तन चाचपून पहावेत. तसेच काखेतही चाचपून कुठे गाठ लागत नाही ना, दुखत नाही ना हे पाहून घ्यावे. काही विपरित लक्षात आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
म्हणूनच चाळीशीतल्या बायकां जर घरात थोड्या कामांत, विचारांत, त्यांच्या कर्तृत्वात थोड्या मंदावल्या असल्यास त्यांना सहकार्य द्या, त्यांचे मनोबल वाढवा.