- मीना समुद्र
कवितेची चाल ही शब्दार्थानुरूप आणि भावानुरूप असेल तर ती हृदयाला भिडते. अर्थ चांगल्याप्रकारे प्रतीत होतो. लोकांपर्यंत पोचता येते. कारण कवितागायन हा रसिकांशी केलेला हृदयसंवाद असतो.
परवा एका कविसंमेलनाच्या निमित्ताने काही विचार मनात आले. पूर्वीच्या काळी आणि अजूनही कुठे कुठे लग्नाळू मुलीला पाहायला आलेली वराकडची मंडळी तिची अनेक तऱ्हेने परीक्षा घेतात. त्यात शिक्षण, नोकरी, पुढचे इरादे, कुटुंबीय वगैरेसंबंधी प्रश्न विचारणं तर असेच, शिवाय तिचं दिसणं, बोलणं, शिवणटिपण, सुगरणपणा, गाणं वगैरेसारखी कला हे अजमावत. तिचं चालणं पाहण्यासाठी तिला चालून दाखवायला सांगण्यात येई. वधूच्या चालीत काही खोट नाही ना हे पाहिले जाई. ही तिची चाल पाहण्याआधी तिची चालचलणूक म्हणजे वागणूक कशी आहे याबद्दल माहिती काढलेली असेच. पण प्रत्यक्ष भेटीत ती कशी आहे हे पारखून पाहिलं जाई. वधुपरीक्षेची ही वेगळी चाल.
हे झालं त्या सौभाग्यकांक्षिणी वधूच्या ‘चाली’बद्दल. पण मला आता लिहायचे आहे ती ‘चाल’ मात्र वेगळी आहे. कवितेची चाल किंवा कविता गाण्याची चाल म्हणजेच तिची गेयता याबद्दल थोडंसं लिहिणार आहे. वेगवेगळ्या व्यक्तींची त्याबद्दल वेगवेगळी मते आहेत. ‘महाजनो येन गतः स पन्थाः’ असं एक संस्कृत वचन आहे. थोर लोक ज्या मार्गाने जातात तोच मार्ग आपण अनुसरावा आणि तसा तो आपोआप अनुसरला जातोही- कधी नकळत, तर कधी सरधोपट, बिनधोक म्हणून! त्या रुळलेल्या मार्गावरून सहजसोपेपणाने जाता येते; कारण तो रुळून गेलेला असतो. त्याची चाकोरी तयार झालेली असते. या चाकोरीत फिरत राहणे योग्य की अयोग्य असा प्रश्न काही वेळा पडतो तो स्वतःच्या कवितांच्या बाबतीत. गोव्यात बा. भ. बोरकर, गजानन रायकर, विष्णू वाघ अशी दिग्गज मंडळी कविता गाऊन सादर करायची. विं. दा. करंदीकर, वसंत बापट, विठ्ठल वाघ हेही कविता गाऊन सादर करायचे. त्यांच्या लोकप्रियतेचे ते एक गमक आणि वैशिष्ट्य होते. अशाच महाजनांचे अनुकरण माझ्याकडूनही झाले असणार. शिवाय कवितेचे अतिशय हृद्य असे वाच्य प्रकार ऐकलेले असूनही, त्यांचाही परिणाम मनावर होत असूनही आणि तशा कविता लिहिल्या असूनही मन रमते ते गेय कवितेत. याचे कारण गाण्यांची मुळातली आवड हे असावे.
काही चाली अगदी चाल करूनच येतात असाही अनुभव आहे. शाळेतल्या गोड गळ्याच्या मैत्रिणी कवितांना सुंदर चाली लावत. गीता, गीतगोविंद, करुणाष्टक, मनाचे श्लोक, जात्यावरच्या ओव्या, डोहाळे, अंगाई, पाळणे, भजने, कीर्तने, गाणी सतत ऐकण्याचाही हा परिणाम असावा. शिवाय पूर्वीच्या कविता विशिष्ट छंदात असत. लग्न, मुंज, मंगळागौरी, सण-समारंभाच्या निमित्ताने गाणी गायली जात. त्यात लय-तालबद्ध अशाही बऱ्याच असल्याने त्या सतत वाचत, ऐकत असल्याचाही परिणाम काही अंशी कविता गेयतेकडे झुकण्याकडे झाला. ‘आधी कविता आणि मग चाल की आधी चाल आणि मग कविता?’ असा प्रश्नही कुणी विचारला होता तेव्हा त्या दोन्ही प्रकारे कविता आहेत. कधी अगदी चालीवरच सुचल्या आणि एकामागून एक मणीहारात ओवावेत तशा त्या गाण्यात गुंफत जात राहिल्या. काहींना मात्र चाली लावलेल्या. यातही ऐकलेल्या गाण्यांचा परिणाम. काही स्वरांचे मिश्रण तर काही त्याच चालीबरहुकूम शब्दयोजनाही होत राहिलेल्या. कधीकधी गमतीच्या गोष्टी घडतात. एक शास्त्रीय संगीत शिकणारी मैत्रीण आमच्या गच्चीतून संध्याकाळच्या सागरावरच्या सूर्यास्ताचे दृश्य पाहून भारावून पूरिया धनश्रीचे स्वर आळवू लागली. ती सुरम्य, सुरंगी संध्याकाळ स्मरणात सुस्वर होऊन भिनून गेली. त्या नादात एक कविता ‘घरटे’ चालीवर लिहिली. ते रागाचे सूर डोक्यात असल्याने त्या रागाचा परिणाम माझ्या कवितेवर झाला असावा असे आपले मला वाटत होते. माझी ती चाल आणि कविता स्वतःला आणि रसिकांना अतिशय भावली, पण ते स्वर वेगळेच होते. पूरिया धनश्रीशी त्याचा काडीमात्र संबंध नव्हता हे जाणकारांकडून ऐकले तेव्हा हे फक्त अनुकरण नाही; काहीतरी नवे छान आपण निर्मिले आहे याचा आनंदही झाला, आणि कविवर्य मंगेश पाडगावकरांचे शब्द आठवले-
ज्याने त्याने गावे आपल्याच हृदयातले गाणे
इतरांसाठीही- पण आपल्याच लयीत आपल्याच तालावर
‘आनंदयात्री पाडगावकर’ या मंगेश पाडगावकरांच्या चरित्रात्मक पुस्तकात, त्यांच्या लेखिका पत्नी कांचन पाडगावकर यांनी म्हटले आहे- ‘कविता हा मानवी हृदयाचा आद्य हुंकार आहे. गीतिकाव्यातून उत्क्रांत होत गेलेला भावकविता हा काव्यप्रकार संवेदनशील रसिकांच्या मनात कायम रुंजी घालणारा.’
