चाळिशीनंतर स्नेहनाने वातावर विजय

0
70
  • डॉ. मनाली म. पवार
    (सांतइनेज, पणजी)

वाताच्या कार्याचे योग्य ज्ञान होण्यासाठी, ‘गुण’ समजण्याची आवश्यकता आहे. वाताचा प्रत्येक गुण प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष रीतीने ‘हालचाल’ या कार्यास मदत करतो. चाळिशीनंतर वातावर विजय मिळविण्यासाठी बाह्य व आभ्यंतर स्नेहनाइतकी प्रभावी चिकित्सा दुसरी नाही.

स्त्री असो वा पुरुष साधारणतः चाळिशीनंतर त्वचेमध्ये एकसारखा कोरडेपणा, रूक्षपणा येऊ लागतो. थोडक्यात काय तर ओलावा, स्निग्धपणा कमी होऊ लागतो. हळूहळू त्वचेबरोबर डोळ्यातही रूक्षता जाणवू लागते. कानांमध्येही खाज येणे, ऐकायला थोडेसे कमी येणे अशा प्रकारच्या बारीकसारीक तक्रारी सुरू होतात. सांधे – हाडे दुखण्यासारखीही काही लक्षणे जाणवू लागतात. पचनशक्ती मंदावते. भूक कमी होते. मलमूत्राच्या काही तक्रारी सुरू होतात. शारीरिक तशा काहीशा मानसिक हालचालीही मंदावतात. असे का होत असेल?
आयुर्वेद शास्त्राप्रमाणे उतारवयात वातदोषाचे आधिक्य असते. म्हणूनच या काळात वात वाढतो. शरीराचा रूक्षपणा वाढतो. सांध्यांमधून आवाज येणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, हातापायांच्या तळव्यांना भेगा पडणे… इत्यादी तक्रारी दिसून येतात. वार्धक्याची लक्षणे म्हणा किंवा वातवृद्धीची लक्षणे वद्य काळात जरा लवकरच म्हणजे चाळिशीतच सुरू होतात. त्याची कारणेही आपणच निर्मिलेली आहेत. आपले राहणीमान, आपला आहारविहार ही वात वाढण्याची मुख्य कारणे आहेत. रूक्षांन्नाचं सेवन वाढलेलं आहे. सारखे बेकरीचे पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड, पॅकेट फूड, अवेळी जेवणे, रात्रीचे जागरण, सतत मोबाइल-लॅपटॉपचा वापर करणे, क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करणे इत्यादी अनेक कारणांनी शरीरातील रूक्षता अधिक वाढते व आपण अकाली वार्धक्याकडे झुकतो. मेक-अपने चेहरा युवा ठेवण्याचा प्रयत्न आपण करत असतो पण इतर लक्षणे मात्र व्यक्त होत असतात.
वात दोषाचे सामान्य गुण ः
वाताच्या कार्याचे योग्य ज्ञान होण्यासाठी, ‘गुण’ समजण्याची आवश्यकता आहे. वाताचा प्रत्येक गुण प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष रीतीने ‘हालचाल’ या कार्यास मदत करतो.

