राजद – जदयू – कॉंग्रेसला १८ पैकी १० जागा
बिहार, कर्नाटक व पंजाब या राज्यांमधील अलीकडेच पार पडलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा प्रभाव ओसरल्याचे स्पष्ट झाले असून तेथे अनुक्रमे राजद-जदयू आघाडी व कॉंग्रेस यांनी बाजी मारली आहे. केवळ मध्य प्रदेशात भाजपने तुलनात्मक यश मिळवले. चार राज्यांमधील पोटनिवडणुकांमधील एकूण १८ जागांपैकी राजद-जदयू व कॉंग्रेस आघाडीला १० जागा मिळाल्या.
बिहारमधील निकाल आपल्याला अपेक्षित नव्हता अशी प्रतिक्रिया भाजप नेते शहनवाज हुसेन यांनी व्यक्त केली आहे तर लालू प्रसाद यादव व नितीश कुमार यांनी निकालाबद्दल आनंद व्यक्त केला. भाजपला फक्त मध्य प्रदेशात समाधानकारक कामगिरी करता आली. तेथील तीनपैकी दोन जागा भाजपने मिळवल्या तर एक कॉंग्रेसच्या वाट्याला आली.
कर्नाटकात कॉंग्रेसला २ जागा
कर्नाटक विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत प्रतिष्ठेच्या बेल्लारी मतदारसंघासह कॉंग्रेसने दोन जागा जिंकल्या. या ठिकाणी २१ ऑगस्ट रोजी मतदान झाले होते. बेल्लारी मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला.
बेल्लारीत कॉंग्रेसचे एन. वाय. गोपाळकृष्ण यांनी भाजपच्या ओबालेश यांचा ३३,१०४ मतांनी पराभव केला. या ठिकाणी याआधी बी. श्रीरामलू हे आमदार होते. ते लोकसभेवर निवडून आल्याने ही जागा रिक्त झाली होती. शिकारीपुरा मतदारसंघ राखण्यात भाजपने यश मिळवले. राज्याचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र यांनी कॉंग्रेसचे एच. एस. शांत वीरप्पा यांच्यावर ६४३० मतांनी विजय मिळवला. कॉंग्रेसने चिक्कोडी-सदलगा हा बालेकिल्ला राखण्यात यश प्राप्त केले. त्यांच्या गणेश प्रकाश हुक्केरी यांनी भाजपच्या महंतेश कवटगीमठ यांचा ३१८२० मतांनी पराभव केला.
पंजाबात कॉंग्रेस, अकाली दल यांना प्रत्येकी १ जागा
पंजाबात पतियाळा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचा उमेदवार तथा माजी केंद्रीय मंत्री प्रेणीत कौर यांनी शिरोमणी अकाली दलाच्या भगवानदास जुनेजा यांचा पराभव केला. २३,२८२ च्या मताधिक्क्याने कौर विजयी झाल्या तर तलवंडी मतदारसंघात शिरोमणी अकाली दलाचे उमेदवार जीत मोहिंदर सिंग सिध्दू यांनी कॉंग्रेसच्या हरमिंटर जस्सी यांचा पराभव केला.
लालू-नितीश आघाडीला १० पैकी ६ जागा
बिहार विधानसभेच्या ६ मतदारसंघात लालू प्रसाद यादव व नितीश कुमार यांच्या आघाडीने विजय नोंदवला. लालूच्या राजदला तीन जागा मिळाल्या. जद-यूला दोन जागा तर कॉंग्रेसच्या एका उमेदवाराने विजय प्राप्त केला. भाजपच्या युतीतील घटक पक्ष लोक जनशक्ती पक्षाला एकही जागा मिळाली नाही.