रसिकांकडून कवितागायनासाठी होणारा आग्रह हा त्यांच्या मनातील नादसंवेदनेशी निगडित असतो. त्यामुळेच अस्सल, उत्स्फूर्त, जातिवंत कविता गेय झाली तर ती रसिकमनाला भिडते. सौंदर्याचे एक नवे परिणाम तिला लाभते, असे कवयित्री शांता शेळके यांनी म्हटले आहे ते पटते. त्यांच्या अत्यंत संवेदनशील आणि जातिवंत कवितांची रत्नमाळ डोळ्यांपुढून झरझर चमकून जाते. सुंदर दृश्य, भावनांची आर्तता, सुरम्य कल्पना सुचत असताना मन एकाग्रही होते भावनांनी तसेही. आणि अशा अवस्थेत ‘तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे, स्वप्न आहे लोचनी हे तोवरी पाहून घे’ असे बाकीबाब सांगतात तेही पटते. आणि ‘स्वर शब्द वेचिलेले शोषून सर्व पाणी, आजन्म ओविली मी त्याची प्रसन्न गाणी’ अशी ध्वनींच्या रूपांना आशयसंपन्न करत कवितेची गाणी होताना ती चाल मनामनांना व्यापून राहते. चाल भावानुरूप आणि अर्थानुरूप असावी लागते, तरच ती परिणामकारक ठरते.
भक्तिरसप्रधान पदांना, भजनांना त्यांचा एक विशिष्ट ताल, ठेका असतो. काही चाली अशा तालावर, ठेक्यावर रसिकहृदयाला नाचवतात, भारून टाकतात आणि तल्लीनता, तद्रूपता, तन्मयता साधतात. ‘पंख’ या माझ्या कवितेला टाळ्यांची, तालाची साथ आणि दाद मिळते तेव्हा ती शब्दांना असतेच, शिवाय मनाची स्पंदने जुळवणारी असल्याने स्वतःला आनंद तर देतेच, पण इतरांचा आनंद पाहून जास्त आनंद होतो.
विशिष्ट शब्दरचनेमुळे, अर्थपूर्णतेमुळे आणि अनपेक्षित कलाटणीमुळे गझलेसारखा प्रकार अतिशय मर्मस्पर्शी होतो तो तिला लावलेल्या चालीमुळे. हायकू, कणिका, चारोळ्या हे आकारमानाने अतिशय लहान असूनही अत्यंत आशयघन असतात. बिंदूत सिंधू किंवा गागर में सागर भरण्याइतके ते अर्थपूर्ण असतात. पण हे सारे वाचले जातात. मुक्तछंद हा वाचनाचा प्रकार वाटतो. पण त्यालाही विशिष्ट छंद असतोच. ‘कुणाच्या खांद्यावर’सारखी गद्यातली गाणी हृदयनाथांसारखा समर्थ संगीतकार लाभल्याने रसिकांच्या ओठावर खेळतात. याउलट ‘गाण्याच्या ओळी सुरांशिवाय प्रचलित गद्यात म्हटल्या तर त्यांच्यात एकप्रकारचा भकासपणा उमटतो, तो ते गाणे छंदासुरात म्हटल्यास पळभरात तो कुठल्या कुठे नाहीसा होतो. त्यासाठी स्वतःच्या कवितेवर आणि स्वतःवरही विश्वास असावा लागतो. बांधेसूदपणा आणि अंतर्गत लय ध्यानी घ्यावी लागते,’ असे कविवर्य नारायण सुर्वे लिहितात.
कवितेची चाल ही शब्दार्थानुरूप आणि भावानुरूप असेल तर ती हृदयाला भिडते. अर्थ चांगल्याप्रकारे प्रतीत होतो. लोकांपर्यंत पोचता येते. कारण कवितागायन हा रसिकांशी केलेला हृदयसंवाद असतो.