  • रूक्ष – याचा अर्थ कोरडेपणा. रूक्ष गुणामध्ये शोषणाचे सामर्थ्य असल्यामुळे अणुपरमाणूंचा संयोग मोडून वियोजन होण्यास मदत होते. म्हणूनच उतारवयात वात वाढल्यावर त्याचा पहिला परिणाम रूक्ष या गुणावर होतो व शरीराची रूक्षता वाढते.
  • लघू – लघू गुणामुळे लाघवता येते.
  • शीत – शीत या गुणामुळे वाताची हालचाल योग्य दिशेने व सुनियंत्रितपणे होते.
  • खर – खर हा गुणही कोरडेपणा वाढवतो.
  • सूक्ष्म – या गुणांमध्ये विवरण करून, मोकळेपणा निर्माण करून सूक्ष्मातिसूक्ष्म घटकापर्यंत पोहचण्याचे सामर्थ्य असते.
  • चल – वातदोषाच्या ठिकाणी हालचालीची प्रेरणा याच चल गुणामुळे निर्माण होते.
    चाळिशीनंतर पुढे वातदोषांमध्ये वृद्धी होत असल्याने वरील वाताच्या गुणांमध्ये बदल होतो. ते अधिकच वाढतात किंवा विकृत होतात व मनुष्याची वातदोषांमुळे होणारी सामान्य कार्ये बिघडतात.
  • वाताची विकृत वृद्धी झाल्यास शरीरामध्ये वाताच्या लघू/रूक्ष गुणाचा अतिरेक होतो व कृशत्व वाढते.
  • शीत गुणाच्या आधिक्याने काळेपणा वाढतो.
  • शरीरात एखाद्या भागाची, अवयवाची/मांसधातूची अति तीव्र स्वरूपात, गतिमान हालचाल म्हणजे कंप होय. वाताच्या अति रूक्षत्वामुळे उदरातील आत्राच्या अनुलोम गतीला अडथळा निर्माण झाल्यास हवा, मल, मूत्र, इत्यादी स्वरूपाचे घटक उदर प्रदेशात अधिक प्रमाणात साठू लागतात आणि तक्रारी उत्पन्न होतात.
  • वाताच्या अतिरूक्षत्वामुळे उदरातील आंत्राच्या अनुलोम गतीस अडथळा उत्पन्न होतो म्हणून मल (संडास) संबंधी तक्रारी निर्माण होतात.
  • भ्रंश याचा अर्थ एखादे विशिष्ट कार्य योग्य प्रकारे न होणे. लघू गुणाच्या अतिरेकाने व रूक्षत्वाने बल कमी होते.
    चल गुणाच्या अतिउद्रेकाने निद्रा येत नाही.
  • त्याचप्रमाणे रूक्षत्वाधिक्याने ज्ञानेंद्रिय- कर्मेंद्रियांचे कार्य उणावते. म्हणूनच जसा जमेल तसा वातावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करावा.
    चाळिशीनंतरही वाताची कार्ये सुरळीत होण्यासाठी काय करावे?….
  • चाळिशीनंतर वात बिघडू नये म्हणून वाताच्या रूक्ष गुणांविरोधी स्निग्ध गुण वाढवावा. शरीरात बाहेरून व आतून स्निग्धता वाढवण्याचा प्रयत्न करावा. बाह्य स्निग्धता वाढवण्यासाठी सर्वांगाला स्नेहन करावे. सध्या धावपळीच्या जगात रोज अभ्यंग शक्य नसल्यास किमान आठवड्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी सर्वांगाला खोबरेल तेल किंवा तीळ तेलाने मालीश करावी.
  • दररोज आंघोळीपूर्वी हातापायांना तेल लावावे.
  • पायांना भेगा पडणे, रात्री व्यवस्थित झोप न येणे या तक्रारी वाढल्यास पायाच्या तळव्यांना तूप लावावे व पायाचे तळवे काशाच्या वाटीने घासावेत.
  • ऊर्ध्व जत्रुगत अवयवांचे म्हणजे कान, नाक, घसा, नेत्र यांची कार्ये सुरळीत चालण्यासाठी स्नेहन गरजेचे आहे. या अवयवांच्या निरोगीपणासाठी सकाळी रोज गण्डूष करावे. तीळ तेल कोमट करून साधारण पंधरा मिनिटे तोंडात धरून ठेवावे व मग बाहेर टाकावे किंवा चुळा भराव्यात किंवा आत्ताच्या काळात अर्ध्या वाटीत कोमट पाण्यात दोन चमचे तीळ तेल टाकून चुळा भराव्यात.
  • चाळिशीनंतर जरा कानाच्या तक्रारीपण सुरू होतात. म्हणून कर्णपूरण हे आठवड्यातून एकदा तरी करावे. कानामध्ये जरासे कोमट खोबरेल तेल किंवा तीळ तेल घालावे.
  • चांगल्या स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून आठवड्यातून एकदा डोळ्यांमध्येही तेल घालावे.
  • पचनसंस्थेचा विचार करता आठवड्यातून एकदा तरी स्नेहाचा बस्ती घ्यावा. वैद्याच्या सल्ल्याने अनुवासन बस्ती घ्यावा.
  • पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी एरण्डतेलाचा विशेष उपयोग करावा. २चमचे एरण्ड तेल कणकेमध्ये भिजवून त्याच्या चपात्या खाव्यात. किंवा रोज सकाळी १चमचा एरंड तेल कोमट पाण्याबरोबर घ्यावे किंवा रात्री १ चमचा एरंड तेल कोमट दुधाबरोबर घ्यावे.
  • तेल व गायीच्या तुपाचा आभ्यंतर स्नेहनासाठी भरपूर उपयोग करावा.
    चाळिशीनंतर वातावर विजय मिळविण्यासाठी बाह्य व आभ्यंतर स्नेहनाइतकी प्रभावी चिकित्सा दुसरी नाही.